Tuesday, January 31, 2023

बहिरंग आणि अंतरंग साधना | External & Internal Practice

 



सर्व साधनांचे प्रामुख्याने बहिरंग साधना व अंतरंग साधना असे दोन प्रकार पडतात.  यापैकी बहिरंग साधना ही मनावर केंद्रीभूत असून अंतरंग साधना आत्मस्वरूपावर केंद्रीभूत आहे.  आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रथम मनावर केंद्रीभूत असणारी बहिरंग साधना करणे आवश्यक आहे.  मनामध्ये स्वभावतःच मल, विक्षेप व आवरण असे तीन प्रकारचे दोष आहेत.  मल म्हणजेच रागद्वेषादि अशुद्धता होय.  विक्षेप म्हणजेच मनाची चंचलता किंवा अस्थिरता होय.

 

आत्मज्ञानप्राप्तीसाठी साधकाने आपल्या मनालाच अनुकूल करून घेतले पाहिजे.  याचे कारण आपले मन हेच आत्मज्ञानप्राप्तीचे साधन व स्थान आहे.  आत्मज्ञानप्राप्तीचे साधन शरीर नाही.  इंद्रिये नाहीत.  तर मनानेच मनाच्या साहाय्याने मनामध्येच आत्मशांति अनुभवायची आहे.  यामुळे निरतिशय शांति व पूर्ण तृप्ति अनुभवायची असेल तर आपले मन निदान काही प्रमाणात तरी शांत व प्रसन्न असले पाहिजे.  यासाठीच मल व विक्षेप हे दोष कमी होऊन चित्ताची शुद्धता व स्थिरता प्राप्त केली पाहिजे.  यासाठीच शास्त्रामध्ये ज्या ज्या साधना सांगितल्या जातात त्यांना बहिरंग साधना असे म्हणतात.  या चित्ताच्या शुद्धीसाठी व एकाग्रतेसाठीच सांगितल्या जातात.  रजोगुण व तमोगुण यांचे विकार कमी करून सत्त्वगुणाचा उत्कर्ष करणे हेच सर्व साधनांचे प्रयोजन आहे.

 

सर्व दृश्य अनुभवयोग्य आहे.  Entire creation is an object of my knowledge.  मी मात्र या सगळ्याचा द्रष्टा व ज्ञाता आहे.  म्हणून मी subject आहे व हे संपूर्ण विश्व object आहे.  सर्वसामान्यतेने आपण जीवनभर, नव्हे जन्मानुजन्मे object चेच ज्ञान घेतो.  परंतु मला subject चे म्हणजेच ‘मी’ चे अज्ञान आहे.  मी कोण ?  हे मला माहीत नाही.  म्हणून या subject चे, ‘मी’ चे म्हणजेच स्वरूपाचे ज्ञान होणे हेच प्रत्येक मनुष्याचे खरे कर्तव्य आहे.

 

परमेश्वर आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये सन्निविष्ट आहे.  परंतु अंतःकरणामध्ये अज्ञानरूपी अंधाराचे आवरण असल्याने परमेश्वर असूनही दिसत नाही, आपल्याला अनुभवायला येत नाही.  म्हणून आनंदस्वरूप परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आत्मज्ञानरूपी प्रकाश उदयाला आला पाहिजे.  त्यासाठी आत्मज्ञानाचीच नितांत आवश्यकता आहे.  हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनेलाच अंतरंग साधना असे म्हणतात.

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ




Tuesday, January 24, 2023

मर्यादा आणि नियम का ? | Why Society Needs Regulation ?

 



कलियुगामधील भौतिकवादी, नास्तिकवादी झालेला मनुष्य पूर्णतः अधःपतित झाला.  नास्तिकवाद हे बुद्धीचे लक्षण नसून खरे तर जडबुद्धीचे लक्षण आहे.  कारण नास्तिकवादामध्ये बुद्धीला दृश्याच्या अतीत असणारे काहीही समजत नाही.  त्यामुळे सत्ययुगाचा क्षय झाल्यानंतर, सत्कर्मे क्षीण झाल्यानंतर आता या जीवांना कसा उपदेश द्यावा ?  असा सर्व महर्षींन्नी विचार केला व त्यावर उपाय शोधून काढला.  आपणा सर्वांना जे जे नियम सांगितले जातात, ते या सर्व ऋषिमुनींनी घालून दिलेले नियम आहेत.  आजकालची तरुण पिढी प्रश्न विचारते की, आपल्याच हिंदु धर्मामध्ये इतके नियम, इतके उपवास, इतकी व्रत-वैकल्ये कशासाठी आहेत ?  याचे उत्तर एकच - मर्यादानियमाय च ।  मनुष्याच्या आचारावर, वागण्या-बोलण्यावर कोठेतरी मर्यादा याव्यात, म्हणून नियम सांगितले जातात.

 

जसे व्यवहारामध्ये वाहतुकीचे नियम सुद्धा आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी आहेत.  तसेच आपल्या संस्कृतीमध्ये सर्व नियम, मर्यादा या मनुष्याच्या स्वैर व पशुतुल्य प्रवृत्तीवर नियमन करण्यासाठी सांगितल्या आहेत.  चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत अनेक सण व परंपरा, कुळधर्म व कुळाचार, नित्य व नैमित्तिक कर्मे, उत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरे करतो.  या प्रत्येक सणाच्या मागे आणि परंपरेमागे काहीतरी विशिष्ट अर्थ व प्रयोजन आहे.  आपल्या धर्मशास्त्राने कोणतीही गोष्ट किंवा कोणताही नियम निरर्थक सांगितलेला नाही.

 

वेदांनी मनुष्याचे अधःपतनापासून रक्षण करण्यासाठी त्याला विविध कर्मांचे विधान दिले.  वेद आणि ऋषि-मुनींनी तपाचरण, अनुष्ठाने, व्रत-वैकल्ये, उपवास, उपासना, परंपरा, अनेक एकादशी-प्रदोषादि व्रते, अशी अनेक कर्मे सांगितली.  याचबरोबर श्राद्धादि क्रियांचे सुद्धा विधि दिले.  पिंडदान, श्राद्ध, स्वाहा, स्वधा या सर्व क्रिया आवश्यक आहेत.  हे सर्व मनुष्याने केलेच पाहिजे.  यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश असेल तर मनुष्याला हिंसादि भयंकर क्रूर कर्मापासून निवृत्त करून त्याला चांगल्या कर्मामध्ये प्रवृत्त करावे.  मनुष्याच्या इंद्रियांच्यावर, मनावर आणि दुष्कर्मांच्यावर नियमन व्हावे.  हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सर्व ऋषींनी क्रियाक्रम, विधान, मर्यादा व नियम घालून दिले.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, January 17, 2023

मोक्षमार्गातील अडथळे | Obstacles on the Path of Liberation

 



श्रेयस मार्गामध्ये श्रवणमननादि साधना करीत असताना आपलीच स्वतःची कर्मे आपल्या मार्गात अनेक प्रकारचे अनिष्ट प्रसंग निर्माण करून प्रतिबंध निर्माण करतात.  ही सर्व विघ्ने योगसाधनेमध्ये दोष निर्माण करून साधकाचे मन योगनिष्ठेपासून विचलित करतात.

 

१) निरनिराळे अनपेक्षित आणि अनिष्ट प्रसंग मनावर आघात करून मनाला उत्तेजित करतात.  त्यामुळे मनामध्ये क्षोभ, संताप, विक्षेप निर्माण होतात.  समाधि अभ्यासामध्ये विच्छित्ति येते.  आत्मस्वरुपाची वृत्ति खंडित होते.

२) आध्यत्मिक साधना करताना प्रत्येकाला वाटत असते की, साधनेने सर्व प्रतिबंध, अडथळे किंवा व्यावहारिक समस्या निवारण होतील.  परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या, नवीन नवीन प्रश्न आणि अडथळे येतात.  साधानेमध्ये मन एकाग्र होत नाही.

३) साधनकाळामध्ये विषयांचा संग, आकर्षण, सौंदर्य आणि मोह हा फार मोठा अडथळा आहे.  शरीराला विषयभोगाची लागलेली चटक संपता संपत नाही.  कितीही समजले तरी सवयीमुळे इंद्रिये व शरीर उपभोगांसाठी सतत वखवखलेले असते.  व्याकूळ होते.  यामुळे साधनेमध्ये खंड येतो.

४) मन आणि मनावर झालेले संस्कार हा फार मोठा अडथळा आहे.  सतत भावनांचा उद्रेक, कामक्रोधादि विकारांचा परिणाम होऊन मन सतत क्षुब्ध, विक्षिप्त, अस्वस्थ असते.  यामुळे साधनेमध्ये मन एकाग्र होत नाही.

५) अहंकार – तो कधीही खाली येत नाही.  त्यामुळे साधक संपूर्ण समर्पण होऊ शकत नाही.  किंवा शास्त्राचे श्रवण केले तरी अहंकार ते मान्य करीत नाही.  मनामध्ये नैराश्य, वैफल्य येते आणि मग साधक साधनेपासून परावृत्त होतो.  त्याला सर्व माहित असूनही तो प्रयत्न करीत नाही.

६) अपरिपक्व अवस्थेमध्ये जर सर्वकर्मसंन्यास घेऊन फक्त शास्त्राचे श्रवण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यावेळी आपल्यामध्ये असलेला तमोगुण वाढतो.  मनाची सूक्ष्मता, ग्रहणशक्ति कमी होऊन विवेकवैराग्यादि गुणांचा ऱ्हास होतो.  आलस्य हीच वृत्ति प्रधान होते.  याप्रकारे योगनिष्ठेपासून त्याचे मन च्युत होते.

७) सद्गुणांची जोपासना, शमादिषट्संपत्ति आणि दैवीगुणसंपत्ति आत्मसात करून सत्त्वगुणाचा उत्कर्ष, इंद्रिय व मनावर संयमन या सर्व साधनेकडे जर दुर्लक्ष केलेले असेल तर श्रवण केलेल्या ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त होत नाही.  ज्ञान नि:संशय होत नाही.  इतकेच नव्हे तर, ज्ञाननिष्ठेचे फळ – निरतिशय आनंदप्राप्ति त्याला मिळत नाही.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, January 10, 2023

कलियुगात भगवंताचे कारुण्य | God's Compassion In Kaliyug

 



सृष्टि निर्माण झाल्यानंतर सर्वात पहिले युग हे कृत किंवा सत्ययुग आहे.  क्रमाने सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुग याप्रमाणे चार युगांचे चक्र अव्याहत चालू आहे.  सत्ययुगात मनुष्य सत्याच्या आधाराने जगत होता.  यानंतर त्रेतायुगातील माणसे यज्ञयागादि कर्मांच्या साहाय्याने जगत होती.  द्वापारयुगातील माणसे शास्त्र, उपासना यांचा आधार घेऊन तपोनिष्ठ जीवन जगली.  परंतु कलियुगामध्ये मात्र सर्व चांगल्या गोष्टींचा ऱ्हास होऊ लागला.  आज समाजात आपण तेच चित्र पाहत आहोत.  सत्य, दान धर्म, यज्ञयागादि कर्म, तपश्चर्या हे सर्व नावापुरतेच मर्यादित राहिले.  यामध्ये सर्वत्र पैशाचा व्यवहार आला.  त्यामुळे या सर्वांना विकृत स्वरूप प्राप्त झाले.

 

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कलियुगात बुद्धिवादी मनुष्याने - यत् दृश्यं तत् सत्यम् |  हीच विचारप्रणाली मानली.  मनुष्य सहजरीतीने चार्वाकनीतीचे अनुसरण करू लागला.  जे दिसते तेच सत्य आहे, असे मानल्यामुळे मनुष्याची बुद्धि दृष्याइतकीच, जडाइतकीच मर्यादित राहिली.  त्यामुळे मनुष्य दृश्य भोगांना महत्त्व देऊन त्यामध्ये रममाण होऊ लागला.  कनक-कांचन-कामिनी हेच जीवन बनले.  पुत्रेच्छा -लोकेच्छा आणि वित्तेच्छा पूर्ण करणे हेच जीवनाचे साध्य बनले.

 

याप्रमाणे मनुष्य दृश्याच्या मोहामध्ये पूर्णतः बद्ध झाला.  दृश्य विषय जड असल्यामुळे त्या विषयांचे चिंतन करून मनुष्यही जडवादी, भौतिकवादी बनून त्याची बुद्धि मंद झाली.  जन्माला येणे, खाणे, पिणे, उपभोगणे, पैसा कमविणे, सत्ता-प्रसिद्धि मिळविणे आणि एक दिवस मरून जाणे, इतकेच मनुष्याचे चरित्र बनले.  याचे कारण वेद-शास्त्र-पुराण यांच्या अज्ञानामुळे मृत्यूनंतर सुद्धा पुढचा जन्म आहे, मिळविण्यासारखे काहीतरी आहे, स्वर्गादि पारलौकिक लोक आहेत किंवा याच जन्मामध्ये मोक्षप्राप्ति करवून घेता येते, याची त्याला जाणीवच राहिली नाही.  याप्रकारे सर्व जीवांना शोकमोहांमध्ये आवृत्त झालेले पाहून भगवंताच्या मनामध्ये सर्वांच्याविषयी कारुण्य निर्माण झाले.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, January 3, 2023

चैतन्याचे आकारमान | Gauging the Consciousness

 



चैतन्य सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे.  चैतन्य हे विश्वामध्ये जे सूक्ष्म पदार्थ सांगितले जातात, त्या सर्वांपेक्षाही सूक्ष्म आहे.  या विश्वामध्ये सर्व पदार्थांच्यामध्ये अणु-रेणु हा अत्यंत लहान, सूक्ष्म आहे.  त्यापेक्षाही परमाणु, प्रोटॉन, न्युट्रॉन, इलेक्ट्रॉन हे अत्यंत सूक्ष्म आहेत.  पण चैतन्य हे त्या सर्वांच्यापेक्षाही सूक्ष्म आहे.  ते स्वरूप सूक्ष्माहूनही सूक्ष्म आणि स्थूलाहूनही स्थूल आहे.  तेच लहानात लहान आणि मोठ्यात मोठे आहे.  

श्रुति म्हणते – अणोरणीयान्महतो महीयान् |  (कठ. उप. १-२-२०)

असे ते स्वरूप सूक्ष्मापेक्षाही अत्यंत सूक्ष्म आणि स्थूलापेक्षाही अत्यंत स्थूल आहे.  संत तुकाराम महाराज म्हणतात – अणुरेणुया थोकडा तुका आकाशाएवढा ||

 

जे अत्यंत सूक्ष्म असते, तेच अत्यंत स्थूल असू शकते.  सर्वसाधारणपणे विश्वामध्ये आकाश हे सर्वात सूक्ष्म पंचमहाभूत मानले जाते.  चैतन्य हे आकाशपेक्षाही सूक्ष्म आणि पृथ्वीपेक्षाही अत्यंत स्थूल आहे.  चैतन्यस्वरूपामध्ये भूः भुवः स्वः महः जनः तपः सत्य, हे सप्तलोक म्हणजेच हे सर्व ब्रह्मांड अस्तित्वामध्ये आहे.  सर्व मनुष्यादि जीव, सर्व सृष्टि, सर्व ब्रह्मांड असे हे ऊर्ध्व लोक आणि अधोलोक, मनुष्यलोक, हे सर्वच लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे.  त्या लोकामध्ये जे जे निवास करतात, ते सर्व देवदेवता, ब्रह्माजी, विष्णूजी, सर्व देवदेवता त्याच्यामध्येच आहेत.  नंतर मनुष्ययोनि आणि तिर्यकयोनि म्हणजेच पशुपक्ष्यादि अधोयोनि सुद्धा याच्यामध्येच आश्रित आहे.  चैतन्य हे सर्वांचे अधिष्ठान आहे.  

 

व्यष्टीमध्ये प्रत्येक जीवामध्ये असणारा प्राण, मन आणि वाणी तेच चैतन्य आहे.  यामधून काय सूचित केले ?  प्राणामधून पंचप्राण – प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे सांगितले.  मन या शब्दामधून अंतःकरणचतुष्टय म्हणजेच मन, बुद्धि, चित्त, अहंकार हे सांगितले आणि वाणी यामधून सर्व इंद्रिये – पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये सांगितली.  थोडक्यात, संपूर्ण कार्यकारणसंघात चैतन्यामध्येच आश्रित आहे.  संपूर्ण स्थूल, सूक्ष्म, कारण शरीराला चैतन्याचीच सत्ता आहे.  चैतन्याशिवाय कोणीही कोणताही व्यवहार करू शकत नाही.  ते चैतन्य प्राणादींच्याही आत असून तेच प्राणाला किंवा सर्व इंद्रियांना सत्तास्फूर्ति प्रदान करते.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ