Tuesday, December 13, 2022

वसिष्ठ मुनींचे "ज्ञानावतरण" | Knowledge Incarnation Of Vasishtha Muni

 



विश्वामधील प्रत्येक जीव हा जिज्ञासु आहे.  सर्वचजण आनंदाचे, शांतीचे शोधक व साधक आहेत.  म्हणून रामा !  मी येथे पृथ्वीतलावर आलो आहे.  जोपर्यंत येथे प्राणिमात्र आणि ही भूतपरंपरा आहे तोपर्यंत मी येथे या गुरुशिष्यपरंपरेच्या आणि ज्ञानाच्या रूपाने राहणार आहे.

 

ज्ञानगंगा माझ्या गुरूंच्यापासून म्हणजे ब्रह्मदेवांच्यापासून प्रारंभ झालेली आहे.  ब्रह्मदेव हे केवळ माझे पिता नसून अखिल जगताचे पिता आहेत.  मी त्यांचा प्रथम मानसपुत्र आहे.  याचा मला सार्थ अभिमान आहे.  त्यांनी नियुक्त केल्यामुळेच परमपित्याने जे काही मला सांगितले तेच गुह्य ज्ञान मी जीवांना प्रदान करतो आहे.  रामा !  अध्यात्माच्या आणि ज्ञानाच्या वरवर चर्चा करणे फार सोपे आहे.  परंतु ज्ञानाचा उपदेश देऊन शिष्याला ज्ञानाची अनुभूति देणे, हे अत्यंत अवघड काम आहे.  हे कार्य रामा !  अखंडपणे मी करीत आहे.

 

गुरु हे ज्ञानी पुरुष असून अखंडपणे लोकोद्धाराच्या कार्यामध्ये प्रवृत्त होतात.  परंतु लोकसंग्रहाचे कार्य करीत असताना ज्ञानी पुरुष त्यामध्ये कधीही लिप्त, स्पर्शित आणि विकारयुक्त होत नाहीत.  याचे कारण ज्ञानी पुरुषाला करण्यासारखे, मिळविण्यासारखे काहीही शिल्लक राहत नाही.  सर्व करीत असताना ते पृथ्वीतलावर निःसंग व निर्लिप्त वृत्तीने जगतात.  आपला उपदेश कोणी ऐकत नाही म्हणून त्यांना नैराश्य ही येत नाही.  त्यांचे मन उद्विग्नही होत नाही.  त्यामुळेच आयुष्यभर हजारो लोकांच्यामध्ये कार्य करूनही ज्ञानी पुरुषाचे मन अत्यंत शांत व सुस्थिर राहते.  भगवंतांनी म्हणूनच ज्ञानी पुरुषाला 'स्थितप्रज्ञ' असे संबोधले आहे.

 

वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, "स्थितप्रज्ञ वृत्तीने, शांत चित्ताने रामा !  मी हे सर्व कार्य करीत आहे.  परंतु व्यवहाराच्या दृष्टीने जरी मी ज्ञानदानाचे कार्य करीत असेल तरी रामा !  वस्तुतः पारमार्थिक स्वरूपाने मात्र अहं किञ्चित् अपि न करोमि |  मी काही करीत नाही.  कारण ज्ञान देणे व ज्ञान घेणे हा व्यवहार सुद्धा खरे तर मिथ्या स्वरूपाचा आहे.  अध्यस्त आहे.  ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान-ज्ञान देणारा हे सर्वच तत्त्वस्वरूपामध्ये अध्यस्त स्वरूपाने स्थित आहे.  म्हणून रामा !  तत्त्व हेच एकमेव सत्य आहे.  तेच तत्त्व माझे स्वस्वरूप आहे.  म्हणून मी वस्तुतः अकर्ता, अलिप्त, अस्पर्शित, निर्विकारस्वरूप, चैतन्यस्वरूप आहे."

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ