महाप्रलयाच्या वेळी शून्य, अत्यंत सूक्ष्म असे
निरुपाधिक परब्रह्म सत्तास्वरूपाने राहते. त्यानंतर पुन्हा ज्यावेळी पुढील सर्गाचा म्हणजे सृष्टीचा
आरंभ होतो, त्यावेळी परब्रह्मामध्ये "मी देह आहे" असा भाव निर्माण होतो.
निर्गुण-निर्विशेष चैतन्यामध्ये "देहोSहं"
असे स्फुरण पावते. त्यामधूनच - एकोSहं बहुस्याम्
| असा संकल्प निर्माण होतो आणि त्यावेळी
एकामधून - अद्वयामधून काकतालीय न्यायाप्रमाणे अचानक भिन्न-भिन्न आकार दिसू लागतात.
सर्वप्रथम ब्रह्माजीची निर्मिती होते. निर्गुण सगुणत्वाला प्राप्त होते. पहिला आकार म्हणजे ब्रह्मदेव होय. त्यानंतर पुढे मिथुनामधून सर्व प्रजा उत्पन्न होते.
वस्तुतः निर्गुण आणि सगुण हे दोन
भिन्न नाहीत. निर्गुणामधून सगुणाची निर्मीती
होते म्हणजेच निर्गुणामध्ये सगुणाचा भास होतो.
जसे दोरीमधून साप निर्माण होतो. दोरी स्थिर, अचल आहे. परंतु त्यातूनच आपणास अचानक हालचाल झाल्यासारखे
वाटते आणि सापाचा भ्रम निर्माण होतो. मग साप दिसला की, तो साप कोणत्या जातीचा आह ? कोणत्या रंगाचा आहे ? किती लांबीचा आहे ? किती विषारी आहे ? याची आपण चर्चा करतो.
परंतु या सर्व चर्चा व्यर्थ आहेत. कारण त्या चर्चा उत्पन्न न झालेल्या सापाबद्दल आहेत.
साप दोरीमधून निर्माण होत नाही. तर दोरीच्या अज्ञानामधून निर्माण होतो. नव्हे, साप निर्माणच होत नाही तर सापाचा केवळ भास
निर्माण होतो. मग कोणी साप निर्माण झाला असे
म्हणो किंवा निर्माण झाला नाही, असे म्हणो !
पारमार्थिक दृष्टीने या विधानाला महत्त्व नाही.
तसेच पृथ्व्यादि पंचमहाभूते निर्माण झाली, असे
कोणी म्हणो किंवा निर्माण झाली नाहीत, असे म्हणो ! ही सर्व विधाने औपचारिक आहेत. वस्तुतः निर्गुणामधून काहीही निर्माण झालेले नाही. झालेच असेल तर ते केवळ ब्रह्माजीच्या संकल्पामधून
- कल्पनेमधून निर्माण होते. म्हणून ही सृष्टी
म्हणजे ब्रह्माजीच्या कल्पनेला मिळालेला केवळ आकार आहे.
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami
Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti
2022
- हरी ॐ–