Tuesday, January 3, 2023

चैतन्याचे आकारमान | Gauging the Consciousness

 



चैतन्य सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे.  चैतन्य हे विश्वामध्ये जे सूक्ष्म पदार्थ सांगितले जातात, त्या सर्वांपेक्षाही सूक्ष्म आहे.  या विश्वामध्ये सर्व पदार्थांच्यामध्ये अणु-रेणु हा अत्यंत लहान, सूक्ष्म आहे.  त्यापेक्षाही परमाणु, प्रोटॉन, न्युट्रॉन, इलेक्ट्रॉन हे अत्यंत सूक्ष्म आहेत.  पण चैतन्य हे त्या सर्वांच्यापेक्षाही सूक्ष्म आहे.  ते स्वरूप सूक्ष्माहूनही सूक्ष्म आणि स्थूलाहूनही स्थूल आहे.  तेच लहानात लहान आणि मोठ्यात मोठे आहे.  

श्रुति म्हणते – अणोरणीयान्महतो महीयान् |  (कठ. उप. १-२-२०)

असे ते स्वरूप सूक्ष्मापेक्षाही अत्यंत सूक्ष्म आणि स्थूलापेक्षाही अत्यंत स्थूल आहे.  संत तुकाराम महाराज म्हणतात – अणुरेणुया थोकडा तुका आकाशाएवढा ||

 

जे अत्यंत सूक्ष्म असते, तेच अत्यंत स्थूल असू शकते.  सर्वसाधारणपणे विश्वामध्ये आकाश हे सर्वात सूक्ष्म पंचमहाभूत मानले जाते.  चैतन्य हे आकाशपेक्षाही सूक्ष्म आणि पृथ्वीपेक्षाही अत्यंत स्थूल आहे.  चैतन्यस्वरूपामध्ये भूः भुवः स्वः महः जनः तपः सत्य, हे सप्तलोक म्हणजेच हे सर्व ब्रह्मांड अस्तित्वामध्ये आहे.  सर्व मनुष्यादि जीव, सर्व सृष्टि, सर्व ब्रह्मांड असे हे ऊर्ध्व लोक आणि अधोलोक, मनुष्यलोक, हे सर्वच लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे.  त्या लोकामध्ये जे जे निवास करतात, ते सर्व देवदेवता, ब्रह्माजी, विष्णूजी, सर्व देवदेवता त्याच्यामध्येच आहेत.  नंतर मनुष्ययोनि आणि तिर्यकयोनि म्हणजेच पशुपक्ष्यादि अधोयोनि सुद्धा याच्यामध्येच आश्रित आहे.  चैतन्य हे सर्वांचे अधिष्ठान आहे.  

 

व्यष्टीमध्ये प्रत्येक जीवामध्ये असणारा प्राण, मन आणि वाणी तेच चैतन्य आहे.  यामधून काय सूचित केले ?  प्राणामधून पंचप्राण – प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे सांगितले.  मन या शब्दामधून अंतःकरणचतुष्टय म्हणजेच मन, बुद्धि, चित्त, अहंकार हे सांगितले आणि वाणी यामधून सर्व इंद्रिये – पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये सांगितली.  थोडक्यात, संपूर्ण कार्यकारणसंघात चैतन्यामध्येच आश्रित आहे.  संपूर्ण स्थूल, सूक्ष्म, कारण शरीराला चैतन्याचीच सत्ता आहे.  चैतन्याशिवाय कोणीही कोणताही व्यवहार करू शकत नाही.  ते चैतन्य प्राणादींच्याही आत असून तेच प्राणाला किंवा सर्व इंद्रियांना सत्तास्फूर्ति प्रदान करते.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ