Tuesday, February 10, 2026

आचार्योपासना - २ | Worship of The Teacher - 2

 



आचार्योपासनेचा दुसरा अर्थ सांगतात.  उपासना = उप + आसन.  उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणे.  आचार्योपासना म्हणजेच आचार्यांच्या जवळ, समीप बसणे.  येथे शरीराने जवळ जाणे असा शाब्दिक अर्थ नाही.  आचार्यांचे आसन म्हणजेच आचार्य जेथे बसतात, निवास करतात ते स्थान स्वस्वरूप होय.  भगवान म्हणतात -

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी |

नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ||                      (गीता अ. ५-१३)

 

ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणजेच गुरु हे सर्व कर्मांचा मनाने संन्यास करून काहीही न करता आणि करविता स्वस्वरूपामध्ये स्वस्थ, स्थिर होतात.  किंवा –

सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टः |                              (गीता अ. १५-१५)

सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये प्रत्यगात्मस्वरूपाने, परब्रह्म स्वरूप असणारे आचार्य, गुरु निवास करतात.

 

श्रुति म्हणते -

ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति |                                   (मुंडक. उप. ३-२-९)

ब्रह्मस्वरूप जाणणारे आचार्य स्वतःच ब्रह्मस्वरूप होतात.  अशा ब्रह्मस्वरूप असणाऱ्या आचार्यांच्या जवळ बसणे म्हणजे आपण स्वतःच ब्रह्मस्वरूप होणे होय.  आचार्यांचे आसन शास्वत, स्थिर, चिरंतन आहे.  म्हणून आचार्योपासना करण्यासाठी साधकाने गुरूंच्या मुखामधून आत्मज्ञानाची प्राप्ति करून ज्ञाननिष्ठा प्राप्त करावी आणि स्वस्वरूपामध्ये, निरतिशय आत्मस्वरूपामध्ये स्वस्थ, स्थिर व्हावे.  हीच परिपूर्णतेची, कृतकृत्यतेची परमोच्च अवस्था आहे.  यालाच आचार्योपासना असे म्हणतात.

 

स्वस्वरूपाच्या ज्ञानाने सर्व अज्ञानकल्पित भेद गळून पडतात.  अहंकार, ममकारादि प्रत्यय निरास होतात.  इतकेच नव्हे तर गुरु आणि शिष्य हाही भेद गळून पडतो.  दोघेही एकरूप होतात.  अत्यंत दुःखनिवृत्ति होऊन निरतिशय आनंदाची प्राप्ति होते.  साधक स्वतःच आनंदस्वरूप होतो.  स्वस्वरूपामध्ये स्थिर, दृढ होतो.  हीच खरी आचार्योपासना आहे.  साधकाने हा गुण आत्मसात करावा.  


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ