यज्ञयागादि
धार्मिक कर्म ही शरीराने, इंद्रियांनी केलेली साधना आहे. यामध्ये पूजा, अर्चना, उपवास, व्रत, वैकल्ये आणि
अनेक प्रकारचे यज्ञ अंतर्भूत होतात. अशी
सर्व प्रकारची धार्मिक कर्मे करीत असताना अनेक दोष निर्माण होतात.
प्रत्येक
धार्मिक विधीमध्ये अनके प्रकारची सामग्री लागते. गुरुजी यादी देतात. यादीप्रमाणे आपण काही सामान आणतो. परंतु त्यामध्ये तडजोड करतो. तसेच जे सामान उपलब्ध नसते, त्याऐवजी अक्षता
वाहतो. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि | असे मंत्र आपल्याला तोंडपाठ
असतात. याप्रकारे सामग्रीचा अभाव
हा पहिला दोष. दुसरा दोष
म्हणजेच सर्वच धार्मिक विधि आपण स्वतःच करीत नाही. गुरुजींच्याकडून करवून घेतो. काही वेळेला गुरुजी ज्या मंत्रांच्या साहाय्याने
ते कर्म करतात, त्या मंत्रांचे उच्चार अशुद्ध, अस्पष्ट होतात.
तिसरा
दोष म्हणजे गुरुजी मंत्र म्हणत असतात परंतु यजमान त्या
मंत्राबरहुकुम क्रिया करीत नाही. जसे,
गुरुजी मंत्र म्हणतात – हरिद्राकुंकुमम् समर्पयामि | त्यावेळी
मला हळद, कुंकू सापडतच नाही. गुरुजी पुढे पुढे
मंत्र म्हणत राहतात. ते म्हणत असतात – नैवेद्यं
समर्पयामि | आणि मी मात्र त्यावेळेस
हळद, कुंकू वाहत असतो. म्हणजेच वैदिक
मंत्र व वैदिक क्रिया यामध्ये समन्वय राहत नाही. चवथा दोष यजमानाचा आहे. आपण शरीराने वैदिक किंवा धार्मिक विधि करतो. परंतु, आपले संपूर्ण लक्ष त्या कर्मामध्ये नसून
बाहेरचे कोण लोक आले ? कोण गेले ? यावरच असते. आपण एखाद्या समाजकार्याप्रमाणे (social activity) यज्ञकर्म करतो, कारण आपल्याला धार्मिक
विधि करायचा नसून धार्मिकतेचे समाजात प्रदर्शन करावयाचे असते. यामुळेच माणसे किती आली ? कोणती आली ? तिकडेच आपले लक्ष असते. मन कधीही त्या धार्मिक कर्मामध्ये तन्मय, तल्लीन,
एकाग्र होत नाही.
याप्रकारे
धार्मिक कर्म करून त्या मोबदल्यात भगवंताला धर्म, अर्थ, कां, मोक्ष हे चार
पुरुषार्थ मागतो. एवढे दोष असताना
परमेश्वर कसा बरे प्रसन्न होईल ? शास्त्रामध्ये
या दोषांना ‘प्रत्यवाय दोष’ असे म्हणतात. या दोषांच्यामुळे पुष्कळ वेळेला कर्म करूनही
इष्ट फळ प्राप्त होत नाही. तसेच मनही
बहिर्मुख होते. या सर्व दोषांचा जपसाधनेमध्ये
निरास होतो.
- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, July 2011
- Reference: "Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, July 2011
-
हरी ॐ–
No comments:
Post a Comment