Tuesday, February 17, 2026

मन चेतन आहे की जड ? | Is Mind Conscious Or Gross ?

 




ज्याचा आपल्या शाश्वत आणि अद्वय रूपामध्ये निश्चय नसतो, म्हणून अविद्येमुळे ज्याच्यामधून हे द्वैतात्मक जग उत्पन्न होते त्यालाच 'चित्त' असे म्हणतात.  जे जड नाही व अजडही नाही, तसेच जे अस्थिर असून कल्पनारूप असते, अविद्येमुळे जे म्लान होते, त्या चैतन्याच्या वृत्तीला 'मन' असे म्हणतात.  स्पंदरहित, मलीन व अनेक कलंकांनी युक्त असणारे जे चित्, ते म्हणजेच मन असून ते ना अचेतन आहे, ना चेतन आहे.  हे राघवा !  अहंकार, मन, बुद्धि, जीव, ही व अशीच अनेक चित्र-विचित्र नावे या चैतन्यासाठीच कल्पित केली आहेत.

 

जसे आरशामध्ये सर्व रूपे दिसत असल्यामुळे त्या सर्व रूपांचे कारण आरसा आहे.  तसेच मनामध्ये सर्व विषयांचा अनुभव येत असल्यामुळे सर्व दृश्य विषयांचे कारण मन आहे.  त्यामुळेच जो आपल्या मनाच्या अधीन आहे, तोच मनुष्य बद्ध होतो व जो आपल्या मनापासून मुक्त आहे तोच खऱ्या अर्थाने मुक्त पुरुष आहे.

 

अज्ञानी मनुष्य उपाधीच्या दृष्टीने पाहत असल्यामुळे त्याला ते मन जड वाटते.  परंतु ज्ञानी पुरुष तत्त्वाच्या दृष्टीने पाहत असल्यामुळे त्याला तेच मन चैतन्यमय वाटते.  त्यामुळे त्यांच्या दृष्टीने तसे तसे मन आहे.  परंतु वस्तुतः मन हे ना चेतन आहे ना जड आहे.

 

अज्ञानी जीवाला विषयवासनांच्यामुळे जेव्हा चित्तामध्ये अनेक सुखदुःखांचा अनुभव येतो, तेव्हाच जणु काही या संसाराचा उदय होतो.  मात्र जेव्हा हे मन तत्त्वाशी एकरूप होते, म्हणजे स्वस्वरूपामध्ये लय पावते, त्यावेळी मात्र हा सर्व अनुभवायला येणारा घोर संसारही लय पावतो.  अविद्येने मलीन व कलुषित झालेल्या मनाच्या भ्रांतीने हे जग उत्पन्न झालेले आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022




- हरी ॐ