Monday, January 29, 2024

फक्त भक्तीचाच आश्रय घ्यावा | Take Refuge In Devotion Alone

 




शास्त्रामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान अशा प्रकारची अनेक साधने दिलेली असली तरीही अत्यंत दुःखनिवृत्ति आणि निरतिशय आनंदप्राप्तीसाठी अन्य साधनांचा त्याग करून फक्त भक्तीचाच आश्रय घ्यावा.  याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१) भक्तिशास्त्रामध्ये भगवंतावर प्रेम करण्यासाठी विशिष्ट अधिकाऱ्याची जरुरी नाही.

२) कर्म, ज्ञान, योग यांच्याप्रमाणे भक्तीमध्ये अन्य साधनांची अपेक्षा नाही.  ती स्वतःफलरूप आहे.

३) अन्य मार्गामध्ये अनेक प्रतिबंध आणि प्रत्यवाय दोष निर्माण होतात.  त्याप्रमाणे भक्तीमध्ये प्रतिबंध आणि दोष नाहीत.

४) अन्य मार्गामध्ये अहंकार, दंभ, दर्प निर्माण होण्याची शक्यता आहे.  भक्तीमध्ये अहंकाराचा नाश होऊन समर्पण वृत्ति निर्माण होते. भक्ति आणि अहंकार एकाच ठिकाणी असू शकत नाही.

५. अन्य मार्गाने अंतःकरणशुद्धि, मनःसंयमन, मनाची एकाग्रता वगैरेंसाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात.  इतके करूनही निराशा येते.  परंतु भक्तीमध्ये हे सर्व सहज, विशेष परिश्रम न करता भक्ताला मिळते.

६) अन्य मार्गामध्ये साधन आणि साध्य भिन्न आहे.  त्यामुळे फळ कालांतराने मिळते.  भक्तीमध्ये भक्ति हेच साधन आणि भक्ति हेच साध्य आहे.  त्यामुळे भक्तीचे फळ कालांतराने नसून तात्काळ प्राप्त होते.

७) केवळ ज्ञान वगैरे साधनांनी परमेश्वराशी जवळीक निर्माण होत नाही.  तर उलट प्रेमाने ईश्वराशी अत्यंत जवळीक निर्माण होते.  अनन्य भक्तीने परमेश्वर सहज प्रसन्न होतो.

८) भक्ति भक्तीचे संवर्धन करते आणि भक्ताला अत्यंत सहजपणे ईश्वराभिमुख करून ईश्वरस्वरूपापर्यंत नेते.

९) परमेश्वराला अनन्यतेने शरण जात असल्यामुळे भक्त स्वतःकडे कोणत्याही प्रकारचे कर्तृत्व किंवा पुरुषार्थ घेत नाही.  तो संपूर्ण ईश्वराधीन असतो.  त्यामुळे मार्जारन्यायाप्रमाणे परमेश्वर स्वतःच भक्ताचे रक्षण करतो, योगक्षेम चालवितो.  नव्हे, तो भक्ताचा संसारामधून उद्धार करतो.

या सर्व कारणांमुळे भक्ति ही कर्म, ज्ञान, योग यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.  म्हणून मुमुक्षूंनी अन्य सर्व साधनांचा आश्रय न घेता फक्त भक्तीचाच आश्रय घ्यावा.

 


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ



Tuesday, January 23, 2024

बंधन-मोक्षाच्या सोप्या व्याख्या | Bondage & Liberation - Simple Definitions

 



श्री वसिष्ठ मुनि येथे अत्यंत थोडक्यात व सरळ-सोप्या भाषेत शास्त्रामधील अतिशय गूढ सिद्धांत सांगत आहे. ते सांगतात की, "रामा ! खरे तर मी तुला आता उत्पत्तिप्रकरण सांगणार आहे. परंतु उपदेश देण्याच्या निमित्ताने सुद्धा 'संसार उत्पन्न झाला', असे विधान करणे चुकीचे आहे. म्हणजे आपल्या हातानेच आपल्या हृदयामध्ये अज्ञान भरणे आहे. 'हे दृश्य मिथ्या आहे' असा उपदेश करताना दृश्याचे अस्तित्व मानणे, हे सुद्धा अज्ञान आहे. 'दृश्य आहे' ही कल्पना केली रे केली की, संसार प्रारंभ होतो. म्हणून दृश्याचे अस्तित्व मानणे म्हणजे बंधन आणि दृश्य नाही, असे मानणे म्हणजेच मोक्ष आहे."

 

"अरे रामा ! बंधन आणि मोक्षाच्या या किती सोप्या व्याख्या आहेत ! म्हणून बंधन आणि मोक्ष या फार दूरच्या कल्पना नाहीत किंवा काहीतरी करूनही मोक्ष मिळत नाही. रामा ! खरे सांगू का, मनुष्याला बद्ध होण्यासाठी काहीच करावे लागत नाही. तसेच मोक्षप्राप्तीसाठी सुद्धा वस्तुतः कर्मजन्य असे काहीच करावे लागत नाही. करायचेच असेल तर बंधन-मोक्षाच्या कल्पनांचा निरास ! 'दृश्य अस्तित्वातच नाही,' हे विधान साधकाने मनावर कोरून घ्यावे. आत्ता जरी बुद्धीला हे विधान झेपले नाही तरी पुन्हापुन्हा श्रवण केल्याने ते अनुभवायला येते. ब्रह्मविद्या ही अनुभवण्याची विद्या आहे."

 

जसे लहान मुलाला, 'बागुलबुवा आहे-आहे', असे म्हणून आपण त्याला भीति दाखवतो. त्याची भीति घालवायची असेल तर, 'बागुलबुवा नाही-नाही', असे त्याला दहा वेळेला सांगावे लागते. त्यावेळी त्याची भीति निघून जाते. येथे बागुलबुवा आहे, असे म्हणणे ही कल्पना आहे आणि नाही म्हणणे, ही सुद्धा कल्पनाच आहे. आपण 'आहे' असे म्हटलो, म्हणून 'नाही' असे म्हणावे लागते. त्याचप्रमाणे संसार 'आहे' म्हणणे व 'नाही' म्हणणे, या दोन्हीही कल्पनाच आहेत. म्हणून संसार आहे, असे म्हणून वेदांच्यामधील श्रुति संसाराची निर्मिती सांगतात आणि नंतर संसाराचा निरासही करतात. ह्यालाच 'अध्यारोप-अपवाद' न्याय असे म्हणतात.

 

वस्तुतः चैतन्यस्वरूपामध्ये कोणतीही वास्तविक निर्मिती होत नाही. ज्याप्रमाणे दोरीमधून केव्हाही व कोणत्याही प्रकारे कल्पांती सुद्धा सापाची निर्मिती होत नाही. मात्र तरीही दोरी न दिसता सापच फक्त दिसतो. तसेच चैतन्यामधून कधीही संसाराची निर्मिती होत नाही, मात्र तरीही संसाराचा अनुभव येतो. ह्याचे कारण केवळ स्वस्वरूपाचे अज्ञान आहे. चैतन्यामध्ये संसाराची निर्मिती होत नाही, तर केवळ संसाराचा भास होतो.

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022


- हरी ॐ




Tuesday, January 16, 2024

परमेश्वरामध्ये पक्षपात नाही | No Bias in God

 



अग्नि ज्याप्रमाणे प्रत्येक काष्ठामध्ये अव्यक्त स्वरूपाने अनुस्यूत आहे;  परंतु आपल्याला त्याची प्रत्यक्ष प्रचीति येत नाही.  ती येण्यासाठी प्रयत्नाने अव्यक्त अग्नीला विशेष रूपाने व्यक्त केले पाहिजे.  लोणी ज्याप्रमाणे दुधामध्ये असूनही प्रचीतीला येत नाही, कारण ते अव्यक्त स्वरूपामध्ये असते.  ते व्यक्त करण्यासाठी मंथनाने दुधापासून भिन्न केले पाहिजे.  त्याचप्रमाणे परमात्मा सर्व भूतमात्रांच्यामध्ये अंतर्बाह्य व्याप्त आहे.  परंतु तो स्वतःहून व्यक्त होत नाही.  प्रचीतीला येत नाही.  त्यासाठी प्रत्येकाने पुरुषप्रयत्नाने स्वतःच्या अंतःकरणामध्ये विवेकाच्या साहाय्याने ते स्वरूप भिन्न केले पाहिजे.  त्याची साक्षात प्रचीति घेतली पाहिजे.  तोच प्रत्येक मनुष्याचा परमपुरुषार्थ आहे.  अशा प्रयत्न करणाऱ्या लोकांना मी सहज उपलब्ध होतो.

 

श्रुति म्हणते – दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः |           (कठ. उप. १-३-१२)

सूक्ष्मदर्शी लोकच शुद्ध, एकाग्र आणि अंतर्मुख वृत्तीने परमात्मस्वरूप पाहातात.  सर्व लोक पाहू शकत नाहीत.  याचा अर्थ जे साधक चित्तशुद्धि करून विवेकाच्या साहाय्याने प्रयत्न करतात त्यांना सद्गुरूंच्या कृपेने मी उपलब्ध होतो.  मी जरी त्यांना प्राप्त व्हावयाचे नाही असे ठरविले तरी ते माझ्या हातात नाही, कारण मी त्यांच्या जवळच आहे.  मी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते स्वप्रयत्नाने माझ्या स्वरूपापर्यंत येऊन अभेद स्वरूपामध्ये माझ्यामध्ये राहतात.  ते माझ्यापासून भिन्न राहात नाहीत किंवा मी सुद्धा त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही.  आम्ही दोघेही एकरूप होतो.  थोडक्यात ज्ञानानेच अज्ञानजन्य द्वैताचा ध्वंस होऊन जीवाला मोक्षप्राप्ति होते.

 

यावरून सिद्ध होते की, परमेश्वरामध्ये पक्षपात नाही.  त्याला सर्वच प्रिय आहेत.  फक्त प्रत्येक जीवाने त्याचे स्वरूप प्राप्त करण्याची इच्छा केली पाहिजे आणि स्वतःचा उद्धार स्वतःच करून घेतला पाहिजे.  नाहीतर स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याप्रमाणे पुरुषार्थच्युत होऊन तो संसारामध्ये अडकतो.  परमेश्वर काहीही करू शकत नाही.  म्हणून प्रत्येकाने ज्ञानप्राप्तीसाठी सर्व प्रयत्न करावेत हाच अभिप्राय आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, January 9, 2024

ज्ञानी पुरुष हाच सर्वश्रेष्ठ | The Supremacy Of Knowledge

 



या विश्वामध्ये ज्ञानी पुरुष हाच सर्वश्रेष्ठ आहे.  विश्वामधील तपस्वी, विद्वान, याज्ञिक, ब्राह्मण, राजे लोक, शूर, सद्गुणी, सज्जन या सर्वांच्यामध्येही शमसंपन्न असणारा ज्ञानी पुरुष अधिक शोभून दिसतो.  तपस्वी लोकांच्याजवळ तपश्चर्या असते.  विद्वान लोकांच्याजवळ शाब्दिक ज्ञान असते.  याज्ञिक लोकांना फक्त याज्ञिकी ज्ञान असते.  राजाजवळ राजविद्या असते. पराक्रमी पुरुषाजवळ शारीरिक शक्ति असते.  गुणवान लोकांच्याजवळ सद्गुण असतात.  मात्र ज्ञानी पुरुषाजवळ हे सर्व गुण तर असतातच, पण त्याचबरोबर अत्यंत तेजस्वी ज्ञान व शमसंपन्न बुद्धि असते.  म्हणून तो या सर्वांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.

 

ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रापासून अनेक आल्हाददायक शीतल किरण उत्पन्न होतात.  तसेच शमसंपन्न पुरुषापासून अनेक सद्गुण निर्माण होतात.  त्यामुळे त्या पुरुषाला निरतिशय सुखाची प्राप्ति होते.  म्हणून परमसुख हेच शम या गुणाचे अंतिम फळ आहे.

 

अशा या शमसंपन्न पुरुषांच्या सद्गुणांना सीमाच नाहीत.  त्यांच्यामधील पुरुषार्थ हा सर्वश्रेष्ठ गुण आहे.  पौरुषत्व हे त्या मनुष्याचे भूषण असून प्रयत्नानेच त्या पुरुषाने शम हा गुण प्राप्त करून अन्य सर्व दैवीगुणसंपत्ति प्राप्त केलेली असते.  सर्व संकटांच्यामध्ये, भयामध्ये, भीतिदायक प्रसंगांच्यामध्ये हा शमयुक्त पुरुषच शोभून दिसतो.  कारण भयंकर संकटांमध्येही शमसंपन्न पुरुष अत्यंत धीरगंभीर, अविचल राहतो.  संकटकाळी सर्वसामान्य लोक त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहतात.  तोच सर्वांचे अभयस्थान, निर्भयस्थान बनतो.  असा हा स्थिरबुद्धि, प्रगल्भ शमयुक्त ज्ञानी पुरुष संकटकाळी अत्यंत शोभून दिसतो.  माणूस केवळ बाहेरून सुंदर दिसणे, यात काही विशेष नाही.  मात्र प्रसंग आल्यावर जो आपल्या पौरुषत्वाने त्याला सामोरे जातो, तोच खरा पुरुष असून तोच सर्वश्रेष्ठ व शांत-शमयुक्त पुरुष आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, January 2, 2024

व्यक्ताव्यक्तामधून प्रवास | Traversing Via Expressed-Unexpressed

 



अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत |

अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ||                             (गीता अ. २-२८)

भगवान म्हणतात – हे अर्जुना !  सर्व भूतमात्रे अव्यक्तामधून व्यक्त होतात व पुन्हा व्यक्तामधून, दृश्य रूपामधून अव्यक्त अवस्थेमध्येच जातात.  फक्त व्यक्तावस्थेमध्येच सर्व भूतमात्रे दृश्य रूपाने अनुभवायला येतात.

 

भगवान दृष्टांत देतात –

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि |

तथा शरीराणि विहाय जीर्णा – न्यन्यानि संयाति नवानि देहि ||          (गीता अ. २-२२)

ज्याप्रमाणे आपण शरीरावर वस्त्र धारण करतो.  थोड्या वेळाने एक वस्त्र काढून दुसरे वस्त्र धारण करतो. वस्त्रांचे अनेक प्रकार आहेत.  घरातील वस्त्रे, बाहेर जाण्याचे, ऑफिसला जाण्याचे, लग्न

समारंभांना जाण्याचे किंवा झोपताना घालावयाचे अशी अनेक वस्त्रे आपण दिवसातून अनेक वेळा काढतो व घालतो.  त्या त्या प्रसंगांना अनुरूप वेष धारण करतो.  याठिकाणी वस्त्र हे माझ्यापासून नित्य भिन्न स्वरूपाचे आहे.  म्हणजेच वेष व वेषधारी हे दोन भिन्न आहेत.  म्हणून मी वेश धारणही करतो आणि वेषांचा त्यागही करतो.  वेषांचा त्याग झाला किंवा वस्त्र काढले, वस्त्र फाटले, वस्त्र जाळून टाकले तरी वेषधारी असणाऱ्या ‘मी’ चा मात्र कधीही नाश होत नाही.

 

किंवा आपण सर्वजण नाटक पाहतो.  समजा, तीन अंकी नाटक व एकपात्री प्रयोग असेल तर एकच नट तीन अंकांच्यामध्ये तीन वेगवेगळ्या भूमिका करतो.  पहिल्या अंकात तो नट राजाचा वेष घेऊन राजाची भूमिका करतो.  राजाप्रमाणेच सर्व भोग घेऊन व्यवहार करतो.  तोच नट दुसऱ्या अंकामध्ये प्रधानाची हुबेहुब भूमिका करतो आणि तिसऱ्या अंकामध्ये तोच नट एखाद्या भिकाऱ्याची भूमिका अत्यंत समर्थपणे वठवितो.  परंतु हे तीनही वेष धारण करून या सर्व भूमिका पार पाडताना त्या नटाला निश्चितपणे माहीत असते की, मी राजा नाही, प्रधान नाही अथवा भिकारीही नाही.  मी वेषधारी या वेषांपासून नित्य भिन्न आहे.  त्याचप्रमाणे जीव अनेक शरीरे धारण करतो.  अनेक शरीरांचा त्यागही करतो.  शरीरे नाश झाली तरी जीवाला मात्र मृत्यु नाही.  तर जीव सतत पुढे-पुढे अनेक योनींच्यामध्ये प्रवेश करीत राहतो.

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ