Tuesday, September 29, 2015

अविनय | Impoliteness



मनुष्य विश्वामध्ये व्यवहार करीत असताना अन्य व्यक्ति, विषय, सृष्टि यांच्याशी तर उद्धटपणे वागतोच.  परंतु मनुष्याचा सर्वात जास्त अविनय हा स्वतःशीच आहे.  मनुष्य सर्वात जास्त उद्धट स्वतःबरोबर आहे.

मनुष्य बुद्धि, मन, इंद्रिये व वाणी या चार स्तरांच्यावर जीवन जगत असतो.  प्रत्येक मनुष्याला स्वभावतःच सद्सद्विवेकबुद्धि प्राप्त झालेली आहे.  योग्य-अयोग्य, चांगले-वाईट, धर्म-अधर्म, न्याय-अन्याय, नीति-अनीति यांचा निर्णय घेण्याची क्षमता बुद्धीमध्ये असते.  आपण बुद्धीच्या साहाय्याने निर्णय घेतो.  मात्र तोच निर्णय जेव्हा मनाच्या स्तरावर येतो, तेव्हा आपणच त्या निर्णयावर संकल्प-विकल्प करतो.  उदा. आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बुद्धीने रोज सकाळी लवकर उठण्याचा निर्णय घेतो.  मात्र आपलेच मन त्यावर दुसऱ्या क्षणी विकल्प करते.  खरोखरच आपल्याला जमेल का ?  त्यापेक्षा ठरवायलाच नको.  याप्रमाणे आपले मन आपल्या बुद्धीच्या निर्णयाची सर्व शक्ति काढून घेते.  माझेच मन माझ्याच बुद्धीला आदर देत नाही.  हाच मोठा अविनय आहे.  मन माझ्या बुद्धीशी उद्धटपणे वागते.

कळतं पण वळत नाही. माझ्या बुद्धीचा निर्णय माझंच मन ऐकत नाही.  माझे मन माझ्याच आज्ञा उल्लंघून टाकते.  हा माझ्यामधील फार मोठा स्वतःशीच असलेला अविनय व उद्धटपणा आहे.  माझ्यामधील हा अभिमान माझ्या बुद्धीला झुगारून देतो.  सर्व तत्त्वज्ञान बाजूला ठेवतो.  मन मानेल तसे वागतो.

मनुष्याच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या अनंत कामना, विषयभोगवासना, कनक-कांचन-कामिनी यांचा लोभ आणि या सर्वांच्या मागे असणारा अभिमान मनुष्याला धर्मापासून च्युत करतो.  मनुष्याला एका तत्त्वनिष्ठ चांगल्या जीवनापासून दूर घेऊन जातो.  म्हणूनच आचार्य प्रार्थना करतात – अविनयं अपनय विष्णो |  हे सर्वव्यापक असणाऱ्या विष्णो !  माझ्यामधील अभिमान दूर कर.


- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, महाशिवरात्री  २०१३
- Reference: "
Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013


- हरी ॐ

Tuesday, September 22, 2015

वेदान्तशास्त्र – वाद आणि चर्चा | Vedanta - Debate & Discussion


साधकाने निकोप चर्चा करावी.  चर्चा करताना दोघांची जिज्ञासू वृत्ति असते. स्वतःला जे समजले नाही ते दुसऱ्याकडून समजावून, जाणून घेण्याची वृत्ति असते. त्यामुळे जिज्ञासा व ज्ञान दोन्ही हळुहळू वाढतात.  अशा चर्चेतून आपले दोष आपल्याला कळतात.  अशा निकोप चर्चेत मी व माझ्या कल्पनांची आग्रही, हेकेखोर वृत्ति राहत नाही.  चुकीच्या कल्पना व गैरसमज असतील तर ते चर्चेत टाकून देण्याची मनाची तयारी असते आणि त्याचबरोबर जे दुसऱ्याचे बरोबर अथवा  चांगले आहे, ते स्वीकारण्याचा प्रयत्न असतो.

उलट वितंडवादात दोघांनाही जिज्ञासा नसते, मुळात समजावून घेण्याची वृत्ति नसते.  एकाने मुद्दा मांडला की, तो प्रथम स्वतःच्या पूर्वग्रहदूषित चुकीच्या कल्पनांच्या पार्श्वभूमीवरून मांडला जातो.  त्यावर दुसरा केवळ विरोध करावयाचा या हेतूने विरुद्ध मुद्दा मांडतो.  वादात तर्काऐवजी कुतर्क घालून वाद घालतात.  तेथे तत्त्वजिज्ञासा नसते.  व्यर्थ वाद घालणारा स्वतःच्या मनाचे सर्व दरवाजे घट्ट बंद करून घेतो.  त्याची कूपमंडुक वृत्ति असते.  अशा व्यक्तीला Fanatic म्हणतात.

ब्रह्मज्ञानी पुरुष वेदान्तातील अत्युच्च तत्त्वज्ञान सहजासहजी कोणालाही देण्यास तयार नसतात.  खऱ्या तत्त्वजिज्ञासूने वितंडवादाचा त्याग करावा.  त्याने तत्त्वप्राप्तीसाठी सतत तीव्र जिज्ञासा व समजावून घेण्याची वृत्ति ठेवावी.  विद्वानाशी वादविवाद करून कदाचित तात्कालिक समाधान मिळेल, पण त्या समाधानाची किंमत शून्य आहे.  सत्याचे खंडन कोणीही करू शकत नाही.

हजारो वर्षे हा वेदान्ताचा संप्रदाय आजपर्यंत चालत आला आहे व पुढेही हा संप्रदाय असाच अव्याहत चालू राहणार आहे.  त्याचे अध्ययन आणि अध्यापन गुरु-शिष्य परंपरेने चालणार आहे.  यावरून स्पष्ट होते की या सनातन धर्माच्या शास्त्रात निश्चित तथ्य आहे.  या शास्त्रात कोणताच दोष नाही.  दोष आमच्या, साधकाच्या मनोवृत्तीत आहे.  त्यामुळे निष्फळ वादात तत्त्वानुभूति बाजूलाच राहते आणि साधक दुसऱ्याच मार्गात अडकतो.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

Monday, September 14, 2015

युक्त आहार | The Right Food


मनुष्य जे अन्न सेवन करतो, त्यातील स्थूल भागाने शरीराचे पोषण होते.  आणि त्याने रक्त, चरबी, अस्थि, मांस, मज्जा हे घटक तयार होतात.  अन्नातील दुसऱ्या सूक्ष्म भागाने मन तयार होते.  अन्नाच्या गुणधर्माचा मनावर परिणाम होतो असे शास्त्र सांगते.

मुख्यतः अन्नाचा उद्देश एकच – शुद्ध, सत्वगुणप्रधान मन व्हावे.  मनोवृत्ति अधिकाधिक प्रमाणात सात्विक, अंतर्मुख, चिंतनशील व्हावी यासाठी साधना आहे.  मनातील रजोगुण व तमोगुण हे अत्यंत स्वाभाविक गुण असून त्यांचे प्रचंड प्राबल्य आपल्या मनावर आढळून येते आणि त्या गुणानुसार काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपूंचे विकार उत्तेजित होतात.  मनाचा क्षोभ, संताप वाढून वृत्ति बहिर्मुख होते.  तमोगुणवृत्ति वृद्धिंगत होते.  साधकाच्या अंतःकरणशुद्धि, श्रवण, मनन, निदिध्यासना व आत्मचिंतन या सर्व साधनेत फार मोठे प्रतिबंध निर्माण करतात.

यासाठी दक्षता म्हणून नियोजनपूर्वक अन्नसेवनाने रजोगुण व तमोगुणाचे प्राबल्य कमी केले पाहिजे.  शरीर, इन्द्रिय व मनाचा दाह व क्षोभ न होता, मन नित्य शांत, तृप्त व प्रसन्न राहील, तसेच शरीर स्वस्थ राहील असा, योग्य प्रमाणात सात्विक आहार साधकाने घ्यावा.  अतिशय चमचमीत, तेलयुक्त, मसालेदार, खूप तिखट व गरमागरम अन्न सेवन करू नये.  खूप गोड पदार्थ खाल्ल्याने मन सुंद होते.  शरीराला जडत्व येते.  शरीराची चपलता व मनाची अंतरिक सावधानता संपुष्टात येऊन आकलनशक्ति काम करेनाशी होते.  मग साधक विवेक, वैराग्य, दैवीगुणसंपत्ति हे गुण कसे अंगी बाणविणार ?

मन हे अति चंचल असल्याने पुन्हा पुन्हा अभ्यासाने अत्यंत आवश्यक गुणांना म्हणजेच, साधनचतुष्टय प्राप्त करणे हे फार कष्टसाध्य आहे.  त्यामुळे प्रथम सत्त्वगुणवृद्धीसाठी शुद्ध, सात्विक आहार अत्यंत आवश्यक आहे.  शरीर व मन सदैव दक्ष, सावध राहील असा शरीराला आवश्यक, संतुलित आहार योग्य प्रमाणात घ्यावा.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

Tuesday, September 8, 2015

व्यक्तिगत चातुर्वर्ण्य व्यवस्था | Personal Pre-Dispositions


व्यक्तिगत स्थारावारही चातुर्वर्ण्य व्यवस्था दिसते.  कोणताही मनुष्य चोवीस तास एकच वर्णाचा राहू शकत नाही.  दैनंदिन जीवनातही आपण दिवसाचा काही काळ ब्राह्मण, काही काळ क्षत्रिय तर काही काळ वैश्य आणि शूद्र असतो.  प्रत्येक मनुष्य हा गुणप्राधान्याने या चारही वर्णांचे अनुसरण करतो.

प्रत्येक जण हा स्वभावाला वश असतो.  जन्माने प्राप्त झालेली जात ही मनाची वृत्ति किंवा मनुष्याचे कर्म ठरवीत नाही.  जात किंवा कर्म बदलून माणूस बदलू शकत नाही.  मनुष्य कोणते कर्म करतो यापेक्षा ते कसे करतो, याला अधिक महत्व आहे.  बहिरंगाने श्रेष्ठ असणाऱ्या कर्मामागे राग, द्वेष, अहंकार असेल तर ते निकृष्ठ होईल आणि याउलट झाडू मारण्यासारख्या बहिरंगाने निकृष्ठ असणाऱ्या कार्मामागे सेवेचा, भक्तीचा शुद्ध भाव असेल तर ते कर्म सर्वोत्कृष्ट होऊ शकते.  इतकेच नव्हे, तर ते कर्म साधकाला अंतःकरणाच्या शुद्धीचे साधन होऊन मोक्षाचेही साधन होऊ शकते.  प्रत्यक्ष कोणतेही कर्म हे उत्कृष्ट किंवा निकृष्ट नाही तर ते कोणत्या भावाने केले जाते, यावरच त्या कर्माची श्रेष्ठता अवलंबून आहे.

सर्व संत हे जन्माने ब्राह्मण नव्हते पण त्यांच्या कर्मांनी, गुणांनी ते श्रेष्ठ ठरले.  म्हणूनच प्रत्येकाने तमोगुण आणि रजोगुणाचा प्रभाव कमी करून सत्वगुणाचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  म्हणजेच, शूद्रापासून क्रमाने ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  याचा अर्थच प्रत्येक मनुष्य – मग तो कोणत्याही वर्णाचा, जातीचा, पंथाचा असो, स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब कोणताही असो, तो गुणवृत्तीने ब्राह्मण होऊ शकतो.  प्रत्येक मनुष्याला ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

यावरून सिद्ध होत की, चातुर्वर्ण्य हा वस्तुतः समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी अथवा समाजाच्या अधःपतनासाठी सांगितलेला नसून प्रत्येक व्यक्तीच्या उद्धारासाठी सांगितलेला आहे.


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006



- हरी ॐ

Tuesday, September 1, 2015

चातुर्वर्ण्य | Four Pre-Dispositions


चातुर्वर्ण्य वेदाला मान्य आहे. चातुर्वर्ण्य हा केवळ हिंदु धर्मापुरता मर्यादित नाही.  चातुर्वर्ण्य हा मानवजातीमध्ये भेद पाडण्यासाठी सांगितलेला नसून मानवजातीच्या विकासासाठी सांगितला आहे.  विभाजनासाठी नसून उत्कर्षासाठी सांगितला आहे.  यामुळे मनुष्य अत्यंत निकृष्ठ अवस्थेपासून उत्कृष्ठ अवस्थेपर्यंत जाऊ शकतो.  हे भेद जन्मानुसार केलेले नाहीत.  जन्माने सर्वच जीव शूद्र, कनिष्ठ आहेत.  उपनयन संस्कारामुळे जीवाला द्विजत्व प्राप्त होते.  ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण केवळ जन्माने ठरत नसून मनुष्याच्या गुणवृत्तीने ठरतात.

ब्राह्मण म्हणजे केवळ ब्राह्मण कुळात जन्मलेला नव्हे.  जीवनामध्ये आचारसंहिता अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मनुष्यावर आई, वडील आणि गुरु यांचे संस्कार झाले पाहिजेत.  अशा सुसंस्कृत मनुष्यामध्येच ब्राह्मणत्वाचा आविष्कार दिसतो.  केवळ यज्ञोपवीत धारण केलेला अथवा पूजाअर्चा करणारा ब्राह्मण होऊ शकत नाही.  जो अर्वाच्य भाषण, दुसऱ्याचे चारित्र्यहनन, अभक्ष्य भक्षण, अपेय पान करतो, तो शूद्रापेक्षाही शूद्र आहे.  जो वेदांचे पठन, अध्ययन करेल, जो पूर्वोक्त अमानित्वादि गुणांनी युक्त असेल, तो ब्राह्मण आहे.

बाहूचे असणारे गुण म्हणजेच वीर्य, शक्ति आहेत.  क्षत्रियामध्ये धैर्य, त्याग, आत्मविश्वास, निष्ठा, समर्पण हे गुण असतात.  वैश्य हा मध्यम गुणांचा अधिकारी असतो.  तो कृषिवाणिज्यादि व्यापार करणारा असतो.  शूद्र हा बुद्धीने मंद, जड असतो.  तो स्वतःची बुद्धि मुळीच वापरत नाही.  तो पोटासाठी दुसऱ्यांची नोकरी करतो.  तो दुसऱ्यांवर अवलंबून असतो.  उदरभरण एवढेच त्याचे ध्येय असते.  तो परिचर्या, शिल्पकलादि कलांच्यामध्ये निपुण असतो.  उदरभरण, प्रजोत्पत्ति यापेक्षा आयुष्यात दुसरा काही पुरुषार्थ आहे, याची त्याला सुतराम कल्पना, जाणीवच नसते.

अशा प्रकारे, सत्वरजतम या त्रिगुणांच्यामधून हे चार वर्ण निर्माण झाले.  हे चार वर्ण नसून मनुष्याच्या चार वृत्ति आहेत.  समाजामध्ये समन्वय, सुसूत्रता, सुसंगति निर्माण होण्यासाठी या चारही वर्णांची आवश्यकता आहे.

- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006


- हरी ॐ