प्रत्येक व्यक्ति कोठे न कोठे समर्पित होतेच.
धर्मनिष्ठ धर्माला समर्पण होतो. धार्मिक पुरुष निष्ठेने जन्मभर धर्माचरण, श्रौत-स्मार्त
कर्मामध्ये परायण असतो. कोणी स्त्रीसाठी,
कोणी धनासाठी, किंवा पुत्रासाठी, उपभोगासाठी तर कोणी सत्तेसाठी, देशासाठी समर्पण होतो.
म्हणजेच कोठे न कोठे तरी मनुष्याची प्रीति
आहे. प्रेम आहे. त्याशिवाय माणूस जगू शकत नाही. माणसावर नाही तर, पशुपक्षांच्यावर, निसर्गावर तो
प्रेम करतो. यामध्ये सर्व जगाचा, अन्य गोष्टींचाही
त्याला विसर पडतो. काया-वाचा-मनसा रात्रंदिवस
त्याला एकाच गोष्टीचा ध्यास असतो. प्रारब्धवादी
लोक शरीराला प्रारब्धावर सोडून देतात. वेदान्ती
ब्रह्मामध्ये अध्यास आहे असे मानून अध्यस्त, अनात्म वस्तूंचा त्याग करतात आणि रात्रंदिवस
ब्रह्मचिंतनामध्ये निमग्न होतात.
खरा भक्त मात्र तो विषयांना, व्यक्तीला, राष्ट्राला,
समाजाला, धर्माला समर्पण होत नाही. परमेश्वरालाच
समर्पण होतो. आपल्याला व्यवहारात दिसते की
ज्याची जेथे श्रद्धा असते ते त्याचे श्रद्धास्थान बनते. तेथेच तो प्रेम करतो. तेथेच त्याची निष्ठा असते. इतकेच नव्हे तर तेथे तो नम्र होतो. त्याचा अहंकार समर्पण होतो. तो त्याच्यासाठी जगत राहातो. भक्ताचेही तसेच आहे. भक्ताची श्रद्धा परमेश्वरामध्ये असते, कारण त्याला
जाणीव असते की, परमेश्वर हाच कर्तुम्-अकर्तुम् आहे. सर्वशक्तिमान, विश्वाचा चालक, नियामक असून सर्व जीवांचा
तो पोषण, वर्धन, रक्षणकर्ता आहे. तोच जीवांचा
उद्धारकर्ता असून जीवाचे अंतिम साध्य आहे. तो आनंदघन आहे. त्यामुळे सर्व दुःखांच्यामधून पार करणारा आहे. याउलट जीव अत्यंत अगतिक असून अहंकार, दंभ दर्प वगैरे
दोषांनी ग्रस्त आहे. तो सर्व बाजूंनी मर्यादित
आहे. दुःखी, व्याकूळ त्रस्त आहे.
म्हणून त्याचे एकच कर्तव्य आहे ते म्हणजे आनंदघन
परमेश्वराला या दुःखसागरातून पार होण्यासाठी संपूर्ण, अनन्यभावाने शरण गेले पाहिजे.
त्याच्या मनात आस्तिक्यबुद्धि निर्माण होते.
त्यामधून श्रद्धा, श्रद्धेमधून भक्तीचा भाव
आणि अगतिकता निर्माण होते. शेवटी याचेच पर्यवसान
समर्पण भावामध्ये होते.
-
"नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "Narad
Bhaktisutra" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006
- हरी ॐ –