Showing posts with label Realized. Show all posts
Showing posts with label Realized. Show all posts

Tuesday, January 6, 2026

विवेकी पुरुष आणि कुलीन स्त्री | Realized Being And Noble Lady

 



हे रामा !  खरोखरच ज्याने विषयांचे दोष यथार्थपणे पाहिले आहेत, तो विवेकी पुरुष चुकूनही विषयभोगांच्यामध्ये आसक्त होत नाही.  तो सत्शास्त्र आणि साधु यांना अविरोधी असणाऱ्या गोष्टींच्यामध्ये रममाण होतो.  याचा अर्थच विवेकी पुरुष दुःसंगाचा त्याग करतो.  सत्संगामध्ये जाऊन सत्शास्त्राचे सेवन करतो.  त्याच्या आयुष्याचा बहुतांश काळ तो सत्संगामध्ये आणि शास्त्रश्रवणामध्ये व्यतीत करतो.  जे जे शास्त्राला, साधनेला, ज्ञानाला पूरक आहेत, अशाच गोष्टींचे तो आचरण करतो.

 

याउलट अज्ञानी, कामुक मनुष्य मात्र एखाद्या व्यभिचारी स्त्रीप्रमाणे पुन्हा-पुन्हा विषयभोगांच्यामध्येच रममाण होतो.  विषयचिंतन, विषयभोग, शास्त्राच्या केवळ शाब्दिक व्यर्थ चर्चा, दांभिकता यामध्येच आयुष्य व्यर्थ घालवितो.  परंतु ज्ञानी पुरुषाचा व्यवहार मात्र अत्यंत नियमित असतो.

 

ज्याप्रमाणे एखादी कुलीन, चारित्र्यसंपन्न असणारी साध्वी स्त्री नेहमी आपल्या अंतःपुरामध्ये अत्यंत संयमित होऊन राहते.  कारणाशिवाय ती बाहेरही येत नाही.  पूर्वीच्या काळी स्त्रिया बाहेर आल्या तरी या आपल्या डोक्यावर पदर घेऊन येत असते.  ही मागासलेली संस्कृती नसून यामागे मानसशास्त्र आहे.  आपला बाह्य व्यवहारही इतका संयमित हवा की, ज्यामुळे आपले स्वतःचे तसेच दुसऱ्याचेही मन विचलित होणार नाही.  प्राचीन काळी एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा साध्वी, कुलीन आणि पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या.  त्या स्त्रिया अबला नव्हत्या, तर मृत्युलाही जिंकण्याचे त्यांच्यामध्ये सामर्थ्य असून त्या दीपशिखेप्रमाणे परमतेजस्वी असणाऱ्या वीरांगना होत्या.  त्यांच्या पातिव्रत्यामध्ये प्रचंड मोठे सामर्थ्य होते.

 

वसिष्ठ मुनि हा दृष्टांत देऊन येथे सांगतात की, ज्ञानी पुरुषाचा व्यवहार सुद्धा अत्यंत संयमित असून तो अंतर्मुख असतो.  सत्शास्त्र व सत्संग याशिवाय तो कोठेही रममाण होत नाही.  तो आपले ज्ञानाचे व्रत निष्ठेने पाळतो.  तो शरीराने विश्वामध्ये राहत असेल तरी मनाने मात्र आपल्या स्वस्वरूपामध्ये रममाण होतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, December 19, 2023

योग-क्षेम | Livelihood Of The Realized

 



 ज्ञानीव्यतिरिक्त असलेल्या आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासु भक्तांचा योगक्षेम कोण चालवितो ?  परमेश्वर जर सर्व विश्वाचा विश्वंभर असेल तर ज्ञानी पुरुषाचाच फक्त योगक्षेम मी चालवितो असे भगवान का म्हणतात ?  खरे पाहाता परमेश्वर हा ज्ञानीप्रमाणे अन्य सर्व भक्तांचाही योगक्षेम पाहात असतो.  परंतु अन्य सर्व भक्त त्यांच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये भेद पाहात असल्यामुळे त्यांची अनन्य भक्ति नसून द्वैतजन्य असते.  त्याचप्रमाणे ते स्वतःच्या योगक्षेमासाठी स्वतःच प्रयत्न करीत असतात.

 

याउलट अनन्यदर्शी ज्ञानी लोक काया वाचा आणि मनाने माझ्याच स्वरूपामध्ये रममाण झालेले असल्यामुळे स्वतःच्या योगक्षेमाचा ते विचार करीत नाहीत.  ते स्वतःसाठी जगतच नाहीत.  जीवन जगण्यामध्ये आणि मारण्यामध्ये कशातच त्यांना स्पृहा नसते.  मीच त्यांचा आश्रयदाता, शरणागतीचे स्थान आहे.  त्यामुळे अशा ज्ञानी पुरुषांचा योगक्षेम मी – परमेश्वर चालविणार नाही तर कोण चालविणार ?  मलाच त्यांची काळजी घेतली पाहिजे.  अन्य सर्वजण त्यांची काळजी तेच घेतात.  मी प्रयत्न करतो आणि मी मिळवीन हा त्यांचा अहंकार आहे.  या अहंकारामुळेच ते माझ्यापासून दूर जातात.  वास्तविक पाहाता सर्वांचाच योगक्षेम मी चालवितो.  परंतु अहंकारी, द्वैतबुद्धीच्या लोकांना हे कळत नाही त्याला मी काय करू ?  शरण आलेल्यांना अभय देणे, त्यांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे.

 

ज्ञानी पुरुष स्वतः आत्मतृप्त असून आप्तकाम असल्यामुळे त्याच्या दृष्टीने निश्चितच योगक्षेम नाही.  तो स्वतःसाठी जगत नसेल तरी जगाच्या कल्याणासाठी जगत असतो.  तो स्वतः स्वतःच्या शरीराचे रक्षण, वर्धन किंवा पोषण करीत नाही.  तसेच मिथ्या, नाशावान शरीर असेल तरी त्याच शरीरामधून तो परमेश्वराचे कार्य करीत असतो.  इतकेच नव्हे तर – प्रारब्धाय समर्पितं स्ववपुः |  या आचार्यांच्या विधानाप्रमाणे तो स्वतःचे शरीर प्रारब्धाला अर्पण करून स्वस्वरूपामध्ये स्थिर असतो.  असे असून सुद्धा शरीरामधूनच ईश्वरी कार्य आणि लोककल्याण व लोकोद्धार होत असल्यामुळे त्याच्या शरीराचा योगक्षेम भगवंतालाच पाहिला पाहिजे.  ज्ञानी परमेश्वराला योगक्षेमासाठी प्रार्थना करीत नाहीत.  तर उलट त्याचा योगक्षेम भगवान स्वेच्छेने स्वतःकडे घेतात.  म्हणून येथे म्हटले आहे योगक्षेमं वहाम्यहम् |

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ