वस्तुतः ब्रह्माला कोणतेही कारण
नाही आणि ब्रह्म हे सुद्धा कशाचेही कारण होऊ शकत नाही. कारण ब्रह्माव्यतिरिक्त दुसरी वस्तुच अस्तित्वामध्ये
नाही. परंतु तरीही श्रुति
ब्रह्मस्वरूपामध्ये जगत्कारणत्वाचा आरोप करतात. याचे कारण साधकाला दृश्य जग माहीत आहे. त्याच जगताच्या साहाय्याने जगताच्या अतीत असणाऱ्या
परब्रह्मस्वरूपाचे ज्ञान देता येते. ते
समजावे म्हणून सोने-अलंकाराचा दृष्टांत दिला आहे. किंवा रज्जु-सर्पाच्या दृष्टांतामध्येही अज्ञानी
पुरुषाला साप दिसतो. म्हणून साप दोरीमधून निर्माण
झाला असे विधान केले जाते. परंतु दोरी हे सापाचे
कारण होऊ शकत नाही. कारण वस्तुतः साप निर्माण
झालाच नाही.
म्हणून बुद्धिमान पुरुषाने दृष्टांताचे संपूर्ण
ग्रहण करू नये किंवा दृष्टांताचा पूर्णतः त्यागही करू नये. दृष्टांताबद्दल कोणताही कुतर्क करून गुरूंच्याबरोबर
वाद घालू नये. तर साधकाने दृष्टांत आणि दार्ष्टांत
यामधील थोडेफार जे काही साधर्म्य आहे, त्याच्या साहाय्याने दार्ष्टांत समजावून घ्यावा
आणि अन्य अंशाचा व कुतर्कांचा त्याग करावा. दृष्टांत आणि दार्ष्टांत यामध्ये काही अंशीच साम्य
असते. त्यामध्ये पूर्णांशाने साम्य असू शकत
नाही. त्यामुळे पूर्ण दृष्टांताचा तेथे काही
उपयोग नसतो.
जसे आपणास अंधकारामधील वस्तु पाहावयाच्या
असतील तर आपण हातात दिवा घेतो. दिवा हे प्रकाशाचे
साधन आहे. दिव्यातील वाट, तेल, वगैरेदि या
साधनांचा प्रत्यक्ष अंधाराचा नाश करण्यासाठी काहीही उपयोग नसतो. तसेच दार्ष्टांत समजण्यासाठी दृष्टांताचा फक्त काही
भागच आवश्यक असतो. असे असेल तरी आपल्याला
वात, तेल यांसहित दिवा लागतो. तसेच दृष्टांत
आणि दार्ष्टांत यांच्यामध्ये अगदी अंशतः साम्य असेल तरी त्या दृष्टांताचा त्या दिव्याप्रमाणे
ज्ञानासाठी निश्चितच उपयोग होतो. साधकाला दृष्टांताच्या
साहाय्याने वेदांच्यामधील - अहं ब्रह्मास्मि | तत्त्वमसि | प्रज्ञानं ब्रह्म | अयमात्मा ब्रह्म | या महावाक्यांच्यामधून जीवब्रह्मैक्यज्ञान प्राप्त
होते. साधकाने दृष्टांतापेक्षा आपले मन ज्ञानामध्ये
ठेवावे.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–

