हे राघवा ! जे विषयवृत्तिरहित आहे, जे सामान्यतेने सर्वव्यापी
आहे, तेच अनिर्वचनीय असणारे तत्त्व म्हणजे आत्मा असून त्यालाच परमेश्वर असे म्हणतात.
आत्मस्वरूपामध्ये विषयवृत्ति, अविद्या, सर्व
कल्पना, सर्व मर्यादा, सर्व शब्द यांचा अत्यंत अभाव आहे. हे निष्पाप रामा ! ब्रह्मदेवापासून स्तंबापर्यंत गवत वगैरेदी हे सर्व
जग, सदासर्वदा सर्वकाळी आत्मस्वरूपच आहे. त्यामुळे अविद्या येथे कोठेही कधीही कशीही
लेशमात्रही अस्तित्वात नाही. हे संपूर्ण दृश्य
जग निश्चितच ब्रह्म स्वरूप आहे. ते नित्य चिद्घन,
क्षतिरहित, अविनाशी आहे. या स्वरूपामध्ये मन
नावाची कोणतीही कल्पना मुळीच अस्तित्वात नाही.
नित्य, सर्वव्यापी, शुद्ध, चिन्मात्र,
निरुपद्रवी, शांत, समभावाने युक्त असलेल्या निर्विकार आत्मस्वरूपामध्ये जी वृत्ति चैतन्याच्या
स्वभावाच्या विरुद्ध असणाऱ्या विषयांची कल्पना करून विषयांच्या मागे धावते, अशा त्या
अशुद्ध, म्लान वृत्तीलाच 'मन' असे म्हणतात.
खरे तर एक, अद्वय, सर्वव्यापी व
शांत असणाऱ्या परमात्म्यामध्ये ही अविद्या अस्तित्वातच नसते. तर ती केवळ संकल्प मात्राने उत्पन्न झाल्यासारखी
वाटते. हे रामा ! ही अविद्या संकल्पामधूनच उत्पन्न झालेली असल्यामुळे
ती संकल्पानेच नष्टही होते.
हे रामा ! 'मी ब्रह्मस्वरूप नाही' या अतिदृढ संकल्पामुळे
मन बद्ध होते, तर 'हे सर्व ब्रह्मस्वरूपच आहे' या दृढ संकल्पामुळे मन मुक्त होते. म्हणून बंधन व मोक्ष हे दोन्हीही संकल्पावरच अवलंबून
आहेत. संकल्प हेच परम बंधन असून संकल्पांचा
त्याग म्हणजेच मुक्ती आहे. म्हणून संकल्पांच्यावर
विजय मिळवून साधकाने संकल्परहित होण्याचा प्रयत्न करावा. हे राघवा ! याप्रमाणे तू संकल्पांच्यावर विजय मिळव व नंतर तुझ्या
इच्छेप्रमाणे, तुला जे करायचे ते तू कर !
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami
Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti
2022
- हरी ॐ–

