Tuesday, January 10, 2023

कलियुगात भगवंताचे कारुण्य | God's Compassion In Kaliyug

 



सृष्टि निर्माण झाल्यानंतर सर्वात पहिले युग हे कृत किंवा सत्ययुग आहे.  क्रमाने सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुग याप्रमाणे चार युगांचे चक्र अव्याहत चालू आहे.  सत्ययुगात मनुष्य सत्याच्या आधाराने जगत होता.  यानंतर त्रेतायुगातील माणसे यज्ञयागादि कर्मांच्या साहाय्याने जगत होती.  द्वापारयुगातील माणसे शास्त्र, उपासना यांचा आधार घेऊन तपोनिष्ठ जीवन जगली.  परंतु कलियुगामध्ये मात्र सर्व चांगल्या गोष्टींचा ऱ्हास होऊ लागला.  आज समाजात आपण तेच चित्र पाहत आहोत.  सत्य, दान धर्म, यज्ञयागादि कर्म, तपश्चर्या हे सर्व नावापुरतेच मर्यादित राहिले.  यामध्ये सर्वत्र पैशाचा व्यवहार आला.  त्यामुळे या सर्वांना विकृत स्वरूप प्राप्त झाले.

 

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कलियुगात बुद्धिवादी मनुष्याने - यत् दृश्यं तत् सत्यम् |  हीच विचारप्रणाली मानली.  मनुष्य सहजरीतीने चार्वाकनीतीचे अनुसरण करू लागला.  जे दिसते तेच सत्य आहे, असे मानल्यामुळे मनुष्याची बुद्धि दृष्याइतकीच, जडाइतकीच मर्यादित राहिली.  त्यामुळे मनुष्य दृश्य भोगांना महत्त्व देऊन त्यामध्ये रममाण होऊ लागला.  कनक-कांचन-कामिनी हेच जीवन बनले.  पुत्रेच्छा -लोकेच्छा आणि वित्तेच्छा पूर्ण करणे हेच जीवनाचे साध्य बनले.

 

याप्रमाणे मनुष्य दृश्याच्या मोहामध्ये पूर्णतः बद्ध झाला.  दृश्य विषय जड असल्यामुळे त्या विषयांचे चिंतन करून मनुष्यही जडवादी, भौतिकवादी बनून त्याची बुद्धि मंद झाली.  जन्माला येणे, खाणे, पिणे, उपभोगणे, पैसा कमविणे, सत्ता-प्रसिद्धि मिळविणे आणि एक दिवस मरून जाणे, इतकेच मनुष्याचे चरित्र बनले.  याचे कारण वेद-शास्त्र-पुराण यांच्या अज्ञानामुळे मृत्यूनंतर सुद्धा पुढचा जन्म आहे, मिळविण्यासारखे काहीतरी आहे, स्वर्गादि पारलौकिक लोक आहेत किंवा याच जन्मामध्ये मोक्षप्राप्ति करवून घेता येते, याची त्याला जाणीवच राहिली नाही.  याप्रकारे सर्व जीवांना शोकमोहांमध्ये आवृत्त झालेले पाहून भगवंताच्या मनामध्ये सर्वांच्याविषयी कारुण्य निर्माण झाले.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ