अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत |
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना || (गीता अ. २-२८)
भगवान म्हणतात – हे अर्जुना ! सर्व भूतमात्रे अव्यक्तामधून व्यक्त होतात व
पुन्हा व्यक्तामधून, दृश्य रूपामधून अव्यक्त अवस्थेमध्येच जातात. फक्त व्यक्तावस्थेमध्येच सर्व भूतमात्रे दृश्य
रूपाने अनुभवायला येतात.
भगवान दृष्टांत देतात –
वासांसि जीर्णानि
यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि |
तथा शरीराणि विहाय जीर्णा – न्यन्यानि
संयाति नवानि देहि || (गीता अ. २-२२)
ज्याप्रमाणे आपण शरीरावर वस्त्र धारण करतो. थोड्या वेळाने एक वस्त्र काढून दुसरे वस्त्र
धारण करतो. वस्त्रांचे अनेक प्रकार आहेत. घरातील
वस्त्रे, बाहेर जाण्याचे, ऑफिसला जाण्याचे, लग्न
समारंभांना जाण्याचे किंवा झोपताना
घालावयाचे अशी अनेक वस्त्रे आपण दिवसातून अनेक वेळा काढतो व घालतो. त्या त्या प्रसंगांना अनुरूप वेष धारण करतो. याठिकाणी वस्त्र हे माझ्यापासून नित्य भिन्न
स्वरूपाचे आहे. म्हणजेच वेष व वेषधारी हे
दोन भिन्न आहेत. म्हणून मी वेश धारणही
करतो आणि वेषांचा त्यागही करतो. वेषांचा
त्याग झाला किंवा वस्त्र काढले, वस्त्र फाटले, वस्त्र जाळून टाकले तरी वेषधारी
असणाऱ्या ‘मी’ चा मात्र कधीही नाश होत नाही.
किंवा आपण सर्वजण नाटक पाहतो. समजा, तीन अंकी नाटक व एकपात्री प्रयोग असेल तर
एकच नट तीन अंकांच्यामध्ये तीन वेगवेगळ्या भूमिका करतो. पहिल्या अंकात तो नट राजाचा वेष घेऊन राजाची
भूमिका करतो. राजाप्रमाणेच सर्व भोग घेऊन
व्यवहार करतो. तोच नट दुसऱ्या अंकामध्ये
प्रधानाची हुबेहुब भूमिका करतो आणि तिसऱ्या अंकामध्ये तोच नट एखाद्या भिकाऱ्याची
भूमिका अत्यंत समर्थपणे वठवितो. परंतु हे तीनही
वेष धारण करून या सर्व भूमिका पार पाडताना त्या नटाला निश्चितपणे माहीत असते की, मी
राजा नाही, प्रधान नाही अथवा भिकारीही नाही. मी वेषधारी या वेषांपासून नित्य भिन्न आहे. त्याचप्रमाणे जीव अनेक शरीरे धारण करतो. अनेक शरीरांचा त्यागही करतो. शरीरे नाश झाली तरी जीवाला मात्र मृत्यु नाही. तर जीव सतत पुढे-पुढे अनेक योनींच्यामध्ये
प्रवेश करीत राहतो.
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "Bhaj
Govindam" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015
- हरी ॐ–