जर अज्ञानी किंवा श्रद्धाहीन मनुष्य असला
तरी तर्कशुद्ध भाषेने, युक्तीने शास्त्राचे महत्त्व समजावून देऊन काळाच्या ओघामध्ये श्रद्धाहीन मनुष्यामध्ये शास्त्र आणि
गुरूंच्याविषयी श्रद्धा निर्माण करता येईल आणि अज्ञानाचा ध्वंस करून ज्ञानाची
उदात्त दृष्टि प्राप्त करून देता येईल. हे
प्रयत्नाने शक्य आहे. परंतु संशयी
पुरुषाचे संशय निवारण करणे अत्यंत कठीण आहे. तो सर्वांच्यामध्ये महापापी आहे.
याप्रमाणे अज्ञानी, श्रद्धाहीन आणि संशयी
मनुष्य या तिघांनाही विवेकबुद्धि असूनही ज्ञानप्राप्ति होत नाही. त्यामुळे मोक्षस्वरूपाची निरतिशय शांति प्राप्त
होत नाही. हे तिघेही स्वतःचा नाश करून
घेतात. परंतु या तिघांच्यामध्ये
संशयी मनुष्याचा तर अधिक नाश होतो. त्याला
इहलोकही मिळत नाही आणि परलोक सुद्धा प्राप्त होत नाही. म्हणजेच त्याला ऐहिक विषयसुखही मिळत नाही. तसेच स्वर्गसुख सुद्धा मिळत नाही. त्याला काहीच मिळत नाही. याला कारण संशय वृत्ति होय.
संशय हाच सर्व अनर्थांचे बीज आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने खूप परिश्रम घेतले तरी
केवळ प्रयत्नाने फळ मिळत नाही. मग ते कर्म
व्यावहारिक असो किंवा बौद्धिक असो. त्यामध्ये दृढ श्रद्धा, निष्ठा असणे आवश्यक आहे.
तसे नसेल तर कितीही चांगले कर्म असले तरी
श्रद्धाहीन कर्म हे केवळ शारीरिक कर्म होईल. त्याचे काही प्रमाणामध्ये व्यावहारिक फळ मिळाले
तरी सुद्धा आहार, विहारादि विषयांचा उपभोग घेताना संशयी वृत्तीमुळे त्याला स्वाद
किंवा आनंद उपभोगता येत नाही. विषयसुख
उपभोगण्यासाठी आवश्यक अनुकूल मन नसल्यामुळे सुखप्राप्ति होत नाही. जर या व्यावहारिक जगामध्ये सुख नाही तर स्वर्गसुख
तरी कसे मिळणार ?
संशयी वृत्तीमुळे अनेक प्रकारचे विकल्प
निर्माण होऊन जीव सुखापासून वंचित होतो. सम्यक
ज्ञानाच्या दृष्टीला पारखा होतो. प्रत्येक विवेकी मनुष्याने सुरुवातीला गुह्य
रहस्य समजले नाही, तरीही शास्त्रावर आणि गुरूंच्यावर नितांत श्रद्धा ठेवावी. तसेच कोणत्याही विधानावर विकल्प न करता संशयरहित
मनाने आणि श्रद्धेने गुरुपदेश पुन्हा पुन्हा एकाग्र मनाने श्रवण करावा आणि याच
मनुष्यदेहामध्ये निरतिशय शांति प्राप्त करून जीवन परिपूर्ण करावे. हाच पुरुषार्थ आहे. हेच मनुष्याचे परमकर्तव्य आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–