सर्व साधनांचे प्रामुख्याने बहिरंग साधना व
अंतरंग साधना असे दोन प्रकार पडतात. यापैकी बहिरंग साधना ही मनावर केंद्रीभूत
असून अंतरंग साधना आत्मस्वरूपावर केंद्रीभूत आहे. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रथम मनावर
केंद्रीभूत असणारी बहिरंग साधना करणे आवश्यक आहे. मनामध्ये स्वभावतःच मल, विक्षेप व आवरण असे तीन
प्रकारचे दोष आहेत. मल म्हणजेच रागद्वेषादि अशुद्धता होय. विक्षेप म्हणजेच मनाची चंचलता किंवा अस्थिरता
होय.
आत्मज्ञानप्राप्तीसाठी साधकाने आपल्या
मनालाच अनुकूल करून घेतले पाहिजे. याचे
कारण आपले मन हेच आत्मज्ञानप्राप्तीचे साधन व स्थान आहे. आत्मज्ञानप्राप्तीचे साधन शरीर नाही. इंद्रिये नाहीत. तर मनानेच मनाच्या साहाय्याने मनामध्येच आत्मशांति
अनुभवायची आहे. यामुळे निरतिशय शांति
व पूर्ण तृप्ति अनुभवायची असेल तर आपले मन निदान काही प्रमाणात तरी शांत व प्रसन्न
असले पाहिजे. यासाठीच मल व विक्षेप हे दोष
कमी होऊन चित्ताची शुद्धता व स्थिरता प्राप्त केली पाहिजे. यासाठीच शास्त्रामध्ये ज्या ज्या साधना
सांगितल्या जातात त्यांना बहिरंग साधना असे म्हणतात. या चित्ताच्या शुद्धीसाठी व एकाग्रतेसाठीच
सांगितल्या जातात. रजोगुण व तमोगुण यांचे
विकार कमी करून सत्त्वगुणाचा
उत्कर्ष करणे हेच सर्व साधनांचे प्रयोजन आहे.
सर्व दृश्य अनुभवयोग्य आहे. Entire creation is an object
of my knowledge. मी
मात्र या सगळ्याचा द्रष्टा व ज्ञाता आहे. म्हणून
मी subject आहे व हे संपूर्ण विश्व object आहे. सर्वसामान्यतेने आपण जीवनभर, नव्हे जन्मानुजन्मे
object चेच ज्ञान घेतो. परंतु मला
subject चे म्हणजेच ‘मी’ चे अज्ञान आहे. मी
कोण ? हे मला माहीत नाही. म्हणून या subject चे, ‘मी’ चे म्हणजेच
स्वरूपाचे ज्ञान होणे हेच प्रत्येक मनुष्याचे खरे कर्तव्य आहे.
परमेश्वर आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये सन्निविष्ट आहे. परंतु
अंतःकरणामध्ये अज्ञानरूपी अंधाराचे आवरण असल्याने परमेश्वर असूनही दिसत नाही,
आपल्याला अनुभवायला येत नाही. म्हणून आनंदस्वरूप
परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आत्मज्ञानरूपी प्रकाश उदयाला आला पाहिजे. त्यासाठी आत्मज्ञानाचीच नितांत आवश्यकता आहे. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या
साधनेलाच अंतरंग साधना असे म्हणतात.
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "Bhaj
Govindam" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015
- हरी ॐ–