Tuesday, December 30, 2025

विश्वनिर्मिती – दर्शने | World Creation – Theories

 




विश्वाची निर्मिती कशी झाली ?  कोठून झाली ?  कोणी केली ?  विश्वाचे कारण काय आहे ?  वगैरे अशा अनेक शंका उत्पन्न होतात.  अनेक विचारवंतांनी याविषयी आपापली मते सांगितलेली आहेत.  त्या प्रमुख मतांना “दर्शन” असे म्हटले जाते.  त्यामध्ये जैन, बौद्ध, चार्वाक यांच्यासारखी काही वेदबाह्य अवैदिक म्हणजे वेदांना प्रमाण न मानणारी दर्शने आहेत.  तर मीमांसा न्याय, वैशेषिक, सांख्य, वेदांत यासारखी काही वैदिक म्हणजे वेदांना प्रमाण मानणारी दर्शने आहेत.

 

काही दर्शनांनी कर्ममार्गाचे प्राधान्य मानले.  काहींनी ज्ञानाला तर काहींनी केवळ भक्तीलाच प्राधान्य दिले.  या सर्व दर्शनांची ईश्वर, जीव, विश्व, मोक्ष यांविषयी आपापली भिन्न-भिन्न मते आहेत.  चार्वाकादि काही लोक तर ईश्वराचे अस्तित्व सुद्धा मानीत नाहीत.  ही सर्व मते त्यांच्या-त्यांच्या स्थानामध्ये काही विशिष्ट मर्यादेपर्यंत जरी योग्य वाटली तरी कोणत्याही विचारवंत पुरुषाने तत्त्वाचे यथार्थ व सम्यक् स्वरूप समजावून घेताना या सर्व दर्शनांच्या मर्यादा देखील समजावून घेतल्या पाहिजेत.

 

भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्यांनी या सर्व दर्शनांचा उहापोह करून सर्वांचा समन्वय केला.  तदनंतर या सर्वांच्यामध्ये वेदांतशास्त्रप्रतिपादित अद्वैतसिद्धांत हा सर्वतोपरी असून तेच पारमार्थिक सत्य आहे, हे तर्क, न्याय, युक्ति, श्रुति, स्मृति या सर्वांच्या आधारे आपल्या विस्तृत भाष्यांच्यामधून स्पष्ट केले.  अद्वैत सिद्धांतामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे युक्तियुक्त मिळतात, हे दाखवून दिले.  म्हणूनच आचार्यांचे वैचारिक स्तरावरील हे कार्य केवळ अद्वितीय आहे.

 

परमात्मा आपल्या स्वतःच्या मायाशक्तीच्या साहाय्याने सर्व दृश्य, पदार्थांची निर्मिती करतो.  केवळ परमात्मा विश्वनिर्मिती करू शकत नाही, कारण तो निर्विकारस्वरूप आहे आणि केवळ माया सुद्धा विश्वनिर्मिती करू शकत नाही, कारण माया ही जड, अचेतन असून ती ब्रह्माश्रित आहे.  माया ही परमात्म्याची अविभाज्य शक्ति आहे.  ती प्रत्यक्ष दाखविता येत नाही.  मात्र मायेचे कार्य दाखविता येते.  संपूर्ण चराचर सृष्टि हे मायेचेच कार्य आहे.  माया ही विश्वाचे उपादान कारण आहे.  परमात्मा मायेच्या साहाय्याने विश्वनिर्मिती करतो.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016




हरी ॐ