Tuesday, December 23, 2025

चैतन्यवृत्तीची विविध रूपे भाग १ | Expressions Of Consciousness Part 1

 




हे राघवा !  मन, बुद्धि, अहंकार, चित्त, कर्म, कल्पना, संसृति, वासना, विद्या, प्रयत्न, स्मृति, इंद्रिये, प्रकृति, माया, क्रिया हे सर्व शब्द किंवा यांसारखे अन्यही अनेक शब्द म्हणजे केवळ संसारभ्रम आहे.  अज्ञानी जीव आपले खरे आत्मचैतन्यस्वरूप विसरतो व वर सांगितलेल्या मन वगैरेदि कल्पित उपाधीशी व दृश्याशी तादात्म्य पावून बद्ध होतो.

 

·       मन: अविद्येमुळे चैतन्यस्वरूप कलंकित-विकारयुक्त झाल्यासारखे वाटते व त्यामधून अनेक कल्पना उत्पन्न होतात.  त्या कल्पनांच्यामधून पुढे अनेक उन्मेष म्हणजे “हे योग्य की ते योग्य ?” “हे करावे की ते करावे ?” याप्रकारचे असंख्य प्रश्न निर्माण होतात.  संकल्प-विकल्पयुक्त असणाऱ्या चैतन्याच्या या अविद्याकल्पित स्थितीला ‘मन’ असे म्हणतात.

·       बुद्धि: या संकल्प विकल्पांच्यामधून कोणतीतरी एक निश्चित व निर्णयात्मक वृत्ति उदयाला येते.  त्या वृत्तीमध्ये निर्णय घेण्याचे सामर्थ्य असल्यामुळे तिला इयत्ताग्रहणक्षमा असे म्हटले जाते. तिचेच ‘बुद्धि’ असे नाव आहे.

·       अहंकार: ज्यामध्ये मिथ्या अभिमान उत्पन्न होऊन स्वतःच्या स्वतंत्र सत्तेची कल्पना केली जाते, त्या बुद्धीला ‘अहंकार’ अशी संज्ञा आहे.

·       चित्त: जी वृत्ति एखाद्या लहान बालकाप्रमाणे एक विषय सोडून दुसरा, दुसरा विषय सोडून तिसरा याप्रमाणे एकामागून एक भिन्न भिन्न विषयांचे स्मरण, अनुसंधान करीत राहते.

·       कर्म: चैतन्याची जी वृत्ति जीवाकडून असत् स्वरूपाचे स्पंदन करवून घेते, तसेच जी त्या क्रियेच्या फळामागे धावते, स्पंदन हाच जिचा धर्म आहे.

·       कल्पना: काकतालीय न्यायाप्रमाणे जी आपल्या स्वस्वरूपाच्या निश्चयाचा त्याग करून म्हणजे स्वस्वरूपाला विसरून दृश्य विषयाची भावना करू लागते, ती चैतन्याची वृत्ति.

 

हे राघवा !  याप्रमाणे ही संवित् किंवा हे चैतन्यच या दृश्य संसाराचे कारण आहे.  विषयाभिमुख झाल्यामुळे तेच चैतन्य कलंकित होऊन स्फुरण पावते व अनेक गुणधर्मांनी व्यक्त होते.  वरील सांगितलेले सर्व शब्द हे त्या चैतन्यवृत्तीचेच पर्यायी शब्द आहेत.  परमात्मस्वरूपापासून च्युत झालेल्या, अविद्येने कलंकित झालेल्या, नाना संकल्पांनी युक्त असणाऱ्या या चैतन्याच्या वृत्तीलाच ज्ञानी पुरुष मन, बुद्धि वगैरेदि अनेक शब्दांनी संबोधतात.  थोडक्यात जीव काय, मन काय, बुद्धि काय वगैरेदि हे सर्व शब्द चैतन्यला केवळ अविद्येमुळे प्राप्त झाले आहेत.  त्यामुळे हे राघवा! हे सर्व शब्द कल्पित आहेत, हे तू लक्षात घे.


 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ