Tuesday, November 26, 2024

दृष्टा व दृश्य यांचे परस्पर पोषण | Inter-Nourishment Of Seer And Seen

 




श्रीवसिष्ठ मुनि या दोन श्लोकांच्यामधून पुन्हा एकदा द्रष्टा व दृश्य यांचा निरास करतात.  या जगात पाहणारा द्रष्टा असतो, त्यावेळेस समोर दृश्य असतेच आणि समोर दृश्य दिसत असेल तर त्याला पाहणारा द्रष्टा असतोच.  म्हणजे द्रष्टा आणि दृश्य हे एकमेकांना पूरक असणारे घटक आहेत आणि तेच एकमेकांचे पोषण करीत असतात.  द्रष्टा हा दृश्याचे वर्धन करीत असतो.  म्हणून पाहणारा द्रष्टा 'मी' जितके विषय मला पाहता येतील, तितके विषय मी पाहत असतो.  पाहता पाहता डोळे थकले, अगदी मिटायला लागले, तरी द्रष्ट्याचे पाहणे काही संपत नाही.  त्याचप्रमाणे दृश्य सुद्धा द्रष्ट्याचे म्हणजेच द्रष्ट्रूत्वाचे पोषण करीत असते.  दृश्य विषय या द्रष्टा असणाऱ्या जीवाला आकर्षित करतात.

 

याप्रमाणे द्रष्टा व दृश्य यांचे वर्धन होऊन जीव मात्र द्रष्टा-दृश्य-दर्शन या त्रिपुटीच्या व्यवहारामध्ये अडकतो.  द्रष्टा दृश्याला जिवंत ठेवतो आणि दृश्य द्रष्ट्याला जिवंत ठेवते.  जसे दोन चोर असतील तर ते एकमेकांना सावरतात.  कारण त्यामधील एक फुटला तर दुसऱ्याचे सुद्धा पितळ उघडे पडणार, हे दोघांनाही माहीत असते.  म्हणून ते दोघेही एकीने राहतात.  एकाचे अस्तित्व दुसऱ्यावर अवलंबून असते.

 

त्याचप्रमाणे हा सर्व संसार द्रष्टा आणि दृश्य या दोघांच्यावर चाललेला आहे.  जोपर्यंत हे दोघे एकत्र आहेत आणि एकमेकांचे पोषण करीत आहेत, तोपर्यंत जीवाचा संसार जन्मानुजन्मे अखंडपणे चालू राहतो.  द्रष्टा असणारा मी नानाविध दृश्य विषयांना पाहत राहतो.  कामना निर्माण करतो आणि दृश्य विषय या जीवांना आकर्षित करून वर्षानुवर्षे दर्शनादि त्रिपुटीच्या व्यवहारामध्ये बद्ध करतात.

 

मात्र रामा !  द्रष्टा आणि दृश्य यातील एकाचा जरी अभाव झाला तरी आपोआपच दोघांचाही अभाव होतो.  दृश्याचा निरास केला काय किंवा जीवामधील द्रष्ट्रूत्वाचा निरास केला काय, यांपैकी काहीही केले तरी जीवाच्या संसाराचा निरास होऊन एकच अखंड सत्स्वरूप शिल्लक राहते.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ