Tuesday, December 19, 2023

योग-क्षेम | Livelihood Of The Realized

  ज्ञानीव्यतिरिक्त असलेल्या आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासु भक्तांचा योगक्षेम कोण चालवितो ?  परमेश्वर जर सर्व विश्वाचा विश्वंभर असेल तर ज्ञानी पुरुषाचाच फक्त योगक्षेम मी चालवितो असे भगवान का म्हणतात ?  खरे पाहाता परमेश्वर हा ज्ञानीप्रमाणे अन्य सर्व भक्तांचाही योगक्षेम पाहात असतो.  परंतु अन्य सर्व भक्त त्यांच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये भेद पाहात असल्यामुळे त्यांची अनन्य भक्ति नसून द्वैतजन्य असते.  त्याचप्रमाणे ते स्वतःच्या योगक्षेमासाठी स्वतःच प्रयत्न करीत असतात.

 

याउलट अनन्यदर्शी ज्ञानी लोक काया वाचा आणि मनाने माझ्याच स्वरूपामध्ये रममाण झालेले असल्यामुळे स्वतःच्या योगक्षेमाचा ते विचार करीत नाहीत.  ते स्वतःसाठी जगतच नाहीत.  जीवन जगण्यामध्ये आणि मारण्यामध्ये कशातच त्यांना स्पृहा नसते.  मीच त्यांचा आश्रयदाता, शरणागतीचे स्थान आहे.  त्यामुळे अशा ज्ञानी पुरुषांचा योगक्षेम मी – परमेश्वर चालविणार नाही तर कोण चालविणार ?  मलाच त्यांची काळजी घेतली पाहिजे.  अन्य सर्वजण त्यांची काळजी तेच घेतात.  मी प्रयत्न करतो आणि मी मिळवीन हा त्यांचा अहंकार आहे.  या अहंकारामुळेच ते माझ्यापासून दूर जातात.  वास्तविक पाहाता सर्वांचाच योगक्षेम मी चालवितो.  परंतु अहंकारी, द्वैतबुद्धीच्या लोकांना हे कळत नाही त्याला मी काय करू ?  शरण आलेल्यांना अभय देणे, त्यांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे.

 

ज्ञानी पुरुष स्वतः आत्मतृप्त असून आप्तकाम असल्यामुळे त्याच्या दृष्टीने निश्चितच योगक्षेम नाही.  तो स्वतःसाठी जगत नसेल तरी जगाच्या कल्याणासाठी जगत असतो.  तो स्वतः स्वतःच्या शरीराचे रक्षण, वर्धन किंवा पोषण करीत नाही.  तसेच मिथ्या, नाशावान शरीर असेल तरी त्याच शरीरामधून तो परमेश्वराचे कार्य करीत असतो.  इतकेच नव्हे तर – प्रारब्धाय समर्पितं स्ववपुः |  या आचार्यांच्या विधानाप्रमाणे तो स्वतःचे शरीर प्रारब्धाला अर्पण करून स्वस्वरूपामध्ये स्थिर असतो.  असे असून सुद्धा शरीरामधूनच ईश्वरी कार्य आणि लोककल्याण व लोकोद्धार होत असल्यामुळे त्याच्या शरीराचा योगक्षेम भगवंतालाच पाहिला पाहिजे.  ज्ञानी परमेश्वराला योगक्षेमासाठी प्रार्थना करीत नाहीत.  तर उलट त्याचा योगक्षेम भगवान स्वेच्छेने स्वतःकडे घेतात.  म्हणून येथे म्हटले आहे योगक्षेमं वहाम्यहम् |

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ