Tuesday, October 31, 2023

घृणास्पद अज्ञानाची अवस्था | Despicable State of Ignorance

 



रामा ! या अज्ञानाचे काय वर्णन करावे ?  रामा !  चांडाळाच्या वस्तीमधून हातात घाणेरडे गलिच्छ भिक्षापात्र घेऊन फिरणे एक वेळ बरे !  परंतु अज्ञानामध्ये राहणे, ही त्यापेक्षाही भयंकर अवस्था आहे.  येथे चांडाळ हाच मुळात अपवित्र !  त्याची वस्ती सुद्धा अस्वच्छ !  त्यामधून आपल्या हातात गलिच्छ भिक्षापात्र घेणे व तेथे आपण भिकारी म्हणून जाणे, भिक्षा मागणे आणि त्या चांडाळाने दिलेली भिक्षा खाऊन त्यावर उपजीविका करणे, या सर्वच गोष्टींची कल्पना करणे सुद्धा किळसवाणे आहे.  आपण आपल्या जीवनात या भयंकर गोष्टींची कल्पना सुद्धा करू शकत नाही.

 

परंतु वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, अज्ञानावस्थेत राहणे यापेक्षाही भयंकर आहे.  कारण अज्ञानाने मनुष्य नाशवंत विषयांच्यामध्ये आसक्त होऊन पशूंच्याप्रमाणे स्वैर उपभोग घेतो.  व्यभिचारी होतो.  जन्मानुजन्मे भोगांच्यामध्ये लोळूनही मनुष्याची तृप्ति होत नाही.  त्याच-त्याच इंद्रियभोगांच्यामध्ये मनुष्य एखाद्या किड्याप्रमाणे पुन्हा पुन्हा प्रवृत्त होतो.  रामा !  या मूर्खपणाला काय म्हणावे ?

 

अज्ञानामधील जीवन अत्यंत भयंकर आहे.  जसे एखादा मनुष्य गडद अंधारामध्ये बसावा आणि त्याने आपल्याच डोक्यावरून गोधडी पांघरून घ्यावी आणि म्हणावे की, "वा ऽऽ काय छान वाटते आहे !"  तसेच अज्ञानी मनुष्य अज्ञानामधून जन्माला येतो, अज्ञानामध्येच जगतो व तेथेच मरतो आणि एवढे करून स्वतःला कृतार्थ समजतो.  हा मूर्खपणाचा कळस आहे.  अज्ञानामुळे मनुष्याला ज्ञानाची, प्रकाशाची पुसटशी सुद्धा जाणीव होत नाही.  त्याला रत्नासारखे मौल्यवान मनुष्यशरीर मिळूनही ते कवडीमोल करून तो स्वतःची प्रतारणा करून, केवळ खाण्यात आणि झोपण्यात व्यर्थ जीवन घालवितो.  हे रामा !  असे भोगासक्त व निकृष्ट पशुतुल्य जीवन जगण्यापेक्षा एखाद्या वेळी चांडाळाच्या घाणेरड्या वस्तीत जाऊन भीक मागण्याची वेळ आली तरी ठीक आहे !

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, October 24, 2023

संसाराची दलदल | The Swamp Of Illusion

 



प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्येच निरतिशय आनंदस्वरूप परमात्मा निवास करीत असेल तरी दुर्दैवाने सर्व जीव स्वस्वरूपाचा शुद्ध आनंद न अनुभवता फक्त दुःखकारक संसाराचाच अनुभव घेतात.  याला कारण स्वस्वरूपावर आलेले अज्ञान आणि अज्ञानजन्यकार्याचे आवरण होय.  ज्याप्रमाणे गाईच्या सडामध्ये अमृततुल्य दूध असते;  परंतु त्याच सडावर बसलेली गोचीड अमृततुल्य दूध न पिता रक्तच शोषत असते.  प्रकाशस्वरूप असलेल्या सूर्यावर आवृत्त झालेल्या कृष्णवर्णीय ढगाच्यामुळे सूर्य काळवंडलेला, तेजोहीन दिसतो.  तो ढगाच्या मागे असूनही त्याच्या स्वरूपाने अनुभवायला येत नाही.

 

त्याचप्रमाणे स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे नित्य, शाश्वत, निरतिशय सच्चिदानंद स्वरूपाची विस्मृति होते.  नित्य काय ?  आणि अनित्य काय ?  हे कळत नाही.  या अविवेकामुळे सर्व जीव देहाशी तादात्म्य होतात.  यामधून त्यांच्या अंतःकरणामध्ये अनात्मस्वरूपाच्या विषयांच्याच उपभोगण्याच्या कामना निर्माण होतात.  खरे पाहाता त्यांची निरतिशय आनंद मिळावा हीच मूलभूत कामना असते;  परंतु निरतिशय आनंदस्वरूप परमात्म्याची इच्छा निर्माण न करता विषयभोगाची इच्छा करतात.  विषयभोगामधून ते निरतिशय आनंद मिळविण्याची इच्छा करतात.  परंतु सर्व विषय उपभोग घेऊनही त्यांना आयुष्यामध्ये कधीही आनंद मिळत नाही.  त्यांच्या सर्व कामना व्यर्थ, निष्फळच होतात.

 

येथे शंका येईल की आनंदस्वरूप परमात्म्याची इच्छा निर्माण न होता विषयांच्या इच्छा का निर्माण होतात ?  याचे उत्तर भगवान देतात – त्या सर्व अविवेकी लोकांनी राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचा आश्रय घेतलेला असतो.  त्यांचे कोणतेही कर्म निःस्वार्थ, निष्काम आणि उदात्त भावाने नसल्यामुळे सर्व कर्मे व्यर्थच असल्यासारखी आहेत.  सकाम ज्ञानाने फक्त कामना आणि कर्मफळाची वासना अधिक वृद्धिंगत होते.  म्हणून त्यांचे सर्व ज्ञान निष्फळ झाल्यासारखे होते.  रजोगुण आणि तमोगुणात्मक अविद्या मायेच्या प्राधान्यामुळे रज आणि तमोविकारांच्या आहारी जाऊन प्रकृतीचे गुलाम होतात आणि अधःपतित होतात.  ते संसारामध्येच संपूर्ण अडकतात.  यामुळे मी परमात्मा त्याच्या हृदयामध्ये निवास करून सुद्धा ते मला जाणत नाहीत.  ते मला प्राप्त न होता संसाराला प्राप्त होतात.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, October 17, 2023

मूर्ख आणि दुर्जनांचा संग टाळा | Avoid The Foolish & The Wicked

 



वसिष्ठ मुनि येथे साधकाला धोक्याची सूचना देऊन पथ्य सांगत आहेत.  कारण विश्वामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत.  काही लोक शास्त्राचा अपमान करतात.  शास्त्राच्या गंभीर असणाऱ्या शब्दांचा व्यवहारामध्ये दुरुपयोग करतात.  संदर्भ नसताना शास्त्राचे शब्द वापरतात.  स्वतःच्या बुद्धिनुसार, स्वार्थानुसार शास्त्राचे चुकीचे अर्थ काढतात.  इतकेच नव्हे तर काही लोक संतांचा, गुरूंचा सुद्धा अपमान करतात.

 

अशा मूर्ख लोकांच्याबरोबर एक क्षणभरही संगती करू नये.  आपल्यावर भयंकर संकट आले, आपणास कष्ट झाले तरी दुर्जनांचे साहाय्य घेऊ नये.  त्यापेक्षा कष्ट सहन करणे चांगले !  याचे कारण दुर्जनांचा संग हा अत्यंत घातक असतो.  त्यामुळे आपल्या मनामध्ये सुद्धा गुरु व शास्त्राबद्दल अनादर, विकल्प निर्माण होण्याची शक्यता असते आणि एक विकल्प सुद्धा साधकाला या मार्गापासून परावृत्त करू शकतो.  म्हणून साधकाने कदापि दुर्जनांचा संग करू नये.

 

वसिष्ठ मुनि येथे शूद्र दुःसंगाचा म्हणजे मूर्ख लोकांच्या संगतीचा त्याग सांगतात.  शारीरिक व मानसिक रोग मनुष्याला अनेक प्रकारची दुःखे देतात.  विषाच्या एका थेंबानेही आपला जीव कासावीस होतो.  संकटांच्यामुळे आपले ह्रिदय विदीर्ण होते.  या सर्वांच्यामुळे भयंकर यातना प्राप्त होतात.  परंतु मूर्ख लोकांच्या संगतीने होणारे दुःख यापेक्षाही अधिक आहे.

 

शास्त्रकार दृष्टांत देतात - जसे एखादा छोटासा तरंग सुद्धा दुसऱ्या तरंगांच्या संपर्कात आला तर तो मोठा होत-होत संपूर्ण समुद्रालाही व्यत्प्त करतो.  तसेच मनुष्यामधील एखादा छोटा दोष सुद्धा दुर्जनाच्या संगतीने भयंकर रूप धारण करतो.  दुर्जनांच्या संगतीने मनामध्ये विकल्प आला किंवा गुरु व शास्त्र यांच्याबद्दल शंका निर्माण झाली तर साधकाचे अधःपतन होऊन संपूर्ण जीवनही उध्वस्त होऊ शकते.  म्हणून मोहासक्त, मूढ दुर्जनांचा संग पूर्णतः त्याग करावा.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, October 10, 2023

भगवद्गीता कशाची उत्तरे देते ? | What Bhagwat Geeta Answers ?

 



श्रीमद्भगवद्गीता हा एक प्राचीन, जगन्मान्य ग्रंथ आहे.  भगवान श्रीकृष्णांनी महाभारतीय युद्धाच्या पूर्वी रणभूमीवर शोकमोहयुक्त व संभ्रमित झालेल्या पार्थ अर्जुनास गीतेचा उपदेश दिला.  हा उपदेश त्या प्रसंगापुरता तात्कालिक नाही किंवा केवळ अर्जुनासाठी दिलेला व्यक्तिगत उपदेश नाही, तर अर्जुनाच्या माध्यमामधून संपूर्ण मानवजातीला दिलेला दिव्य उपदेश आहे.

 

मनुष्याने आपले जीवन कसे जगावे ?  जीवनामधील चांगल्या-वाईट प्रसंगांना कसे सामोरे जावे ?  अंत:करणातील काम-क्रोधादि विकार नाहीसे करून मन अधिकाधिक शुद्ध व सात्त्विक कसे करावे ?  ईश्वरप्राप्तीची व्याकुळता कशी निर्माण करावी ?  सर्वश्रेष्ठ सांख्यज्ञान कोणते ?  निष्काम कर्मयोगाचे आचरण कसे करावे ?  सेवा म्हणजे काय ?  ध्यानसाधना कशी करावी ?  संन्यास म्हणजे काय ?  भगवंताच्या विभूति किती व कोणत्या आहेत ?  राजविद्या कोणती ?  भगवंताचे विराट स्वरूप कसे असते ?  भक्ति म्हणजे काय ?  जीव व ईश्वर म्हणजे काय ?  त्रिगुण म्हणजे काय ?  त्रिगुणांच्या अतीत गेलेल्या ज्ञानी, स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे कोणती ?  पुरुषोत्तम म्हणजे कोण ?  दैवीगुण व असुरीगुण कोणते आहेत ?  श्रद्धा म्हणजे काय व श्रद्धेचे प्रकार किती ?  मोक्षसंन्यास म्हणजे काय ?  साधकाचे अंतिम कर्तव्य कोणते ?  या व अशा प्रकारच्या असंख्य प्रश्नांचे विवरण भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेमधून प्रश्नोत्तररूप संवादाने केले आहे.

 

म्हणूनच हा अद्भुत व अलौकिक ग्रंथ आहे.  हा ग्रंथ म्हणजेच भगवंताकडून मनुष्याला मिळालेली एक फार मोठी देणगी आहे.  श्रीमद्भगवद्गीता ही प्रत्यक्ष स्वतः भगवंतांनी सांगितलेली आहे.  गीता हे भगवंताने गायिलेले गीत आहे.  त्यामध्ये मानवी जीवनाचे गूढ रहस्य व सार उलगडून दाखविलेले आहे.  म्हणूनच मनुष्य कोणत्याही जातीचा, पंथाचा, धर्माचा, वर्णाश्रमाचा किंवा संप्रदायाचा असो, पौर्वात्य-पाश्चिमात्य, आस्तिक-नास्तिक, स्त्री-पुरुष, लहान-तरुण-वृद्ध कोणीही असो, त्याने गीतेचे अवश्य अध्ययन करावे.

 

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ



Tuesday, October 3, 2023

वैषयिक आणि निर्वैषयिक आनंद | Materialistic & Transcending Bliss

 



वसिष्ठ मुनि वैषयिक आनंद आणि निर्विषयक आनंद यामधील फरक सांगतात.  अज्ञानी मनुष्य मनामध्ये इंद्रजाल निर्माण करतो.  विषय पाहिले रे पाहिले की, जो विषय त्याला आवडतो तो त्याला हवाहवासा वाटतो.  त्या विषयाच्या दर्शनानेच मनामध्ये सुखवृत्ति निर्माण होते.  नंतर प्रयत्नाने तो विषय मिळविल्यावर म्हणजे तो विषय माझ्या मालकीचा झाल्यावर आणखी थोडे जास्त सुख मिळते.  त्यानंतर त्या विषयाचा प्रत्यक्ष उपभोग घेतल्यानंतर त्याहीपेक्षा जास्त सुख मिळते.

 

परंतु असा एक विषयभोग भोगल्यानंतर मनुष्य तृप्त न होता दुसऱ्या विषयाची तृष्णा त्याच्या मनामध्ये निर्माण होते.  यावरून समजते की, विषय मनुष्याला कधीही पूर्ण सुखी किंवा पूर्ण तृप्त करू शकत नाहीत.  तसेच वैषयिक आनंद हा तरतमभावाने युक्त असतो.  म्हणजेच त्याचे प्रमाण कमी-अधिक होत असते.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैषयिक सुख हे येणारे-जाणारे, अनित्य व क्षणभंगुर असते.

 

ज्ञानी पुरुषाला मिळणारे निर्विषयक सुख मात्र विषयांच्यामधून निर्माण झालेले नसते.  त्यामुळे तो आनंद कमी-जास्त किंवा येणार-जाणारा नसतो.  तर ते सुख सर्व बाजूंनी परिपूर्ण स्वरूपाचे असते.  ते मिळाल्यानंतर आनंद मिळविण्यासाठी दुसरे काहीही करण्याची आवश्यकता राहत नाही.  ज्ञानी पुरुष स्वतःच स्वतःच्या स्वरूपामध्ये आनंदाने राहतो.

 

जसे पावसाळ्यात विहिरी, नद्या तलाव, पाण्याने भरून गेले व पाणी आपल्या दाराशीच आले, तर हातात कळशी घेऊन पाण्यासाठी कोणीही बाहेर जात नाही.  तसेच जो ज्ञानी पुरुष अंतरंगाने सुखस्वरूप झालेला असतो.  ज्याला सुखाचा सागर प्राप्त झालेला आहे, तो सुख मिळविण्यासाठी कोणत्याही बाह्य विषय किंवा उपभोगांमध्ये प्रवृत्त होत नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ