प्रयत्नाने साध्यप्राप्ति तर होतेच होते, पण पुरुषार्थाने प्रारब्धाचा सुद्धा नाश करता येतो. यावरून लक्षात येईल की, आपल्या धर्मग्रंथांच्यामधून किंवा शास्त्रग्रंथांच्यामधून कोठेही अज्ञात
दैवाला, अंधविश्वासाला, निष्क्रियतेला स्थान दिलेले नाही. तर उलट शास्त्र प्रत्येक मनुष्याला त्याच्या
नियत कर्तव्यकर्मामध्येच प्रवृत्त करते. शास्त्र मनुष्याला आळशी, कर्मशून्य बनवीत नसून कर्तव्यपरायण, कर्तव्यदक्ष बनविते. शास्त्र मनुष्याला परमोच्च सकारात्मक दृष्टि
देते. जीवन उत्साहाने व आनंदाने जगण्यास
प्रवृत्त करते आणि त्याच जीवनामध्ये मनुष्याला परमपुरुषार्थ असणाऱ्या मोक्षामध्ये
प्रवृत्त करते.
जो मनुष्य शास्त्राने सांगितलेल्या मागणे
सत्कर्माचे आचरण करतो, त्याला त्यापासून
निश्चितपणे इच्छित फळ प्राप्त होते. त्याव्यतिरिक्त
केलेले सर्व कर्म अनर्थाला कारण होते. म्हणून
साधकाने नित्यनिरंतर वेदविहित कर्मांचेच अनुष्ठान करावे. हिंसादि वेदनिषिद्ध
कर्मांचा पूर्णतः त्याग करावा. कोणते
कर्म योग्य व कोणते अयोग्य, हे
ठरविताना शास्त्रालाच प्रमाण मानावे. सर्वसाधारणपाने जोपर्यंत अनुकूल प्रसंग येतात
तोपर्यंत मनुष्य धर्माचे अनुसरण करतो. परंतु
काही वेळेस प्रतिकूल परिस्थिति आल्यावर मनुष्याची धर्मावरची श्रद्धा उडते. तसेच काही वेळेला मनुष्य स्वार्थ, लोभ या विकारांना वश होऊन सत्कर्म-सदाचाराचा त्याग करतो.
म्हणुनच येथे वसिष्ठ विशेषत्वाने सांगतात
की, प्रतिकूल परिस्थिति आली तरीही
मनुष्याने धर्माचा त्याग करू नये. तसेच स्वार्थ, लोभाला वश होऊन कधीही आपल्या सत्कर्मामध्ये तडजोड करू नये. धर्माचरणापासून विचलित होऊ नये. याचे कारण - धर्मो रक्षति रक्षितः
| जो मनुष्य कितीही संकटे आली
तरीही तितक्याच श्रद्धेने, उत्साहाने, विवेकाने, धर्माच्याच मार्गाने जाईल, त्याला आज नाही उद्या त्याचे इप्सित फळ निःसंशयपाने प्राप्त होते. ते सत्कर्मच त्या मनुष्याचे
अधःपतनापासून रक्षण करते. यामध्ये संशय
नाही. मात्र - धर्म एव हतः हन्ति | अधार्मिक
आचरण मनुष्याच्या अधःपतनालाच कारण होते.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–