Sunday, June 28, 2020

अपरा प्रकृति | Inferior Existence




अष्टधा प्रकृतीमधुनच या नानाविविध विश्वाची निर्मिति होते.  सूक्ष्म पंचमहाभूते, मन, बुद्धि, अहंकार यांनी युक्त असणारी अशी ही अष्टधा अपरा प्रकृति परमेश्वराच्या परा शक्तीपासून भिन्न स्वरूपाची आहे.  अपरा म्हणजेच निकृष्ट स्वरूपाची आहे.  अपरा प्रकृति ही निकृष्ट स्वरूपाची का आहे ?  आचार्य याचे उत्तर देतात –

१) अनृतत्वात्अपरा प्रकृति ही निर्मित असल्यामुळे सतत विकारयुक्त असून मिथ्या स्वरूपाची आहे.
२) जडत्वात् – ही प्रकृति अचेतन आहे.  ती स्वतःहून कार्यान्वित होऊ शकत नाही.
३) दुःखात्मकत्वात् – ही प्रकृति दुःखस्वरूप आहे.  म्हणूनच या विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये सुखाची अनुभूति येत नाही.  इंद्रियांच्या माध्यमातून घेतलेले सर्व विषयांचे उपभोगही दुःखालाच कारण होतात.  दुःख दोन प्रकाराने होते.  प्रियवियोगेन – प्रिय विषयांच्या वियोगाने आणि अप्रियसंयोगेन – अप्रिय विषयांच्या संयोगानेही दुःखप्राप्ति होते.  
४) अशुद्धत्वात् – ही अपरा प्रकृति रजोगुण व तमोगुणाच्या प्रभावाने युक्त असल्यामुळेच तिला अशुद्ध अथवा मलिन प्रकृति असे म्हणतात.  
५) पुरुषाधीनत्वात् – ही अपरा प्रकृति जड, अचेतन असल्यामुळे तिला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही.  ती स्वतःहून कार्यान्वित होऊ शकत नाही.  म्हणून सत्तास्फूर्तीसाठी ती पुरुषावर अवलंबून आहे.  म्हणजे परमात्म्याच्या चेतानात्मक प्रकृतीवर अवलंबून आहे.  
६) वेद्यत्वात् – अशी ही प्रकृति वेद्य म्हणजेच दृश्य, इंद्रियगोचर आहे.  मनाच्या, बुद्धीच्या साहाय्याने तिचे स्वरूप जाणता येते.
७) ज्ञानेन निवर्त्यत्वात् – ही अपरा प्रकृति आत्ताच वर्णन केल्याप्रमाणे मिथ्या, जड, दुःखात्मक, अशुद्ध, पुरुषाधीन असेल तरीही ती दृश्य, वेद्य असल्यामुळे तिचे ज्ञान घेता येते.  

ही अपरा प्रकृति बुद्धीवर अज्ञानाचे आवरण घालून जीवाला बहिर्मुख, विषयासक्त करते आणि क्रमाने जीवाचे अधःपतन करते.  ती संसारवर्धन करून जीवाला स्वतःच्या वर्चस्वाखाली ठेवते.  जीवांना मोहीत करून कठपुतली बाहुल्यांच्याप्रमाणे जन्मानुजन्मे नाचविते.



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, खंड ४, प्रथमावृत्ति - मार्च १९९८
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, Volume 4, 1st Edition, March 1998


- हरी ॐ


Tuesday, June 23, 2020

ध्वनिसाधना | Use of Sound in Worship




आकाशामध्ये ज्यावेळी कोणताही शब्द उच्चारला जातो, त्यावेळी ध्वनीचा स्फोट होतो.  त्यावेळी स्फोट होण्यासाठी असणारे इंद्रिय म्हणजे वाणी आकाशामधूनच निर्माण झाली.  त्याचप्रमाणे आकाशामध्ये झालेला स्फोट ग्रहण करण्यासाठी कर्ण हे इंद्रिय सुद्धा आकाशामधूनच निर्माण झाले.  म्हणून एका बाजूला शब्दाचा स्फोट व दुसऱ्या बाजूला एकच वेळी त्या शब्दाचे श्रवण ह्या दोन्ही क्रिया एकच वेळी घडतात.  त्याचप्रमाणे, ‘श्रीराम’ शब्द मी उच्चारतो व तो ध्वनि मीच ऐकतो.  म्हणून जपसाधनेमध्ये मंत्राचा जाणीवपूर्वक उच्चार करणे आणि मंत्रोच्चार जाणीवपूर्वक श्रवण करणे हे मनाचे कार्य आहे.  प्रत्येक उच्चाराबरोबर ध्वनीलहरी निर्माण होतात.  या ध्वनीलहरींचा परिणाम मनावर होत असतो.  

म्हणून ‘श्रीराम’ म्हणत असताना तो उच्चार काळजीपूर्वक श्रवण करावा.  यामुळे मनाची सावधानता (alertness) वाढते.  मन या दोन क्रियांच्यामध्ये एकाग्र झाल्यामुळे मंत्र-वृत्ति, मंत्र-वृत्ति यामध्ये समन्वय निर्माण होतो.  मंत्राव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वृत्ति नाहीशा होतात.  मन तल्लीन, तन्मय, तद्रूप होते.  हळुहळू संपूर्ण विश्वाची, विषयांची, शरीराची, ‘मी’ची सुद्धा जाणीव संपते.  राहतो तो फक्त मंत्रोच्चाराचा ध्वनि.  मी ध्वनीशी तन्मय होतो.

म्हणून संगीतसाधना ही सुद्धा ध्वनिसाधना आहे.  संगीतामध्ये गायकाचे मन स्वरांशी, ध्वनीशी तन्मय होते.  स्वर आणि तो भिन्न न राहता गायक स्वरमय होऊन जातो.  त्यावेळी मन अत्यंत सूक्ष्म होऊन अत्युच्च अवस्थेवर पोहोचते.  यालाच गायन शास्त्रामध्ये ‘गानसमाधि’ असे म्हणतात.  म्हणून संगीत हे परमेश्वराजवळ पोहोचण्यासाठी साधन आहे.

यामध्ये सखोल विचार केला तर समजते, ध्वनि हा आकाशाचा गुण आहे.  आकाशाला कोणतेही रूप, रंग, गुणधर्म नाही.  त्यामुळे ध्वनीला सुद्धा कोणतेही विशिष्ट रंगरूप नाही.  यामुळे मन या ध्वनीसाधनेमध्ये तन्मय झाले तर ते सहजपणे नामरूपरहित, अंतर्मुख, वृत्तीरहित होते.  सर्व प्रकारचे विकार गळून पडतात.  मन अत्यंत स्थिर, शुद्ध, शांत आणि अंतर्मुख होते.  बाह्य जाणीव संपते.  अखंडपणे, दीर्घकाळ सजातीय वृत्तिप्रवाह निर्माण होतो.  या अवस्थेलाच ‘भावसमाधि’ किंवा ‘सविकल्प समाधि’ असे म्हणतात.


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011



- हरी ॐ


Tuesday, June 16, 2020

शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार | Scientific Way of Chanting




शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार करीत असताना त्या मंत्राची आवृत्ति कशी करावी ?  यासाठी सुद्धा शास्त्र आहे.  तो मंत्र अधिक जलद गतीने अथवा अति संथ गतीनेही करू नये.  जपामध्ये वेळ (time factor) हा महत्वाचा घटक आहे.  नाहीतर केवळ मंत्रोच्चार होईल परंतु जपसाधना होणार नाही.

प्रत्येक मंत्राला सुरुवात व शेवट आहे.  मंत्रोच्चार झाल्याबरोबर त्या बरहुकुम मनामध्ये त्याची वृत्ति निर्माण करणे हा महत्वाचा भाग आहे.  जर तुम्ही तो मंत्र – श्रीराम.  श्रीराम.  श्रीराम.  श्रीराम.  अशा जलद गतीने म्हणत असाल तर त्यामध्ये मन काही क्षण दक्ष (alert) असेल परंतु थोड्याच वेळात मंत्रोच्चार आणि मंत्राबरहुकुम दुसरी, तिसरी, चवथी वृत्ति निर्माण होणे या प्रक्रियेमध्ये विसंगति निर्माण होते.  मंत्रोच्चार जलद होतो व संपतो आणि त्याबरहुकुम वृत्ति निर्माण होण्यापूर्वीच दुसरा मंत्रोच्चार होतो.  मंत्र आणि वृत्ति यामध्ये समन्वय राहत नाही.  त्याक्षणी मनाची दक्षता (alertness) संपते.  यामध्ये जपसंख्या वाढते.  परंतु मन मात्र जपामधून निसटून बाह्य विषयांच्यामध्येच रममाण होते.  माळ फिरते, बोटे फिरतात, ओठ हालतात, मंत्रोच्चार होतो परंतु या सर्व क्रियांच्यामध्ये यांत्रिकपणा (mechanicalness) येतो.  यामुळे जपाचे फळ मिळत नाही.  म्हणून मंत्रोच्चार अत्यंत जलद गतीने करू नये.

मंत्रोच्चार खूप संथ गतीने झाला तर मन वृत्तीरहित होते.  मन लय पावायला लागते.  त्यावेळी तमोगुणाचा प्रभाव वाढतो.  मंत्रोच्चाराची जाणीव नाहीशी होते.  अंतरिक सावधानता संपते.  शरीर, मन, इंद्रिये व्यापारशून्य, शांत होतात.  ही शांति लयावस्थेची आहे.  त्या शांतीची जाणीव राहत नाही.  जागे झाल्यावर समजते की, आपण खूप सुंद झालो आहोत.  ज्याप्रमाणे झोपेतून उठल्यावर आपण सुंद असतो, तसेच संथ गतीने केलेल्या जपामुळे झोप येणे हा फार मोठा प्रतिबंध आहे.  म्हणुनच मंत्रोच्चार अतिशय संथ गतीनेही करू नये.

ज्याप्रमाणे मोत्यांच्या माळेमध्ये मोत्यांची रचना व्यवस्थित, समप्रमाणात अंतर ठेवून केलेली असते.  त्यामुळे ती माळ अत्यंत सुंदर, आकर्षक दिसते.  त्यामध्ये समन्वय दिसतो.  त्याचप्रमाणे जपसाधना करीत असताना प्रथम मन सर्व विषयांच्यापासून निवृत्त करावे.  मंत्राच्या विषयाच्यामध्ये एकाग्र करावे आणि मंत्रोच्चार अति जलद किंवा अति संथ न करता मोत्यांच्या हाराप्रमाणे अखंडपणे दीर्घकाळ करावा.  


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011


- हरी ॐ


Tuesday, June 9, 2020

जपसाधनेचे तत्त्व | Principle of ‘Japa’




व्यवहारामध्ये सुद्धा मी अनेक शब्द उच्चारतो, परंतु घट, पट, वृक्ष, डोंगर, नदी, दगड, राम असे शब्द सारखे बदलतात.  प्रत्येक शब्दाचा विषय भिन्न भिन्न असल्यामुळे मनामध्ये भिन्न भिन्न वृत्ति निर्माण होतात.  नदीच्या अखंड प्रवाहाप्रमाणे वृत्तींचा अखंड प्रवाह (continuous flow of thoughts) निर्माण होतो.  एक वृत्ति येते आणि जाते, त्या वृत्तीची जागा दुसरी वृत्ति, तिसरी वृत्ति, चौथी वृत्ति अशा अनंत, अमर्याद वृत्ति सातत्याने निर्माण होत राहतात.  

या वृत्ति बाह्य विषयांनाच प्रकाशमान करतात, म्हणून या मनाला बहिर्मुख, विषयामुख मन म्हणतात.  याला संस्कृतमध्ये ‘विजातीय वृत्तिप्रवाह’ (heterogeneous flow of thoughts) असे म्हणले जाते.  पहिला विचार दुसऱ्या विचारापासून भिन्न, दुसरा तिसऱ्यापासून भिन्न असतो.  याचे कारण प्रत्येक विचाराचा विषय भिन्न भिन्न आहे.  या बहिर्मुख वृत्तीमधूनच रागद्वेषादि विकार निर्माण होतात. म्हणून विषयवृत्तींचा निरास केला पाहिजे.  मन वृत्तीरहित करायचे नसून मनामधील विजातीय वृत्तीप्रवाहाचा निरास होणे आवश्यक आहे.  यासाठीच ‘जपउपासना’ किंवा ‘नामस्मरण’ हे प्रभावी साधन आहे.

नामस्मरणामध्ये मन जर तल्लीन, तन्मय, तद्रूप झाले, तर दीर्घकाळ, सातत्याने विषयांच्या वृत्ति निरास होतात.  अखंडपणाने एकच एक श्रीरामाची वृत्ति निर्माण होते.  भगवान श्रीरमणमहर्षि दोन दृष्टांत देतात – आज्यधारया स्त्रोतसा समम् |  सरलचिंतनं विरलतः परम् || (उपदेश सारम्)
तुपाच्या संतत धारेप्रमाणे अथवा नदीच्या अखंड प्रवाहाप्रमाणे सरळ चिंतन निर्माण होते.  जसे थेंबाथेंबाने धार निर्माण होते.  एक थेंब दुसऱ्या थेंबापासून भिन्न करता येत नाही.  दोन थेंबातील अंतर कमी कमी होऊन त्यामधून संतत धार निर्माण होते.

त्याप्रमाणे परमेश्वराच्या वृत्तीमध्ये जसजशी तन्मयता वाढायला लागते, त्याप्रमाणात विश्वाची जाणीव कमी कमी होते.  विश्वामधील विषयांच्या सवेंदना कानापर्यंत, इंद्रियांपर्यंत आल्या तरी त्या संवेदना अंतरंगाची अवस्था विचलित (disturbed) करू शकत नाहीत.  इतकेच नव्हे, तर त्यावेळी स्वतःच्या शरीराची जाणीव सुद्धा कमी व्हायला लागते.  कारण शरीराशी झालेले मनाचे तादात्म्य कमी कमी होते.  मन दीर्घकाळ उन्मनी अवस्थेमध्ये राहते, यालाच काही वेळेला ‘भावसमाधि’ असेही म्हणतात.  म्हणूनच जपसाधना ही अन्य साधनांच्यापेक्षा श्रेष्ठ साधना आहे.  


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011



- हरी ॐ


Wednesday, June 3, 2020

धार्मिक कर्मातील दोष | Defects in Rituals




यज्ञयागादि धार्मिक कर्म ही शरीराने, इंद्रियांनी केलेली साधना आहे.  यामध्ये पूजा, अर्चना, उपवास, व्रत, वैकल्ये आणि अनेक प्रकारचे यज्ञ अंतर्भूत होतात.  अशी सर्व प्रकारची धार्मिक कर्मे करीत असताना अनेक दोष निर्माण होतात.  

प्रत्येक धार्मिक विधीमध्ये अनके प्रकारची सामग्री लागते.  गुरुजी यादी देतात.  यादीप्रमाणे आपण काही सामान आणतो.  परंतु त्यामध्ये तडजोड करतो.  तसेच जे सामान उपलब्ध नसते, त्याऐवजी अक्षता वाहतो.  अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि |  असे मंत्र आपल्याला तोंडपाठ असतात.  याप्रकारे सामग्रीचा अभाव हा पहिला दोष.  दुसरा दोष म्हणजेच सर्वच धार्मिक विधि आपण स्वतःच करीत नाही.  गुरुजींच्याकडून करवून घेतो.  काही वेळेला गुरुजी ज्या मंत्रांच्या साहाय्याने ते कर्म करतात, त्या मंत्रांचे उच्चार अशुद्ध, अस्पष्ट होतात.

तिसरा दोष म्हणजे गुरुजी मंत्र म्हणत असतात परंतु यजमान त्या मंत्राबरहुकुम क्रिया करीत नाही.  जसे, गुरुजी मंत्र म्हणतात – हरिद्राकुंकुमम् समर्पयामि |  त्यावेळी मला हळद, कुंकू सापडतच नाही.  गुरुजी पुढे पुढे मंत्र म्हणत राहतात.  ते म्हणत असतात – नैवेद्यं समर्पयामि |  आणि मी मात्र त्यावेळेस हळद, कुंकू वाहत असतो.  म्हणजेच वैदिक मंत्र व वैदिक क्रिया यामध्ये समन्वय राहत नाही.  चवथा दोष यजमानाचा आहे.  आपण शरीराने वैदिक किंवा धार्मिक विधि करतो.  परंतु, आपले संपूर्ण लक्ष त्या कर्मामध्ये नसून बाहेरचे कोण लोक आले ?  कोण गेले ?  यावरच असते.  आपण एखाद्या समाजकार्याप्रमाणे (social activity) यज्ञकर्म करतो, कारण आपल्याला धार्मिक विधि करायचा नसून धार्मिकतेचे समाजात प्रदर्शन करावयाचे असते.  यामुळेच माणसे किती आली ?  कोणती आली ?  तिकडेच आपले लक्ष असते.  मन कधीही त्या धार्मिक कर्मामध्ये तन्मय, तल्लीन, एकाग्र होत नाही.

याप्रकारे धार्मिक कर्म करून त्या मोबदल्यात भगवंताला धर्म, अर्थ, कां, मोक्ष हे चार पुरुषार्थ मागतो.  एवढे दोष असताना परमेश्वर कसा बरे प्रसन्न होईल ?  शास्त्रामध्ये या दोषांना ‘प्रत्यवाय दोष’ असे म्हणतात.  या दोषांच्यामुळे पुष्कळ वेळेला कर्म करूनही इष्ट फळ प्राप्त होत नाही.  तसेच मनही बहिर्मुख होते.  या सर्व दोषांचा जपसाधनेमध्ये निरास होतो.  


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011



- हरी ॐ