श्री वसिष्ठ मुनि येथे अत्यंत थोडक्यात व सरळ-सोप्या
भाषेत शास्त्रामधील अतिशय गूढ सिद्धांत सांगत आहे. ते सांगतात की, "रामा ! खरे
तर मी तुला आता उत्पत्तिप्रकरण सांगणार आहे. परंतु उपदेश देण्याच्या निमित्ताने सुद्धा
'संसार उत्पन्न झाला', असे विधान करणे चुकीचे आहे. म्हणजे आपल्या हातानेच आपल्या हृदयामध्ये
अज्ञान भरणे आहे. 'हे दृश्य मिथ्या आहे' असा उपदेश करताना दृश्याचे अस्तित्व मानणे,
हे सुद्धा अज्ञान आहे. 'दृश्य आहे' ही कल्पना केली रे केली की, संसार प्रारंभ होतो.
म्हणून दृश्याचे अस्तित्व मानणे म्हणजे बंधन आणि दृश्य नाही, असे मानणे म्हणजेच मोक्ष
आहे."
"अरे रामा ! बंधन आणि मोक्षाच्या या किती
सोप्या व्याख्या आहेत ! म्हणून बंधन आणि मोक्ष या फार दूरच्या कल्पना नाहीत किंवा काहीतरी
करूनही मोक्ष मिळत नाही. रामा ! खरे सांगू का, मनुष्याला बद्ध होण्यासाठी काहीच
करावे लागत नाही. तसेच मोक्षप्राप्तीसाठी सुद्धा वस्तुतः कर्मजन्य असे काहीच करावे
लागत नाही. करायचेच असेल तर बंधन-मोक्षाच्या कल्पनांचा निरास ! 'दृश्य अस्तित्वातच
नाही,' हे विधान साधकाने मनावर कोरून घ्यावे. आत्ता जरी बुद्धीला हे विधान झेपले नाही
तरी पुन्हापुन्हा श्रवण केल्याने ते अनुभवायला येते. ब्रह्मविद्या ही अनुभवण्याची विद्या
आहे."
जसे लहान मुलाला, 'बागुलबुवा आहे-आहे', असे म्हणून
आपण त्याला भीति दाखवतो. त्याची भीति घालवायची असेल तर, 'बागुलबुवा नाही-नाही', असे
त्याला दहा वेळेला सांगावे लागते. त्यावेळी त्याची भीति निघून जाते. येथे बागुलबुवा
आहे, असे म्हणणे ही कल्पना आहे आणि नाही म्हणणे, ही सुद्धा कल्पनाच आहे. आपण 'आहे'
असे म्हटलो, म्हणून 'नाही' असे म्हणावे लागते. त्याचप्रमाणे संसार 'आहे' म्हणणे व
'नाही' म्हणणे, या दोन्हीही कल्पनाच आहेत. म्हणून संसार आहे, असे म्हणून वेदांच्यामधील
श्रुति संसाराची निर्मिती सांगतात आणि नंतर संसाराचा निरासही करतात. ह्यालाच 'अध्यारोप-अपवाद'
न्याय असे म्हणतात.
वस्तुतः चैतन्यस्वरूपामध्ये कोणतीही वास्तविक
निर्मिती होत नाही. ज्याप्रमाणे दोरीमधून केव्हाही व कोणत्याही प्रकारे कल्पांती सुद्धा
सापाची निर्मिती होत नाही. मात्र तरीही दोरी न दिसता सापच फक्त दिसतो. तसेच चैतन्यामधून
कधीही संसाराची निर्मिती होत नाही, मात्र तरीही संसाराचा अनुभव येतो. ह्याचे कारण केवळ
स्वस्वरूपाचे अज्ञान आहे. चैतन्यामध्ये संसाराची निर्मिती होत नाही, तर केवळ संसाराचा
भास होतो.
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand
Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022
- हरी ॐ–