Showing posts with label Diet. Show all posts
Showing posts with label Diet. Show all posts

Tuesday, August 22, 2017

स्वादिष्ट अन्नाच्या समस्या | Problems with Tasty Food


स्वाद्वन्नं न तु याच्यताम् |

जिज्ञासु साधकाने स्वादु अन्नाची याचना करू नये किंवा स्वादु अन्नप्राप्तीचे प्रयत्नही करू नयेत.  स्वादु म्हणजे मिष्टान्न किंवा चविष्ट, स्वादिष्ट, चमचमीत अन्नपदार्थ.  अशा अन्नाने जिभेला मिष्टान्न किंवा स्वादिष्ट अन्नाची चटक लागते व त्यामुळे अशा पदार्थांची रोज साधक याचना किंवा प्रार्थना करतो.  म्हणजेच साधक जिभेच्या आहारी जातो.  

दुसरे असे की नेहमी मन अशा चविष्ट व गोड पदार्थांचे चिंतन करू लागते कारण त्या पदार्थांबद्दल मनामध्ये विशिष्ट प्रकारचे प्रेम निर्माण झालेले असते.  त्या चिंतनातून पदार्थांची कामना निर्माण होते व साहजिकच मन बहिर्मुख होऊ लागते.  त्यातूनच विशिष्ट अन्नाची प्रीति निर्माण झाल्यावर, इतर पदार्थ असूनही त्यांचा स्वीकार करण्यास मन तयार होत नाही.  त्या इतर पदार्थाबद्दल मनात तिरस्कार व अव्हेराची भावना उद्भवते.  

यातूनच पुढे अन्नाने शरीराचे पोषण, वर्धन व रक्षण बाजूला राहून त्याऐवजी प्रीति-अप्रीति किंवा राग-द्वेष सतत मनात वास करतात.  त्यामुळे मनात क्रोध, क्षोभ, द्वेष अनावर होतात व अन्न ग्रहण करताना मन आनंदी व प्रसन्न राहू शकत नाही.  हे चमचमीत पदार्थ शरीरात जडत्व निर्माण करतात आणि रजोगुण व तमोगुण वृद्धिंगत होतात.  बुद्धीची सूक्ष्मता, तीक्ष्णता, तीव्रता कमी होते.  ज्ञानग्रहणशक्ति कमी होते.  अशा व्यक्तीला विवेक, वैराग्य व षटसंपत्ति प्राप्त होणे कधीही शक्य नाही.  

आत्मप्राप्तीच्या साधनेसाठी प्रचंड मोठे इंद्रियसंयमन, मनसंयमन सर्वप्रथम आवश्यक असते.  त्यामुळे अयोग्य प्रकारच्या आहारामुळे वृत्ति तमोगुणप्रधान झाल्याने श्रवण, मनानादि साधना शक्य होत नाही.  विशिष्ट प्रकारच्या मनाच्या धारणेसाठी उपयुक्त असलेला आहार आवश्यक असल्याने आचार्य - स्वाद्वन्नं न तु याच्यताम् |  ही साधना साधकाला करावयास सांगतात.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ


Monday, September 14, 2015

युक्त आहार | The Right Food


मनुष्य जे अन्न सेवन करतो, त्यातील स्थूल भागाने शरीराचे पोषण होते.  आणि त्याने रक्त, चरबी, अस्थि, मांस, मज्जा हे घटक तयार होतात.  अन्नातील दुसऱ्या सूक्ष्म भागाने मन तयार होते.  अन्नाच्या गुणधर्माचा मनावर परिणाम होतो असे शास्त्र सांगते.

मुख्यतः अन्नाचा उद्देश एकच – शुद्ध, सत्वगुणप्रधान मन व्हावे.  मनोवृत्ति अधिकाधिक प्रमाणात सात्विक, अंतर्मुख, चिंतनशील व्हावी यासाठी साधना आहे.  मनातील रजोगुण व तमोगुण हे अत्यंत स्वाभाविक गुण असून त्यांचे प्रचंड प्राबल्य आपल्या मनावर आढळून येते आणि त्या गुणानुसार काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपूंचे विकार उत्तेजित होतात.  मनाचा क्षोभ, संताप वाढून वृत्ति बहिर्मुख होते.  तमोगुणवृत्ति वृद्धिंगत होते.  साधकाच्या अंतःकरणशुद्धि, श्रवण, मनन, निदिध्यासना व आत्मचिंतन या सर्व साधनेत फार मोठे प्रतिबंध निर्माण करतात.

यासाठी दक्षता म्हणून नियोजनपूर्वक अन्नसेवनाने रजोगुण व तमोगुणाचे प्राबल्य कमी केले पाहिजे.  शरीर, इन्द्रिय व मनाचा दाह व क्षोभ न होता, मन नित्य शांत, तृप्त व प्रसन्न राहील, तसेच शरीर स्वस्थ राहील असा, योग्य प्रमाणात सात्विक आहार साधकाने घ्यावा.  अतिशय चमचमीत, तेलयुक्त, मसालेदार, खूप तिखट व गरमागरम अन्न सेवन करू नये.  खूप गोड पदार्थ खाल्ल्याने मन सुंद होते.  शरीराला जडत्व येते.  शरीराची चपलता व मनाची अंतरिक सावधानता संपुष्टात येऊन आकलनशक्ति काम करेनाशी होते.  मग साधक विवेक, वैराग्य, दैवीगुणसंपत्ति हे गुण कसे अंगी बाणविणार ?

मन हे अति चंचल असल्याने पुन्हा पुन्हा अभ्यासाने अत्यंत आवश्यक गुणांना म्हणजेच, साधनचतुष्टय प्राप्त करणे हे फार कष्टसाध्य आहे.  त्यामुळे प्रथम सत्त्वगुणवृद्धीसाठी शुद्ध, सात्विक आहार अत्यंत आवश्यक आहे.  शरीर व मन सदैव दक्ष, सावध राहील असा शरीराला आवश्यक, संतुलित आहार योग्य प्रमाणात घ्यावा.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ