हे रामा ! एखाद्या लहान मुलापासून सुद्धा युक्तियुक्त वचन ग्रहण
करावे. परंतु प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी युक्तिविरहित
वचन केले तर शूद्र असणाऱ्या गवताप्रमाणे त्याचा त्याग करावा. याचे कारण हे रामा ! ज्ञान म्हणजे कोणाच्या बुद्धिमधील कल्पना किंवा कोणाचे
व्यक्तिगत मत होऊ शकत नाही. शास्त्रकार सांगतात
- ज्ञानं न पुरुषतन्त्रत्वात् | ज्ञानं
न वस्तुतन्त्रत्वात् इति | ज्ञान हे
ज्ञान देणाऱ्या किंवा ज्ञान घेणाऱ्या पुरुषावर अवलंबून नसते. तर ज्ञान हे ज्ञेय वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून असते.
ज्ञानामध्ये स्वतःच्या कल्पना, मते,
रागद्वेष किंवा आवड-नावड येऊ शकत नाही. ज्ञानामध्ये
"मला काय वाटते" याला कोणतेही महत्त्व नाही. उदा. साखर गोड आहे हे, साखरेचे ज्ञान आहे. एखाद्या मनुष्याला साखर तिखट वाटली, म्हणून साखर
तिखट होत नाही. साखर
ही कोणत्याही स्थानामध्ये, कोणत्याही काळामध्ये गोडच राहते. ज्ञानामध्ये आपण स्वतःचे कोणतेही मत घालू शकत नाही.
यालाच वस्तूचे यथार्थ ज्ञान म्हणतात.
याप्रमाणेच आत्मस्वरूपाचे ज्ञान दिले गेले पाहिजे.
स्वतःचे मत न सांगता तसेच शास्त्रामधील
कोणताही भाग न वगळता जसे आहे तसे यथार्थ, सम्यक् ज्ञान जो देऊ शकतो, तोच खरा ब्रह्मविद्येचा
वक्ता किंवा आचार्य होऊ शकतो. मग तो बालक किंवा
वृद्ध कोणीही असो, त्याचे शास्त्रप्रणित व युक्तियुक्त असणारे वचन साधकाने ग्रहण करावे.
परंतु ब्रह्मदेव म्हणजे येथे गृहीत धरावे की,
एखादा अत्यंत विद्वान प्रसिद्ध असणारा मनुष्य शास्त्र सोडून युक्तिरहित किंवा युक्तिविरुद्ध
वचन बोलत असेल तर ते वचन गवताच्या काडीप्रमाणे निकृष्ट मानून त्याचा त्याग करावा.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–

