Tuesday, December 27, 2022

ज्ञानजिज्ञासेचे मूळ | Root Of Curiosity Of Knowledge

 



रामा !  ज्ञानजिज्ञासा सुद्धा सहजासहजी निर्माण होत नाही.  व्यवहारामधील अन्य सर्व गोष्टींचे महत्व नाहीसे होऊन शास्त्रश्रवण करण्याची तळमळ एखाद्याच भाग्यवान मनुष्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते.  अशी तीव्र जिज्ञासा निर्माण होणे म्हणजे जीवाने मागील अनेक जन्मांच्यामध्ये केलेल्या सुकृतांचे फळ आहे.  पूर्वपुण्याईशिवाय शास्त्राचे शब्द कानावर सुद्धा पडत नाहीत.

 

रामा !  तू तर रघुवंशामधील राजपुत्र आहेस.  ऐश्वर्यसंपन्न, सौन्दर्यसंपन्न असून सर्व विषय आणि उपभोग तुझ्या सेवेला सादर सज्ज आहेत.  अशा या यौवनावस्थेमध्ये सुद्धा तुझ्या अंतःकरणामध्ये अतिशय दुर्लभ अशी विरक्ति निर्माण झाली.  त्या वैराग्याचे वर्णन तू पहिल्या प्रकरणामध्ये शेकडो श्लोकांच्यामधून केलेस.

 

रामा !  तुझे हे वैराग्य केवळ शाब्दिक नव्हते, तर विवेकपूर्ण होते.  म्हणून वैराग्य उदयाला आल्यावर तुझ्या मनामध्ये मुमुक्षुत्व म्हणजे ज्ञानजिज्ञासा उत्पन्न झाली.  वैराग्य म्हणजे केवळ घरदार सोडणे किंवा वस्त्र बदलणे नव्हे.  जेथे वैराग्य असेल तेथे जिज्ञासा आवश्यक आहे आणि ज्ञानजिज्ञासा नसेल तर ते वैराग्य साधकाला योग्य दिशेला न नेता अधःपतित करू शकेल.  किंवा असे वैराग्य असेल तर काही काळ साधक घराचा आणि काही विषयांचा त्याग करेल, वस्त्रांचा रंग बदलेल.  परंतु काही काळाने पुन्हा तो संसारमार्गामध्येच प्रवृत्त होईल.

 

म्हणून या मार्गामध्ये वैराग्यप्राप्तीनंतर जिज्ञासा उदयाला येणे, ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.  असे वैराग्य उदयाला आले असेल तर साधकाने समजावे की, आपल्या अनेक जन्मांचे सुकृत फलद्रूप झाले आहे.  त्याचप्रमाणे रामा !  तू मला जो प्रश्न विचारलास यावरून मला समजते की, तुझे पूर्वसुकृत उदयाला आले आहे.  याचा मला खूप आनंद झाला आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ



Tuesday, December 20, 2022

मनाचा मूळ स्वभाव | Natural Propensity of Mind

 



आज जरी चंचलत्व, प्रमाथित्व वगैरे हे दोष मनाचा स्वभाव वाटत असला तरी तो मनाचा स्वभाव नाही.  मनामध्ये जरी चंचलता, क्षोभ वगैरे अनुभवायला येत असतील तरी सुद्धा मनाचा स्वभाव चंचलता वगैरेदि दोष त्याग करून स्थिर होण्याकडेच असतो.  कोणत्या ना कोणत्या तरी साधनाने, बाह्य उपायाने स्थिर होण्याचा, शांत होण्याचा प्रयत्न असतो.  याचाच अर्थ आपल्या स्वस्थितीलाच जाण्याचा मनाचा स्वभाव दिसतो.

 

उदा.  ज्याप्रमाणे शीतलता हा पाण्याचा स्वभाव आहे.  परंतु अग्नीच्या संसर्गाने पाण्याची शीतलता नाहीशी होऊन अग्नीचा दाहकता हा गुण पाण्यामध्ये येतो आणि पाणी उष्ण होते.  हा आपला अनुभव आहे.  परंतु पाणी जरी उष्ण झाले तरी दाहकता किंवा उष्णता हा पाण्याचा स्वभाव किंवा धर्म नाही.  अग्नीच्या संसर्गाने पाण्यामध्ये आलेला तो आगंतुक धर्म आहे.  त्यामुळे त्या आगंतुक धर्माचा त्याग करून पुन्हा आपल्या स्वभावाला जाण्याचा पाण्याचा स्वभाव आहे.  म्हणून पाणी काही वेळानंतर पुन्हा थंड होते.

 

त्याचप्रमाणे मनाचे आहे.  आज जरी मन अत्यंत चंचल, क्षोभकारक वाटत असेल किंवा मनामध्ये अनेक प्रकारची द्वन्द्वे असली तरी सुद्धा ती विषयवासनांच्यामुळे आहेत हे लक्षात ठेवावे.  या सर्व मनाच्या तात्कालिक अवस्था आहेत.  हे समजावून घ्यावे कारण मन आपल्या स्वतःच्या शांत स्थितीला, द्वन्द्वरहित अवस्थेलाच जाण्याचा प्रयत्न करीत असते.  हीच मनाची अंतःस्फूर्त स्वाभाविक प्रवृत्ति दिसते.  हीच मनाची प्रवृत्ति असेल तर चंचलता, अस्थिरता, क्षोभ वगैरे सर्व दोष त्याग करून आपल्या शांत स्वरूपाला जाणे अशक्य नाही.  जरी कठीण असले तरी ते शक्य आहे.

 

याच कारणामुळे भगवान म्हणतात, हे अर्जुना !  मन चंचल आहे यात काहीही संशय नाही.  तरी सुद्धा मनाचा निग्रह करणे शक्य आहे.  त्यासाठी उपाय आहे.  तो तू एकाग्र चित्ताने श्रवण कर.  यावर उपाय म्हणजे वैराग्याचा अभ्यास !  श्रुति, स्मृति आणि युक्ति यांच्या साहाय्याने मागे सांगितल्याप्रमाणे सर्व विषयांचे खरे अंतरंग विवेकाने आणि विचाराने स्पष्टपणे पाहाण्याचा प्रयत्न करावा, विषयांचे अनित्यत्व, दुःखित्व, बध्दत्व आणि मिथ्यात्व पुन्हा पुन्हा जाणावे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, December 13, 2022

वसिष्ठ मुनींचे "ज्ञानावतरण" | Knowledge Incarnation Of Vasishtha Muni

 



विश्वामधील प्रत्येक जीव हा जिज्ञासु आहे.  सर्वचजण आनंदाचे, शांतीचे शोधक व साधक आहेत.  म्हणून रामा !  मी येथे पृथ्वीतलावर आलो आहे.  जोपर्यंत येथे प्राणिमात्र आणि ही भूतपरंपरा आहे तोपर्यंत मी येथे या गुरुशिष्यपरंपरेच्या आणि ज्ञानाच्या रूपाने राहणार आहे.

 

ज्ञानगंगा माझ्या गुरूंच्यापासून म्हणजे ब्रह्मदेवांच्यापासून प्रारंभ झालेली आहे.  ब्रह्मदेव हे केवळ माझे पिता नसून अखिल जगताचे पिता आहेत.  मी त्यांचा प्रथम मानसपुत्र आहे.  याचा मला सार्थ अभिमान आहे.  त्यांनी नियुक्त केल्यामुळेच परमपित्याने जे काही मला सांगितले तेच गुह्य ज्ञान मी जीवांना प्रदान करतो आहे.  रामा !  अध्यात्माच्या आणि ज्ञानाच्या वरवर चर्चा करणे फार सोपे आहे.  परंतु ज्ञानाचा उपदेश देऊन शिष्याला ज्ञानाची अनुभूति देणे, हे अत्यंत अवघड काम आहे.  हे कार्य रामा !  अखंडपणे मी करीत आहे.

 

गुरु हे ज्ञानी पुरुष असून अखंडपणे लोकोद्धाराच्या कार्यामध्ये प्रवृत्त होतात.  परंतु लोकसंग्रहाचे कार्य करीत असताना ज्ञानी पुरुष त्यामध्ये कधीही लिप्त, स्पर्शित आणि विकारयुक्त होत नाहीत.  याचे कारण ज्ञानी पुरुषाला करण्यासारखे, मिळविण्यासारखे काहीही शिल्लक राहत नाही.  सर्व करीत असताना ते पृथ्वीतलावर निःसंग व निर्लिप्त वृत्तीने जगतात.  आपला उपदेश कोणी ऐकत नाही म्हणून त्यांना नैराश्य ही येत नाही.  त्यांचे मन उद्विग्नही होत नाही.  त्यामुळेच आयुष्यभर हजारो लोकांच्यामध्ये कार्य करूनही ज्ञानी पुरुषाचे मन अत्यंत शांत व सुस्थिर राहते.  भगवंतांनी म्हणूनच ज्ञानी पुरुषाला 'स्थितप्रज्ञ' असे संबोधले आहे.

 

वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, "स्थितप्रज्ञ वृत्तीने, शांत चित्ताने रामा !  मी हे सर्व कार्य करीत आहे.  परंतु व्यवहाराच्या दृष्टीने जरी मी ज्ञानदानाचे कार्य करीत असेल तरी रामा !  वस्तुतः पारमार्थिक स्वरूपाने मात्र अहं किञ्चित् अपि न करोमि |  मी काही करीत नाही.  कारण ज्ञान देणे व ज्ञान घेणे हा व्यवहार सुद्धा खरे तर मिथ्या स्वरूपाचा आहे.  अध्यस्त आहे.  ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान-ज्ञान देणारा हे सर्वच तत्त्वस्वरूपामध्ये अध्यस्त स्वरूपाने स्थित आहे.  म्हणून रामा !  तत्त्व हेच एकमेव सत्य आहे.  तेच तत्त्व माझे स्वस्वरूप आहे.  म्हणून मी वस्तुतः अकर्ता, अलिप्त, अस्पर्शित, निर्विकारस्वरूप, चैतन्यस्वरूप आहे."

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, December 6, 2022

भक्ति श्रेष्ठ | Devotion Is The Best

 



कर्म, ज्ञान, योगापेक्षाही भक्ति श्रेष्ठ आहे.  भक्तीने परमेश्वराला सहजपणे प्रसन्न करता येते.  वादविवादाने, योगसामर्थ्याने, तर्कवितर्काने, विचाराने परमेश्वर प्रसन्न होत नाही.  इतकेच नव्हे, तर परमेश्वराशी जवळीक सुद्धा साधता येत नाही.  परमेश्वराजवळ जाण्याचे साधन, त्याला सहज, अनायासाने प्रसन्न करून घेण्याचे साधन म्हणजे अनन्य भक्ति आहे.

 

कर्म, ज्ञान आणि योगसाधनेमध्ये अनेक गोष्टींची आवश्यकता आहे.  कर्मामध्ये वर्णाश्रमाचा विचार आणि त्यानुसार अधिकारित्व येते.  धर्मकर्मात बाह्य सामग्री, धनद्रव्य , वेदमंत्र, ऋत्विक वगैरेंची जरूरी आहे.  इतके करून यज्ञकर्मामध्ये अनेक प्रकारचे प्रत्यवाय दोष निर्माण होतात.  ते प्रतिकूल फळ निर्माण करतात.  ज्ञानप्राप्तीमध्ये साधकामध्ये साधनचतुष्टयसंपत्ति, विवेक, वैराग्य, शमादिषट्क संपत्ति आणि मुमुक्षुत्व असणे आवश्यक आहे.  त्याशिवाय तो ज्ञानाचा अधिकारी होत नाही.  ही संपत्ति प्राप्त करणे अत्यंत दुर्लभ आहे.  त्यानंतर श्रवणमननादि साधना आणि समाधि अभ्यास करणे अत्यंत कठीण आहे.  योगाभ्यासामध्ये इंद्रियांच्यावर संयमन, मनावर संयमन, मनाचा निरोध करण्यासाठी यमनियमांचा कठोर अभ्यास आहे.

 

परंतु भक्तीमध्ये मात्र याप्रकारचे कोणतेही दोष नाहीत.  भक्तीमध्ये अधिकारित्व आहे की नाही याचा विचार नाही.  वर्णाश्रम भेद नाही.  विवेक-वैराग्य, शमदमाची, किंवा यम, नियम, आसन, प्राणायामादि यांचा कठोर अभ्यास नाही.  बाह्य सामग्रीची जरुरी नाही.  वेदपठण, ऋत्वागांची आवश्यकता नाही.  तसेच कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय दोष नाही.  भक्तीमध्ये समर्पण भाव आणि दैन्यता असल्यामुळे अहंकार वाढण्याची शक्यता नाही, कारण अहंकार आणि भक्ति एका ठिकाणी राहू शकत नाही.  म्हणून कर्म, ज्ञान योगापेक्षा भक्ति श्रेष्ठ आहे.

 

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ




Tuesday, November 29, 2022

भारतभूमीमध्ये ज्ञानाचा उपदेश | Knowledge For Bharat

 



ब्रह्मदेवांनी वसिष्ठमुनींना आज्ञा केली.  हे मुने !  हे साधो !  आता तू येथून पुढे पृथ्वीवर जावेस.  पृथ्वीच्या पृष्ठभागावर जम्बुद्वीपामध्ये भारतवर्ष आहे.  त्या अत्यंत पवित्र असणाऱ्या भारतभूमीमध्ये जाऊन तेथील सर्व लोकांच्यावर अनुग्रह करण्याच्या इच्छेने तू त्यांना या गुह्य ज्ञानाचा उपदेश कारावास.

 

ब्रह्मदेवांनी वसिष्ठांना पृथ्वीवरील विशेष स्थान निर्देश करून भारतवर्षामध्ये जाण्याचा आदेश दिला.  याचे कारण भारतभूमि ही अतिशय पवित्र आहे.  'भारत' याचा अर्थ होतो - भायां आत्मविद्यायां रमते इति भारतः I  जो आत्मविद्येमध्ये रमतो तो भारत देश होय.

 

मुळातच या भूमीवर ज्ञानाचे व धर्माचे संस्कार आहेत.  येथे अनेक ऋषि-मुनींनी अवतार घेऊन ज्ञानाचा विस्तार केला आहे.  याच भूमीमध्ये प्रत्यक्ष भगवंतांनी अनेक अवतार घेतले आहेत.  ही वेदांची जन्मभूमी आहे.  या भूमीने कित्येक वेळेला आत्मज्ञानाचे श्रवण केले आहे.  गुरुशिष्यपरंपरा हे तर या भूमीचे वैशिष्ठ्य आणि भूषण आहे.  त्रैलोक्यामध्ये अतिशय दुर्लभ असणाऱ्या आणि राजगुह्य-राजविद्या असणाऱ्या आध्यात्मिक विद्येची ही भूमी आहे.  म्हणून स्वर्गामधील देवदेवता सुद्धा येथे जन्म घेण्याची इच्छा करतात.

 

या पवित्र भूमीमधील लोक आत्मज्ञानाचे अधिकारी आहेत.  म्हणून ब्रह्मदेव वसिष्ठांना भारतवर्षांमध्ये जाण्याचा आदेश देतात.  ब्रह्मदेव वसिष्ठ मुनींना सांगतात की, "हे मुने !  या भारतवर्षामध्ये जाऊन तेथे जे कोणी लोक कर्ममार्गाचे अधिकारी आहेत, त्यांना प्रथम तू कर्मकांडाचा व नंतर क्रमाने ज्ञानाचा उपदेश कर.  तसेच जे विवेक आणि वैराग्यसंपन्न आहेत त्यांना निरतिशय आनंद देणारे ज्ञान तू द्यावेस.

 


- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, November 22, 2022

अज्ञानी, श्रद्धाहीन, संशयी | Ignorant, Faithless, Doubtful

 



जर अज्ञानी किंवा श्रद्धाहीन मनुष्य असला तरी तर्कशुद्ध भाषेने, युक्तीने शास्त्राचे महत्त्व समजावून देऊन काळाच्या ओघामध्ये श्रद्धाहीन मनुष्यामध्ये शास्त्र आणि गुरूंच्याविषयी श्रद्धा निर्माण करता येईल आणि अज्ञानाचा ध्वंस करून ज्ञानाची उदात्त दृष्टि प्राप्त करून देता येईल.  हे प्रयत्नाने शक्य आहे.  परंतु संशयी पुरुषाचे संशय निवारण करणे अत्यंत कठीण आहे.  तो सर्वांच्यामध्ये महापापी आहे.

 

याप्रमाणे अज्ञानी, श्रद्धाहीन आणि संशयी मनुष्य या तिघांनाही विवेकबुद्धि असूनही ज्ञानप्राप्ति होत नाही.  त्यामुळे मोक्षस्वरूपाची निरतिशय शांति प्राप्त होत नाही.  हे तिघेही स्वतःचा नाश करून घेतात.  परंतु या तिघांच्यामध्ये संशयी मनुष्याचा तर अधिक नाश होतो.  त्याला इहलोकही मिळत नाही आणि परलोक सुद्धा प्राप्त होत नाही.  म्हणजेच त्याला ऐहिक विषयसुखही मिळत नाही.  तसेच स्वर्गसुख सुद्धा मिळत नाही.  त्याला काहीच मिळत नाही.  याला कारण संशय वृत्ति होय.

 

संशय हाच सर्व अनर्थांचे बीज आहे.  स्वतःच्या कर्तृत्वाने खूप परिश्रम घेतले तरी केवळ प्रयत्नाने फळ मिळत नाही.  मग ते कर्म व्यावहारिक असो किंवा बौद्धिक असो.  त्यामध्ये दृढ श्रद्धा, निष्ठा असणे आवश्यक आहे.  तसे नसेल तर कितीही चांगले कर्म असले तरी श्रद्धाहीन कर्म हे केवळ शारीरिक कर्म होईल.  त्याचे काही प्रमाणामध्ये व्यावहारिक फळ मिळाले तरी सुद्धा आहार, विहारादि विषयांचा उपभोग घेताना संशयी वृत्तीमुळे त्याला स्वाद किंवा आनंद उपभोगता येत नाही.  विषयसुख उपभोगण्यासाठी आवश्यक अनुकूल मन नसल्यामुळे सुखप्राप्ति होत नाही.  जर या व्यावहारिक जगामध्ये सुख नाही तर स्वर्गसुख तरी कसे मिळणार ?

 

संशयी वृत्तीमुळे अनेक प्रकारचे विकल्प निर्माण होऊन जीव सुखापासून वंचित होतो.  सम्यक ज्ञानाच्या दृष्टीला पारखा होतो.  प्रत्येक विवेकी मनुष्याने सुरुवातीला गुह्य रहस्य समजले नाही, तरीही शास्त्रावर आणि गुरूंच्यावर नितांत श्रद्धा ठेवावी.  तसेच कोणत्याही विधानावर विकल्प न करता संशयरहित मनाने आणि श्रद्धेने गुरुपदेश पुन्हा पुन्हा एकाग्र मनाने श्रवण करावा आणि याच मनुष्यदेहामध्ये निरतिशय शांति प्राप्त करून जीवन परिपूर्ण करावे.  हाच पुरुषार्थ आहे.  हेच मनुष्याचे परमकर्तव्य आहे.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, November 15, 2022

आत्मोद्धाराची साधने – सत्य व तीर्थयात्रा | Means of Self-Upliftment – Truth & Pilgrimage

 



ईश्वराचा अवतार हा केवळ आणि केवळ मनुष्यमात्रासाठीच आहे.  नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप I   अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य महात्मनः II  (श्रीमद्  भागवत)  अव्यय, अप्रमेय, निर्गुण, निर्विशेष असणारा परमात्मा केवळ मनुष्याच्या उद्धारासाठी उपाधि धारण करून सगुण-साकार होतो.  पृथ्वीतलावर अनेक वेळेला अवतार घेतो.  केवळ अवतार घेत नाही, तर ईश्वर मनुष्याच्या उद्धारासाठी बरोबर तपादि साधने उत्पन्न करतो.  म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये तप-धर्म-दान-सत्य-तीर्थयात्रा या सर्वांचे महत्त्व असून ही सर्व साधने अर्थपूर्ण आहेत.

 

सत्य म्हणजे यथार्थ वचन होय.  जसे आहे तसे बोलणे होय.  सत्य बोलणे हा मनुष्याचा आद्य धर्म आहे.  सत्याच्या आधारानेच या पृथ्वीला धारण केले जाते.  सत्याच्या सामर्थ्यानेच सूर्य तप्त होतो, अग्नि जाळण्यास समर्थ होतो, असे सत्याचे महत्त्व अवर्णनीय आहे.  म्हणून मनुष्याने जीवनभर सत्याने वागावे.  सत्याचा कधीही त्याग करू नये.

 

ईश्वराने अनेक तीर्थे निर्माण केली.  तीर्थांच्यामध्ये स्थानमहात्म्य असते.  त्या त्या ठिकाणी जो श्रद्धापूर्वक जाईल आणि दानधर्मादि आचरण करेल त्याला अगणित पुण्यफळ प्राप्त होते.  तीर्थयात्रा म्हणजे पर्यटन नव्हे.  तीर्थयात्रेत आपले मन अत्यंत शुद्ध हवे.  तसेच आपले आचरणही अतिशय शुद्ध व स्वच्छ हवे.  तीर्थाच्या ठिकाणी केलेले पाप हे वज्रलेपाप्रमाणे होते.  म्हणून तीर्थयात्रेला गेल्यावर दुसऱ्याशी भांडण करणे, वैषयिक चर्चा करणे, निंदा-नालस्ती करणे, चोरी करणे, ईश्वराप्रति अश्रद्धेचा भाव निर्माण करणे ही भयंकर पापे आहेत.

 

मात्र जो अतिशय श्रद्धेने तीर्थयात्रा करेल, तेथे दानधर्मादींचे आचरण करेल, ईश्वराचे नामस्मरण करेल, त्यालाच तीर्थयात्रा फलदायी होऊन ईश्वराच्या अस्तित्वाची विशेषत्वाने अनुभूति येऊ शकेल.  तीर्थयात्रेला बाहेर पडल्यामुळे निदान काही प्रमाणात साधकाचे मन रोजच्या व्यवहारापासून, संसाराच्या आसक्तीपासून निवृत्त होऊ शकेल.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, November 8, 2022

गुरुकुलामधील शेवटचा उपदेश | The Take-Away From ‘Gurukul’

 



प्राचीन काळी गुरुकुल परंपरा होती.  लहान मुलांचे उपनयन झाल्यानंतर मुले गुरुगृही जात असत.  गुरुकुलामध्ये काही वर्ष व्रतस्थ राहून अनेक शास्त्रांचे अध्ययन करीत.  अध्ययन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी गुरुकुलामधून पुन्हा घरी येऊन गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करीत.  गुरुकुलामधून घरी जाताना गुरु विद्यार्थ्यांना शेवटचा उपदेश करीत –

 

सत्यं वद |  धर्मं चर |  स्वाध्यायान्मा प्रमदः |

सत्यान्न प्रमदितव्यम् |  धर्मान्न प्रमदितव्यम् |

कुशलान्न प्रमदितव्यम् |  भूत्यै न प्रमदितव्यम् |

स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् |

देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् |

मातृदेवो भव |  पितृदेवो भव |  आचार्यदेवो भव |

अतिथिदेवो भव |  यान्यवद्यानि कर्माणि |

तानि सेवितव्यानि |  नो इतराणि |  यान्यस्माकगं सुचरितानि |

तानि त्वयोपास्यानि ||                                           (तैत्तिरीय उपनिषत्)

 

सत्य बोलावे.  धर्माचे आचरण करावे.  स्वाध्यायामध्ये प्रमाद करू नये.  सत्यामध्ये प्रमाद करू नये.  धर्मामध्ये प्रमाद करू नये.  कुशल सत्कर्मामध्ये प्रमाद करू नये.  ऐश्वर्यप्रद मंगल, पवित्र कर्मांच्यामध्ये प्रमाद करू नये.  स्वाध्याय व प्रवचन यामध्ये प्रमाद करू नये.  देवकार्य व पितृकार्य यामध्ये प्रमाद करू नये.

 

तू मातेला देवाप्रमाणे मानावेस.  पिता, गुरु व अतिथी यांना देखील देवाप्रमाणे मानावे.  निंद्य नसणाऱ्या कर्मामध्येच प्रवृत्त व्हावे.  त्याव्यतिरिक्त कर्मे करू नयेत.  आपल्या गुरुजनांच्या सुचरिताचे अनुसरण करावे.  त्याचीच उपासना करावी.  थोडक्यात, जीवनभर श्रेष्ठ नीतिमूल्यांचेच आचरण करावे.  त्यासाठी शास्त्राला, वेदांनाच प्रमाणभूत मानावे.

 

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ