आचार्य म्हणतात की आम्ही सांख्यांचे खंडन करण्याचे कारणच नाही. कारण अन्य तार्किक लोकांच्याकडूनच त्यांची मते खंडन होतात. तार्किक लोक सांख्यांचे, व सांख्य लोक अन्य तार्किकांचे खंडन करतात, कारण सर्वजण परस्परविरुद्ध अर्थाच्या कल्पना निर्माण करतात. ज्याप्रमाणे मासाचा तुकडा मिळविण्यासाठी प्राणी एकमेकांशी भांडतात, एकमेकांच्या अंगावर ओरडतात, त्याचप्रमाणे सांख्यवादी लोक व अन्य तार्किक लोक एकमेकांच्या मतांचे खंडन करून आपलेच मत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते सर्वजण परस्परविरुद्ध अर्थ सांगत असल्यामुळे ते सर्वजण पारमार्थिक तत्त्वापासून दूर जातात.
त्यामुळे कोणत्या मताचा आदर करावा ? कोणत्या मतांचा त्याग करावा ? हे साधकाला समजणे अत्यंत आवश्यक आहे, कारण हा
सर्व मतमतांचा गलबला आहे. यासाठीच
येथे आर्चार्य सांगतात की साधकांनी योग्य माताचाच आधार व आश्रय घ्यावा. म्हणून आम्ही येथे तार्किकांच्या मतामधील किंचित
दोष दाखविला. आत्मतत्त्वाच्या यथार्थ ज्ञानासाठी वेदान्तशास्त्र हेच
एकमेव प्रमाणभूत शास्त्र असून मुमुक्षूंनी वेदान्तशास्त्राचा आदर करावा. तार्किक लोक दुसऱ्यांचे दोष
दाखविण्यामध्ये तत्पर आहेत. मात्र आम्ही
अशी तत्परता दाखविलेली नाही. तर आम्ही
तार्किकांच्या मनामधील किंचित दोष दाखविला. आम्हाला कोणाचेही दोष सांगण्याची इच्छा नाही.
तर मुमुक्षूंनी योग्य मार्गाचे, योग्य
मताचे अनुसरण करावे, चुकीची मते ग्रहण करू नयेत, म्हणून अयोग्य मतांचे आम्ही खंडन
केले.
वेदज्ञानी पुरुष, ज्याच्यामुळे विरोध,
वादविवाद निर्माण होतात, त्या वादविवादांचे कारण, वाद करणाऱ्यांच्यावरच सोडून
आपल्या सद्बुद्धीचे संरक्षण करतात, त्या पुरुषालाच सुखपूर्वक शांति प्राप्त होते. म्हणूनच आचार्य सुद्धा म्हणतात – वादे वादे तत्त्वबोधः न जायते | वादविवादांच्यामधून
तत्त्वस्वरूपाचा बोध होत नाही. ज्यावेळी या ज्ञानामध्ये अनेक मते-मतांतरे
समोर येतात तेव्हा, साधकाने स्वबुद्धि हे प्रमाण न ठेवता वेदान्तशास्त्रालाच
प्रमाणभूत मानावे. कारण वेद हे एखाद्या मर्त्य
मनुष्याच्या बुद्धिमधून निर्माण झालेले नसून वेदज्ञान हे अपौरुषेय ज्ञान आहे. बुद्धिमधून निर्माण झालेल्या ज्ञानाला
मर्यादा असतात. त्यामध्ये व्यक्तिगत
रागद्वेष निर्माण होतात. त्यामुळे ते
ज्ञान प्रमाणभूत होऊ शकत नाही. म्हणून
श्रुतिप्रमाण हेच सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे.
- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१२
- Reference: "Prashanopanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand
Saraswati, 1st Edition, April 2012
- हरी ॐ –