श्रीमद्भगवद्गीता हा एक प्राचीन, जगन्मान्य
ग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्णांनी महाभारतीय
युद्धाच्या पूर्वी रणभूमीवर शोकमोहयुक्त व संभ्रमित झालेल्या पार्थ अर्जुनास
गीतेचा उपदेश दिला. हा उपदेश त्या
प्रसंगापुरता तात्कालिक नाही किंवा केवळ अर्जुनासाठी दिलेला व्यक्तिगत उपदेश नाही,
तर अर्जुनाच्या माध्यमामधून संपूर्ण मानवजातीला दिलेला दिव्य उपदेश आहे.
मनुष्याने आपले जीवन कसे जगावे ? जीवनामधील चांगल्या-वाईट प्रसंगांना कसे सामोरे
जावे ? अंत:करणातील काम-क्रोधादि विकार
नाहीसे करून मन अधिकाधिक शुद्ध व सात्त्विक कसे करावे ? ईश्वरप्राप्तीची व्याकुळता कशी निर्माण करावी ? सर्वश्रेष्ठ सांख्यज्ञान कोणते ? निष्काम कर्मयोगाचे आचरण कसे करावे ? सेवा म्हणजे काय ? ध्यानसाधना कशी करावी ? संन्यास म्हणजे काय ? भगवंताच्या विभूति किती व कोणत्या आहेत ? राजविद्या कोणती ? भगवंताचे विराट स्वरूप कसे
असते ? भक्ति म्हणजे काय ? जीव व ईश्वर म्हणजे काय ? त्रिगुण म्हणजे काय ? त्रिगुणांच्या अतीत गेलेल्या ज्ञानी,
स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे कोणती ? पुरुषोत्तम
म्हणजे कोण ? दैवीगुण व असुरीगुण कोणते
आहेत ? श्रद्धा म्हणजे काय व श्रद्धेचे
प्रकार किती ? मोक्षसंन्यास म्हणजे काय ? साधकाचे अंतिम कर्तव्य कोणते ? या व अशा प्रकारच्या असंख्य प्रश्नांचे विवरण
भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेमधून प्रश्नोत्तररूप संवादाने केले आहे.
म्हणूनच हा अद्भुत व अलौकिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजेच भगवंताकडून मनुष्याला मिळालेली
एक फार मोठी देणगी आहे. श्रीमद्भगवद्गीता
ही प्रत्यक्ष स्वतः भगवंतांनी सांगितलेली आहे. गीता हे भगवंताने गायिलेले गीत आहे. त्यामध्ये मानवी जीवनाचे गूढ रहस्य व सार उलगडून
दाखविलेले आहे. म्हणूनच मनुष्य
कोणत्याही जातीचा, पंथाचा, धर्माचा, वर्णाश्रमाचा किंवा संप्रदायाचा असो,
पौर्वात्य-पाश्चिमात्य, आस्तिक-नास्तिक, स्त्री-पुरुष, लहान-तरुण-वृद्ध कोणीही
असो, त्याने गीतेचे अवश्य अध्ययन करावे.
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "Bhaj
Govindam" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015
- हरी ॐ–