साधकाने
निकोप चर्चा करावी. चर्चा करताना दोघांची
जिज्ञासू वृत्ति असते. स्वतःला जे समजले नाही ते दुसऱ्याकडून समजावून, जाणून
घेण्याची वृत्ति असते. त्यामुळे जिज्ञासा व ज्ञान दोन्ही हळुहळू वाढतात. अशा चर्चेतून आपले दोष आपल्याला कळतात. अशा निकोप चर्चेत मी व माझ्या कल्पनांची आग्रही,
हेकेखोर वृत्ति राहत नाही. चुकीच्या
कल्पना व गैरसमज असतील तर ते चर्चेत टाकून देण्याची मनाची तयारी असते आणि
त्याचबरोबर जे दुसऱ्याचे बरोबर अथवा
चांगले आहे, ते स्वीकारण्याचा प्रयत्न असतो.
उलट
वितंडवादात दोघांनाही जिज्ञासा नसते, मुळात समजावून घेण्याची वृत्ति नसते. एकाने मुद्दा मांडला की, तो प्रथम स्वतःच्या
पूर्वग्रहदूषित चुकीच्या कल्पनांच्या पार्श्वभूमीवरून मांडला जातो. त्यावर दुसरा केवळ विरोध करावयाचा या हेतूने
विरुद्ध मुद्दा मांडतो. वादात
तर्काऐवजी कुतर्क घालून वाद घालतात. तेथे
तत्त्वजिज्ञासा नसते. व्यर्थ वाद घालणारा
स्वतःच्या मनाचे सर्व दरवाजे घट्ट बंद करून घेतो. त्याची कूपमंडुक वृत्ति असते. अशा व्यक्तीला Fanatic म्हणतात.
ब्रह्मज्ञानी
पुरुष वेदान्तातील अत्युच्च तत्त्वज्ञान सहजासहजी कोणालाही देण्यास तयार नसतात. खऱ्या तत्त्वजिज्ञासूने वितंडवादाचा त्याग
करावा. त्याने तत्त्वप्राप्तीसाठी सतत
तीव्र जिज्ञासा व समजावून घेण्याची वृत्ति ठेवावी. विद्वानाशी वादविवाद करून कदाचित तात्कालिक
समाधान मिळेल, पण त्या समाधानाची किंमत शून्य आहे. सत्याचे खंडन कोणीही करू शकत नाही.
हजारो
वर्षे हा वेदान्ताचा संप्रदाय आजपर्यंत चालत आला आहे व पुढेही हा संप्रदाय असाच
अव्याहत चालू राहणार आहे. त्याचे अध्ययन
आणि अध्यापन गुरु-शिष्य परंपरेने चालणार आहे. यावरून स्पष्ट होते की या सनातन धर्माच्या
शास्त्रात निश्चित तथ्य आहे. या शास्त्रात
कोणताच दोष नाही. दोष आमच्या, साधकाच्या
मनोवृत्तीत आहे. त्यामुळे निष्फळ
वादात तत्त्वानुभूति बाजूलाच राहते आणि साधक दुसऱ्याच मार्गात अडकतो.
- "साधना
पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, September 2005
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, September 2005
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment