Tuesday, December 20, 2022

मनाचा मूळ स्वभाव | Natural Propensity of Mind

 



आज जरी चंचलत्व, प्रमाथित्व वगैरे हे दोष मनाचा स्वभाव वाटत असला तरी तो मनाचा स्वभाव नाही.  मनामध्ये जरी चंचलता, क्षोभ वगैरे अनुभवायला येत असतील तरी सुद्धा मनाचा स्वभाव चंचलता वगैरेदि दोष त्याग करून स्थिर होण्याकडेच असतो.  कोणत्या ना कोणत्या तरी साधनाने, बाह्य उपायाने स्थिर होण्याचा, शांत होण्याचा प्रयत्न असतो.  याचाच अर्थ आपल्या स्वस्थितीलाच जाण्याचा मनाचा स्वभाव दिसतो.

 

उदा.  ज्याप्रमाणे शीतलता हा पाण्याचा स्वभाव आहे.  परंतु अग्नीच्या संसर्गाने पाण्याची शीतलता नाहीशी होऊन अग्नीचा दाहकता हा गुण पाण्यामध्ये येतो आणि पाणी उष्ण होते.  हा आपला अनुभव आहे.  परंतु पाणी जरी उष्ण झाले तरी दाहकता किंवा उष्णता हा पाण्याचा स्वभाव किंवा धर्म नाही.  अग्नीच्या संसर्गाने पाण्यामध्ये आलेला तो आगंतुक धर्म आहे.  त्यामुळे त्या आगंतुक धर्माचा त्याग करून पुन्हा आपल्या स्वभावाला जाण्याचा पाण्याचा स्वभाव आहे.  म्हणून पाणी काही वेळानंतर पुन्हा थंड होते.

 

त्याचप्रमाणे मनाचे आहे.  आज जरी मन अत्यंत चंचल, क्षोभकारक वाटत असेल किंवा मनामध्ये अनेक प्रकारची द्वन्द्वे असली तरी सुद्धा ती विषयवासनांच्यामुळे आहेत हे लक्षात ठेवावे.  या सर्व मनाच्या तात्कालिक अवस्था आहेत.  हे समजावून घ्यावे कारण मन आपल्या स्वतःच्या शांत स्थितीला, द्वन्द्वरहित अवस्थेलाच जाण्याचा प्रयत्न करीत असते.  हीच मनाची अंतःस्फूर्त स्वाभाविक प्रवृत्ति दिसते.  हीच मनाची प्रवृत्ति असेल तर चंचलता, अस्थिरता, क्षोभ वगैरे सर्व दोष त्याग करून आपल्या शांत स्वरूपाला जाणे अशक्य नाही.  जरी कठीण असले तरी ते शक्य आहे.

 

याच कारणामुळे भगवान म्हणतात, हे अर्जुना !  मन चंचल आहे यात काहीही संशय नाही.  तरी सुद्धा मनाचा निग्रह करणे शक्य आहे.  त्यासाठी उपाय आहे.  तो तू एकाग्र चित्ताने श्रवण कर.  यावर उपाय म्हणजे वैराग्याचा अभ्यास !  श्रुति, स्मृति आणि युक्ति यांच्या साहाय्याने मागे सांगितल्याप्रमाणे सर्व विषयांचे खरे अंतरंग विवेकाने आणि विचाराने स्पष्टपणे पाहाण्याचा प्रयत्न करावा, विषयांचे अनित्यत्व, दुःखित्व, बध्दत्व आणि मिथ्यात्व पुन्हा पुन्हा जाणावे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ