प्रत्येक साधक हा धार्मिक, श्रद्धावान,
आध्यात्मिक असेल तरीही त्याचे मन परमेश्वरामध्ये लगेचच एकाग्र होत नाही. याचे
कारण आज मनामध्ये अनेक विषयांच्याच वृत्ति आहेत. अजुनही
मनामध्ये विषयांच्याबद्दल प्रचंड मोठे आकर्षण आहे. विषयांचे महत्व आहे. यामुळे
विषयांच्यामध्ये सत्यत्वबुद्धि निर्माण होऊन मनामध्ये कामना निर्माण होतात. पुन्हा पुन्हा
ते मन विषयांच्यामध्ये रुळते, रममाण होते. यामुळे परमेश्वरामध्ये मन एकाग्र
करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यामध्ये अनेक प्रतिबंध निर्माण होतात. यासाठीच
भगवान या श्लोकात ‘अभ्यासयोगाची’ साधना देतात.
मग अभ्यासयोग म्हणजे काय ? आचार्य
सांगतात –
विपरीतप्रत्ययान्तिरस्कृत्य सजातीयप्रत्ययावृत्तिरभ्यासः | सर्व विपरीत - विजातीय वृत्तींचा निरास करून जाणीवपूर्वक, सातत्याने, अखंडपणे सजातीयवृत्तिप्रवाह निर्माण करणे यालाच ‘अभ्यास’ असे म्हणतात. भगवान म्हणतात -
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् |
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् || (गीता अ. ६-२६)
जसजसे मन विषयांच्याकडे जाईल तसतसे त्यावर
नियंत्रण करावे. केवळ मन दाबून, ओढून एकाग्र होत नाही. तर त्यासाठी विवेकाने
विषयदोषदर्शन करावे. म्हणजेच विषयांच्या अनित्यत्वं, दुःखित्वं, बद्धत्वं, मिथ्यात्वं या सर्व
मर्यादा जाणाव्यात. विषयांचे खरे स्वरूप
पाहावे. यामुळे मन आपोआपच त्यांच्यापासून निवृत्त होईल. त्या त्या प्रमाणात विषयांचे संस्कार कमी होतील.
या संस्कारांचा प्रभाव कमी करण्यासाठी
परमेश्वराच्या उपासनेचा संस्कार वाढवावा. जाणीवपूर्वक, सावधानतेने, मनाला विषयासक्तीमधून
निवृत्त करून उपासना करावी. परमेश्वराची
वृत्ति पुन्हा-पुन्हा निर्माण करावी. सुरुवातीला
खूप अवघड वाटेल. यामध्ये विषयांच्या वृत्ति
आल्यामुळे विरल चिंतन होईल. परंतु सातत्याने दीर्घकाळ
उपासना केल्यानंतर सरलचिंतन होऊन परमेश्वराचीच वृत्ति म्हणजे सजातीयवृत्तिप्रवाह निर्माण होईल. यालाच ‘अभ्यास’ असे
म्हटले आहे. या अभ्यासयोगामुळे क्रमाने चित्तशुद्धि होऊन ज्ञानप्राप्ति आणि मोक्षप्राप्ति होईल.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–