Monday, December 9, 2024

संतुष्ट मनुष्याची व्याख्या | Definition of Satisfied Man

 



मनुष्याला आयुष्यात बहिरंगाने काही मिळो किंवा न मिळो, परंतु त्याच्या आत समाधान असेल तर झोपडीतला माणूस सुद्धा सुखाने राहतो.  म्हणून तृप्ति ही बाहेर नसून ती अंतरंगाची वृत्ति आहे.  अगदी गरीब परंतु प्रामाणिक मनुष्य दिवसभर कष्ट करतो.  दिवसाच्या शेवटी जे काही रुपये मिळतात त्यामधून उदरनिर्वाह करतो आणि सुखाने झोपतो.  त्याचे मन जे मिळाले त्याच्यामध्ये तृप्त असते.  याउलट एखादा श्रीमंत मनुष्य भरपूर धन कमावतो.  त्याला पुढच्या सात पिढ्यांचीही भ्रांत नसते.  तरीही त्याचे मन तृप्त नसल्यामुळे तो दुःखीच असतो.  म्हणून सुख हे बाह्य विषयांच्यावर अवलंबून नसून मनाच्या समाधानी वृत्तीवर अवलंबून आहे.

 

असे सांगून वसिष्ठ मुनि येथे संतुष्ट मनुष्याची व्याख्या करतात.  अप्राप्त वस्तूंच्या इच्छांचा जो त्याग करतो आणि जे मिळाले आहे त्यामध्ये समभावाने राहतो, जो खेद आणि अखेदरहित म्हणजेच हर्षविषादरहित झाला आहे, त्याला 'संतुष्ट' असे म्हणतात.  सामान्य मनुष्याच्या मनामध्ये सतत न मिळालेल्या - अप्राप्त वस्तूची इच्छा असते.  जे मला आजपर्यंत मिळाले नाही ते प्रयत्नाने मिळवावे असे त्याला वाटते.  तसेच जे मिळाले आहे त्याचे रक्षण करण्याचा तो प्रयत्न करतो.  यालाच संस्कृतमध्ये 'योग' व 'क्षेम' असे म्हणतात.  अप्राप्तस्य प्रापणं योगः |  प्राप्तस्य रक्षणं क्षेमः |  अप्राप्त वस्तूंची प्राप्ति म्हणजे 'योग' आणि प्राप्त वस्तूंचे रक्षण म्हणजे 'क्षेम' होय.

 

या दोन वृत्तींच्यामुळे अविवेकी मनुष्याच्या मनामध्ये अनेक कामना उत्पन्न होतात.  परंतु याउलट जो विवेकी ज्ञानी पुरुष आहे, जो पूर्णतः संतुष्ट, तृप्त झाला आहे, त्याच्यामध्ये योगक्षेमवृत्तीचा अभाव होतो.  असा मनुष्य अप्राप्त वस्तूची इच्छा करीत नाही आणि प्राप्त वस्तूने हर्षितही होत नाही.  याचे कारण त्याला विचाराने निश्चितपणे समजलेले असते की, कर्म-कर्मफळाच्या नियमाप्रमाणे आपल्याला जे मिळणार, जितके मिळणार, जेव्हा मिळणार ते मिळणारच !  त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही.  म्हणून ज्ञानी पुरुष आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदाने जीवन जगतो.  तो खेदाखेदरहित होतो.  तो सुखदुःखादि द्वंद्वांच्यामध्ये सम राहतो.  तोच खऱ्या अर्थाने संतुष्ट पुरुष आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ