Tuesday, January 17, 2023

मोक्षमार्गातील अडथळे | Obstacles on the Path of Liberation

 



श्रेयस मार्गामध्ये श्रवणमननादि साधना करीत असताना आपलीच स्वतःची कर्मे आपल्या मार्गात अनेक प्रकारचे अनिष्ट प्रसंग निर्माण करून प्रतिबंध निर्माण करतात.  ही सर्व विघ्ने योगसाधनेमध्ये दोष निर्माण करून साधकाचे मन योगनिष्ठेपासून विचलित करतात.

 

१) निरनिराळे अनपेक्षित आणि अनिष्ट प्रसंग मनावर आघात करून मनाला उत्तेजित करतात.  त्यामुळे मनामध्ये क्षोभ, संताप, विक्षेप निर्माण होतात.  समाधि अभ्यासामध्ये विच्छित्ति येते.  आत्मस्वरुपाची वृत्ति खंडित होते.

२) आध्यत्मिक साधना करताना प्रत्येकाला वाटत असते की, साधनेने सर्व प्रतिबंध, अडथळे किंवा व्यावहारिक समस्या निवारण होतील.  परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या, नवीन नवीन प्रश्न आणि अडथळे येतात.  साधानेमध्ये मन एकाग्र होत नाही.

३) साधनकाळामध्ये विषयांचा संग, आकर्षण, सौंदर्य आणि मोह हा फार मोठा अडथळा आहे.  शरीराला विषयभोगाची लागलेली चटक संपता संपत नाही.  कितीही समजले तरी सवयीमुळे इंद्रिये व शरीर उपभोगांसाठी सतत वखवखलेले असते.  व्याकूळ होते.  यामुळे साधनेमध्ये खंड येतो.

४) मन आणि मनावर झालेले संस्कार हा फार मोठा अडथळा आहे.  सतत भावनांचा उद्रेक, कामक्रोधादि विकारांचा परिणाम होऊन मन सतत क्षुब्ध, विक्षिप्त, अस्वस्थ असते.  यामुळे साधनेमध्ये मन एकाग्र होत नाही.

५) अहंकार – तो कधीही खाली येत नाही.  त्यामुळे साधक संपूर्ण समर्पण होऊ शकत नाही.  किंवा शास्त्राचे श्रवण केले तरी अहंकार ते मान्य करीत नाही.  मनामध्ये नैराश्य, वैफल्य येते आणि मग साधक साधनेपासून परावृत्त होतो.  त्याला सर्व माहित असूनही तो प्रयत्न करीत नाही.

६) अपरिपक्व अवस्थेमध्ये जर सर्वकर्मसंन्यास घेऊन फक्त शास्त्राचे श्रवण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यावेळी आपल्यामध्ये असलेला तमोगुण वाढतो.  मनाची सूक्ष्मता, ग्रहणशक्ति कमी होऊन विवेकवैराग्यादि गुणांचा ऱ्हास होतो.  आलस्य हीच वृत्ति प्रधान होते.  याप्रकारे योगनिष्ठेपासून त्याचे मन च्युत होते.

७) सद्गुणांची जोपासना, शमादिषट्संपत्ति आणि दैवीगुणसंपत्ति आत्मसात करून सत्त्वगुणाचा उत्कर्ष, इंद्रिय व मनावर संयमन या सर्व साधनेकडे जर दुर्लक्ष केलेले असेल तर श्रवण केलेल्या ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त होत नाही.  ज्ञान नि:संशय होत नाही.  इतकेच नव्हे तर, ज्ञाननिष्ठेचे फळ – निरतिशय आनंदप्राप्ति त्याला मिळत नाही.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ