Showing posts with label Mantra. Show all posts
Showing posts with label Mantra. Show all posts

Tuesday, October 28, 2025

महामारी प्रतिकार मंत्र | Mantra For Pandemic Defence

 



"महामारी जरी भयंकर असेल तरी शास्त्रविहित व धर्मपरायण, सज्जन लोकांचे यामधून रक्षण व्हावे, त्यांना या महामारीची चिकित्सा करता यावी, महामारीसारख्या भयंकर रोगाचा प्रतिकार करता यावा, म्हणून हा एक मंत्र माझ्याजवळ आहे. त्या मंत्राचा मी आता उच्चार करतो." असे म्हणून पितामह ब्रह्मदेवांनी हा मंत्र व त्याचे रहस्य सांगण्यास प्रारंभ केला. "हिमालय पर्वताच्या उत्तर दिशेला 'कर्कटी' नावाची एक राक्षसी राहत आहे. तिच्या निवारणाचा मंत्र पुढील प्रमाणे आहे -

ॐ ह्रींह्रांरींरां विष्णुशक्तये नमः | ॐ नमो भगवति विष्णुशक्तिमेनां ॐ हरहर नयनय पचपच मथमथ उत्सादय दूरेकुरु स्वाहा हिमवन्तं गच्छ जीव सः सः सः चन्द्रमन्डलगतोSसि स्वाहा |

 

असा हा मंत्र भूर्जपत्रावर लिहून रुग्णाच्या डाव्या तळहातावर ठेवावा व नंतर रुग्णावर पाणी शिंपडावे. मंत्र म्हणत असताना मंत्र म्हणणाऱ्याने आपल्या मनामध्ये दृढ भावना करावी की, या मंत्ररूपी मुद्गराच्या जोरदार शास्त्राने कर्कटी राक्षसीचे मर्दन झाले असून ती अत्यंत कर्कश आवाजात हिमालय पर्वताच्या दिशेने धावत सुटली आहे. जो रुग्ण आहे त्याने चिंतन करावे की, तो अमृताने युक्त असणाऱ्या चंद्रमंडलात पोहोचला असून त्याच्या हृदयात चंद्रसायन आहे. तो सर्व रोगांच्या भ्रमापासून मुक्त झाला आहे. साधकाने स्नान करून शुचिर्भूत व्हावे व अत्यंत शांत व स्थिर चित्ताने आचरण करून क्रमाने सांगितल्याप्रमाणे या सर्व क्रिया कराव्यात. असे केल्यामुळे निश्चितच तो मंत्र या विषुचिकेचा, या महामारीचा नाश करतो.

 

हा मंत्र म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार करणे नव्हे ! हे सिद्ध मंत्र त्यांच्या शक्तींनी युक्त असतात. त्यामुळे दिलेल्या नियमाप्रमाणेच मंत्रोच्चार करणे आवश्यक असते आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मंत्रोच्चार करणारा साधक आणि रुग्ण या दोघांच्याही अंतःकरणात त्या मंत्राबद्दल पूर्ण विश्वास आणि नितांत श्रद्धा आवश्यक आहे.

 

मनुष्याला, राष्ट्राला किंबहुना संपूर्ण विश्वाला महामारीसारख्या सुद्धा दुर्धर संकटामधून मुक्त व्हावयाचे असेल तर मंत्र, औषधोपचार वगैरेदि अनेक उपाय आहेत. मात्र त्या सर्वांचा योग्य परिणाम व्हावयाचा असेल तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सद्गुण, सदाचार, सात्त्विक वृत्ति, धर्मबुध्दि आवश्यक आहे. मनुष्य पौर्वात्य असो व पाश्चिमात्य, श्रीमंत असो अथवा गरीब, सुशिक्षित असो अथवा अशिक्षित, परंतु प्रत्त्येक मनुष्यामध्ये चांगली वृत्ति आवश्यक आहे. त्याच्यामध्ये माणुसकी, मनुष्यत्व व त्यासाठी आवश्यक असणारे प्रेम, त्याग, निःस्वार्थता, समर्पण असे सद्गुण आवश्यक आहेत. त्यासाठी मनुष्यामध्ये या भौतिकतेमुळे शिरलेले पशुत्व नष्ट होणे गरजेचे आहे. मी व माझे ही संकुचित वृत्ति नष्ट होऊन त्याचे मन थोडेसे विशाल झाले पाहिजे.


 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, June 23, 2020

ध्वनिसाधना | Use of Sound in Worship




आकाशामध्ये ज्यावेळी कोणताही शब्द उच्चारला जातो, त्यावेळी ध्वनीचा स्फोट होतो.  त्यावेळी स्फोट होण्यासाठी असणारे इंद्रिय म्हणजे वाणी आकाशामधूनच निर्माण झाली.  त्याचप्रमाणे आकाशामध्ये झालेला स्फोट ग्रहण करण्यासाठी कर्ण हे इंद्रिय सुद्धा आकाशामधूनच निर्माण झाले.  म्हणून एका बाजूला शब्दाचा स्फोट व दुसऱ्या बाजूला एकच वेळी त्या शब्दाचे श्रवण ह्या दोन्ही क्रिया एकच वेळी घडतात.  त्याचप्रमाणे, ‘श्रीराम’ शब्द मी उच्चारतो व तो ध्वनि मीच ऐकतो.  म्हणून जपसाधनेमध्ये मंत्राचा जाणीवपूर्वक उच्चार करणे आणि मंत्रोच्चार जाणीवपूर्वक श्रवण करणे हे मनाचे कार्य आहे.  प्रत्येक उच्चाराबरोबर ध्वनीलहरी निर्माण होतात.  या ध्वनीलहरींचा परिणाम मनावर होत असतो.  

म्हणून ‘श्रीराम’ म्हणत असताना तो उच्चार काळजीपूर्वक श्रवण करावा.  यामुळे मनाची सावधानता (alertness) वाढते.  मन या दोन क्रियांच्यामध्ये एकाग्र झाल्यामुळे मंत्र-वृत्ति, मंत्र-वृत्ति यामध्ये समन्वय निर्माण होतो.  मंत्राव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वृत्ति नाहीशा होतात.  मन तल्लीन, तन्मय, तद्रूप होते.  हळुहळू संपूर्ण विश्वाची, विषयांची, शरीराची, ‘मी’ची सुद्धा जाणीव संपते.  राहतो तो फक्त मंत्रोच्चाराचा ध्वनि.  मी ध्वनीशी तन्मय होतो.

म्हणून संगीतसाधना ही सुद्धा ध्वनिसाधना आहे.  संगीतामध्ये गायकाचे मन स्वरांशी, ध्वनीशी तन्मय होते.  स्वर आणि तो भिन्न न राहता गायक स्वरमय होऊन जातो.  त्यावेळी मन अत्यंत सूक्ष्म होऊन अत्युच्च अवस्थेवर पोहोचते.  यालाच गायन शास्त्रामध्ये ‘गानसमाधि’ असे म्हणतात.  म्हणून संगीत हे परमेश्वराजवळ पोहोचण्यासाठी साधन आहे.

यामध्ये सखोल विचार केला तर समजते, ध्वनि हा आकाशाचा गुण आहे.  आकाशाला कोणतेही रूप, रंग, गुणधर्म नाही.  त्यामुळे ध्वनीला सुद्धा कोणतेही विशिष्ट रंगरूप नाही.  यामुळे मन या ध्वनीसाधनेमध्ये तन्मय झाले तर ते सहजपणे नामरूपरहित, अंतर्मुख, वृत्तीरहित होते.  सर्व प्रकारचे विकार गळून पडतात.  मन अत्यंत स्थिर, शुद्ध, शांत आणि अंतर्मुख होते.  बाह्य जाणीव संपते.  अखंडपणे, दीर्घकाळ सजातीय वृत्तिप्रवाह निर्माण होतो.  या अवस्थेलाच ‘भावसमाधि’ किंवा ‘सविकल्प समाधि’ असे म्हणतात.


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011



- हरी ॐ


Tuesday, June 16, 2020

शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार | Scientific Way of Chanting




शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार करीत असताना त्या मंत्राची आवृत्ति कशी करावी ?  यासाठी सुद्धा शास्त्र आहे.  तो मंत्र अधिक जलद गतीने अथवा अति संथ गतीनेही करू नये.  जपामध्ये वेळ (time factor) हा महत्वाचा घटक आहे.  नाहीतर केवळ मंत्रोच्चार होईल परंतु जपसाधना होणार नाही.

प्रत्येक मंत्राला सुरुवात व शेवट आहे.  मंत्रोच्चार झाल्याबरोबर त्या बरहुकुम मनामध्ये त्याची वृत्ति निर्माण करणे हा महत्वाचा भाग आहे.  जर तुम्ही तो मंत्र – श्रीराम.  श्रीराम.  श्रीराम.  श्रीराम.  अशा जलद गतीने म्हणत असाल तर त्यामध्ये मन काही क्षण दक्ष (alert) असेल परंतु थोड्याच वेळात मंत्रोच्चार आणि मंत्राबरहुकुम दुसरी, तिसरी, चवथी वृत्ति निर्माण होणे या प्रक्रियेमध्ये विसंगति निर्माण होते.  मंत्रोच्चार जलद होतो व संपतो आणि त्याबरहुकुम वृत्ति निर्माण होण्यापूर्वीच दुसरा मंत्रोच्चार होतो.  मंत्र आणि वृत्ति यामध्ये समन्वय राहत नाही.  त्याक्षणी मनाची दक्षता (alertness) संपते.  यामध्ये जपसंख्या वाढते.  परंतु मन मात्र जपामधून निसटून बाह्य विषयांच्यामध्येच रममाण होते.  माळ फिरते, बोटे फिरतात, ओठ हालतात, मंत्रोच्चार होतो परंतु या सर्व क्रियांच्यामध्ये यांत्रिकपणा (mechanicalness) येतो.  यामुळे जपाचे फळ मिळत नाही.  म्हणून मंत्रोच्चार अत्यंत जलद गतीने करू नये.

मंत्रोच्चार खूप संथ गतीने झाला तर मन वृत्तीरहित होते.  मन लय पावायला लागते.  त्यावेळी तमोगुणाचा प्रभाव वाढतो.  मंत्रोच्चाराची जाणीव नाहीशी होते.  अंतरिक सावधानता संपते.  शरीर, मन, इंद्रिये व्यापारशून्य, शांत होतात.  ही शांति लयावस्थेची आहे.  त्या शांतीची जाणीव राहत नाही.  जागे झाल्यावर समजते की, आपण खूप सुंद झालो आहोत.  ज्याप्रमाणे झोपेतून उठल्यावर आपण सुंद असतो, तसेच संथ गतीने केलेल्या जपामुळे झोप येणे हा फार मोठा प्रतिबंध आहे.  म्हणुनच मंत्रोच्चार अतिशय संथ गतीनेही करू नये.

ज्याप्रमाणे मोत्यांच्या माळेमध्ये मोत्यांची रचना व्यवस्थित, समप्रमाणात अंतर ठेवून केलेली असते.  त्यामुळे ती माळ अत्यंत सुंदर, आकर्षक दिसते.  त्यामध्ये समन्वय दिसतो.  त्याचप्रमाणे जपसाधना करीत असताना प्रथम मन सर्व विषयांच्यापासून निवृत्त करावे.  मंत्राच्या विषयाच्यामध्ये एकाग्र करावे आणि मंत्रोच्चार अति जलद किंवा अति संथ न करता मोत्यांच्या हाराप्रमाणे अखंडपणे दीर्घकाळ करावा.  


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011


- हरी ॐ


Tuesday, June 18, 2019

मंत्रोपासाना का करावी ? | Purpose of Mantra-Upasana




मंत्रोपासना समजण्यासाठी प्रथम मंत्र म्हणजे काय ?  हे समजले पाहिजे.  मननात् त्रायते इति मन्त्रः |  जो मननाच्या साहाय्याने साधकाचे रक्षण करतो, त्यास ‘मंत्र’ असे म्हणतात.  रक्षण याचा अर्थ केवळ बहिरंगाने संकटांच्यामधून रक्षण नव्हे. जीवनामध्ये संकटे ही येणारच !  एक संकट गेले की, दुसरे संकट दत्त म्हणून समोर उभे असतेच.  जीवनामध्ये सतत छोटे-मोठे, चांगले-वाईट प्रसंग घडतच राहतात.  बहिरंगाचे रक्षण हे खरे रक्षण नसून मनाचे सामर्थ्य वाढणे, हेच खरे रक्षण आहे.  मन सामर्थ्यशाली होण्यासाठीच ‘मंत्रोपासना’ आहे.  

किंवा रक्षण म्हणजेच मृत्यूच्या भीतीपासून रक्षण होय.  मनुष्याला सतत मृत्यूची भीति ग्रस्त करते.  या भीतीपासून मुक्त व्हावयाचे असेल तर त्यासाठी मृत्यूच्या कल्पनेचा निरास होणे आवश्यक आहे.  म्हणून मृत्यूपासून रक्षण म्हणजेच अज्ञानापासून रक्षण होय.  त्यासाठीच अंतःकरणामध्ये ज्ञानसूर्याचा उदय झाला पाहिजे.  या ज्ञानप्राप्तीसाठी ‘मंत्रोपासना’ हीच साहाय्यकारी साधना आहे.  

किंवा रक्षण म्हणजे संसारापासून रक्षण होय.  संसार म्हणजे गृहस्थाश्रम नव्हे !  तरसंसरति इति संसारः |  ज्याठिकाणी सतत बदल, विकार होतात, त्यास ‘संसार’ असे म्हणतात.  आपल्या मनामध्ये सतत क्षणाक्षणाला अनंत बदल होत असतात.  मनामध्येच राग-द्वेष, काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर, सुख-दुःख, कपट-असूया, स्वार्थ, लोलुपता, कामना अशा अनंत वृत्ति सतत निर्माण होत असतात.  यामुळेच मनात सतत संघर्ष अनुभवायला येतो.  मन अत्यंत अस्थिर, उद्विग्न, विक्षिप्त असते.  यालाच ‘संसार’ असे म्हणतात.  

यामधून बाहेर पडण्याचा आपण खूप प्रयत्न करतो, परंतु या चक्रव्यूहातून आपणास बाहेर पडता येत नाही.  जसे, रेशमाचा कीडा स्वतःच स्वतःभोवती जाळे विणतो व बद्ध होतो.  तसे आपणच आपल्याभोवती कल्पनेने जाळे निर्माण केलेले आहे.  माझे-माझे म्हणून घट्ट पकडलेले आहे.  मी स्वतःविषयी कल्पना करतो, विश्वाबद्दल, अन्य व्यक्तींच्याबद्दल कल्पना करतो व त्या कल्पनाच मला बद्ध करतात.  त्यामधून नंतर इच्छा असूनही सुटू शकत नाही.  या सर्व मनोकाल्पित संसारामधून मुक्त होण्यासाठी ‘मंत्रोपासना’ हे प्रभावी साधन आहे.  


- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ