Tuesday, June 23, 2020

ध्वनिसाधना | Use of Sound in Worship
आकाशामध्ये ज्यावेळी कोणताही शब्द उच्चारला जातो, त्यावेळी ध्वनीचा स्फोट होतो.  त्यावेळी स्फोट होण्यासाठी असणारे इंद्रिय म्हणजे वाणी आकाशामधूनच निर्माण झाली.  त्याचप्रमाणे आकाशामध्ये झालेला स्फोट ग्रहण करण्यासाठी कर्ण हे इंद्रिय सुद्धा आकाशामधूनच निर्माण झाले.  म्हणून एका बाजूला शब्दाचा स्फोट व दुसऱ्या बाजूला एकच वेळी त्या शब्दाचे श्रवण ह्या दोन्ही क्रिया एकच वेळी घडतात.  त्याचप्रमाणे, ‘श्रीराम’ शब्द मी उच्चारतो व तो ध्वनि मीच ऐकतो.  म्हणून जपसाधनेमध्ये मंत्राचा जाणीवपूर्वक उच्चार करणे आणि मंत्रोच्चार जाणीवपूर्वक श्रवण करणे हे मनाचे कार्य आहे.  प्रत्येक उच्चाराबरोबर ध्वनीलहरी निर्माण होतात.  या ध्वनीलहरींचा परिणाम मनावर होत असतो.  

म्हणून ‘श्रीराम’ म्हणत असताना तो उच्चार काळजीपूर्वक श्रवण करावा.  यामुळे मनाची सावधानता (alertness) वाढते.  मन या दोन क्रियांच्यामध्ये एकाग्र झाल्यामुळे मंत्र-वृत्ति, मंत्र-वृत्ति यामध्ये समन्वय निर्माण होतो.  मंत्राव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वृत्ति नाहीशा होतात.  मन तल्लीन, तन्मय, तद्रूप होते.  हळुहळू संपूर्ण विश्वाची, विषयांची, शरीराची, ‘मी’ची सुद्धा जाणीव संपते.  राहतो तो फक्त मंत्रोच्चाराचा ध्वनि.  मी ध्वनीशी तन्मय होतो.

म्हणून संगीतसाधना ही सुद्धा ध्वनिसाधना आहे.  संगीतामध्ये गायकाचे मन स्वरांशी, ध्वनीशी तन्मय होते.  स्वर आणि तो भिन्न न राहता गायक स्वरमय होऊन जातो.  त्यावेळी मन अत्यंत सूक्ष्म होऊन अत्युच्च अवस्थेवर पोहोचते.  यालाच गायन शास्त्रामध्ये ‘गानसमाधि’ असे म्हणतात.  म्हणून संगीत हे परमेश्वराजवळ पोहोचण्यासाठी साधन आहे.

यामध्ये सखोल विचार केला तर समजते, ध्वनि हा आकाशाचा गुण आहे.  आकाशाला कोणतेही रूप, रंग, गुणधर्म नाही.  त्यामुळे ध्वनीला सुद्धा कोणतेही विशिष्ट रंगरूप नाही.  यामुळे मन या ध्वनीसाधनेमध्ये तन्मय झाले तर ते सहजपणे नामरूपरहित, अंतर्मुख, वृत्तीरहित होते.  सर्व प्रकारचे विकार गळून पडतात.  मन अत्यंत स्थिर, शुद्ध, शांत आणि अंतर्मुख होते.  बाह्य जाणीव संपते.  अखंडपणे, दीर्घकाळ सजातीय वृत्तिप्रवाह निर्माण होतो.  या अवस्थेलाच ‘भावसमाधि’ किंवा ‘सविकल्प समाधि’ असे म्हणतात.


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011- हरी ॐ