Tuesday, January 9, 2024

ज्ञानी पुरुष हाच सर्वश्रेष्ठ | The Supremacy Of Knowledge

 



या विश्वामध्ये ज्ञानी पुरुष हाच सर्वश्रेष्ठ आहे.  विश्वामधील तपस्वी, विद्वान, याज्ञिक, ब्राह्मण, राजे लोक, शूर, सद्गुणी, सज्जन या सर्वांच्यामध्येही शमसंपन्न असणारा ज्ञानी पुरुष अधिक शोभून दिसतो.  तपस्वी लोकांच्याजवळ तपश्चर्या असते.  विद्वान लोकांच्याजवळ शाब्दिक ज्ञान असते.  याज्ञिक लोकांना फक्त याज्ञिकी ज्ञान असते.  राजाजवळ राजविद्या असते. पराक्रमी पुरुषाजवळ शारीरिक शक्ति असते.  गुणवान लोकांच्याजवळ सद्गुण असतात.  मात्र ज्ञानी पुरुषाजवळ हे सर्व गुण तर असतातच, पण त्याचबरोबर अत्यंत तेजस्वी ज्ञान व शमसंपन्न बुद्धि असते.  म्हणून तो या सर्वांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.

 

ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रापासून अनेक आल्हाददायक शीतल किरण उत्पन्न होतात.  तसेच शमसंपन्न पुरुषापासून अनेक सद्गुण निर्माण होतात.  त्यामुळे त्या पुरुषाला निरतिशय सुखाची प्राप्ति होते.  म्हणून परमसुख हेच शम या गुणाचे अंतिम फळ आहे.

 

अशा या शमसंपन्न पुरुषांच्या सद्गुणांना सीमाच नाहीत.  त्यांच्यामधील पुरुषार्थ हा सर्वश्रेष्ठ गुण आहे.  पौरुषत्व हे त्या मनुष्याचे भूषण असून प्रयत्नानेच त्या पुरुषाने शम हा गुण प्राप्त करून अन्य सर्व दैवीगुणसंपत्ति प्राप्त केलेली असते.  सर्व संकटांच्यामध्ये, भयामध्ये, भीतिदायक प्रसंगांच्यामध्ये हा शमयुक्त पुरुषच शोभून दिसतो.  कारण भयंकर संकटांमध्येही शमसंपन्न पुरुष अत्यंत धीरगंभीर, अविचल राहतो.  संकटकाळी सर्वसामान्य लोक त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहतात.  तोच सर्वांचे अभयस्थान, निर्भयस्थान बनतो.  असा हा स्थिरबुद्धि, प्रगल्भ शमयुक्त ज्ञानी पुरुष संकटकाळी अत्यंत शोभून दिसतो.  माणूस केवळ बाहेरून सुंदर दिसणे, यात काही विशेष नाही.  मात्र प्रसंग आल्यावर जो आपल्या पौरुषत्वाने त्याला सामोरे जातो, तोच खरा पुरुष असून तोच सर्वश्रेष्ठ व शांत-शमयुक्त पुरुष आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ