Tuesday, March 31, 2020

मायेच्या अतीत | Beyond Illusion




पारमार्थिक स्वरूपाचे, तत्त्वाचे चिंतन करणारे जे तत्त्वचिंतक लोक आहेत, त्यांची बुद्धि केवळ दृश्याचाच विचार न करता, दृश्याच्याही अतीत असणाऱ्या तत्त्वाचे चिंतन करणारी असते.  हे चराचर विश्व व मोहक, आकर्षक विषय डोळ्यांना सत्य दिसत असतील तरी ते सर्व मायेमधून निर्माण झालेले आहेत, याचे ज्ञान या तत्त्वचिंतकांना असते.  

जसे टी. व्ही. वर आपण एखादा चित्रपट किंवा नाटक पाहत असू, त्यामध्ये भयंकर प्रसंग घडला, तरी आपण काही खरे-खरे दुःखी होत नाही.  कारण हे सर्व नाटक असल्यामुळे सर्व खोटेच आहे, हे आपणास माहीत असते.  त्याचप्रमाणे विवेकी पुरुष, तत्त्वचिंतक या मायिक सृष्टीच्या चिंतनामध्ये आदर दाखवीत नाही.  म्हणजेच “हे सर्व मायिक आहे,”  असे जाणल्यामुळे तो या दृश्य प्रपंचाला विशेष महत्त्व देत नाही.  तत्त्वचिंतक या जगताच्या बाबतीत अंतरंगाने तटस्थ व उदासीन राहतो.  

तसेच मायावी जादुगार जसा आकाशात दोरी टाकतो, त्याचप्रमाणे जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था म्हणजेच मायेचा विस्तार आहे.  या तीनही अवस्था मायिक, कल्पित, मिथ्या आहेत.  तसेच या तीन अवस्थांच्यामध्ये आरूढ होणाऱ्या विश्व-तैजस-प्राज्ञ यांच्यापेक्षाही खरा मायावी हा भिन्न स्वरूपाचा आहे.  ज्याप्रमाणे दोरी टाकणारा मायावी, त्या दोरीवर चढणारा, युद्ध करणारा, क्षणात जमिनीवर तर क्षणात आकाशात दिसणारा, अशा पुरुषांच्यापेक्षाही सर्व माया रचून, मायेला नियंत्रित करणारा पारमार्थिक मायावी खरा जादुगार हा भिन्नच असतो.  तो नित्य एकाच ठिकाणी जमिनीवरच स्थित राहून या विविध प्रकारच्या माया रचतो, नाटक रचतो.  

त्याचप्रमाणे जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था, या सर्व माया रचणारा मायावी, परमात्मा या अवस्थांच्यापासून व विश्व-तैजस-प्राज्ञ यांच्यापासून सुद्धा अत्यंत विलक्षण स्वरूपाचा आहे.  तो परमात्मा म्हणजेच ‘तुरीय’ नावाचे पारमार्थिक तत्त्व आहे.  असे हे जे तीन अवस्था व तीन आत्म्यांच्याही अतीत असणारे पारमार्थिक ‘तुरीय’ नावाचे तत्त्व आहे, त्या तत्त्वाच्या चिंतनामध्येच मुमुक्षु साधकांची प्रवृत्ति असते.  



- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ


Tuesday, March 24, 2020

गुढीपाडवा शार्वरी संवत्सर (Gudhipadwa - Shree Shalivahan New Year 1942)



गुढीपाडवा 
 श्रीशालिवाहन शके १९४२
शार्वरी नाम संवत्सर आरंभ

चैत्रे मासि जगद् ब्रह्मा ससर्ज प्रथमे हनी |
शुक्लपक्षे समग्रे तु तदा सूर्योद्ये सति ||

      गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ ! साडेतीन मुहूर्ताच्यापैकी एक महत्वाचा पूर्ण मुहूर्त ! हाच सृष्टीच्या निर्मितीचा दिवस ! सृष्टीचा वर्धापन दिन ! ब्रह्माजीने याच दिवशी सृष्टीच्या निर्मितीस प्रारंभ केला. याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला.

      श्रीगणेशयामल तंत्रशास्त्रामध्ये गुढीपाडव्याचे महत्व स्पष्ट केलेले आहे. २७ नक्षत्रांच्यापासून २७ लहरी निर्माण होत असतात. त्या २७ लहरींच्यापैकी प्रजापति लहरीयमलहरी व सूर्यलहरी या तीन लहरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तीन लहरींचा संपूर्ण सृष्टीवर व सर्व प्राणिमात्रांच्यावर परिणाम होत असतो. प्रजापति लहरींच्यामुळे अंकुरांच्या निर्मितीसाठी जमिनीची क्षमता वाढते. विहिरींना नवीन पाझर फुटतात. बुद्धीची प्रगल्भता वाढते व शरीरामध्ये कफ प्रकोप निर्माण होतो. यानंतर यमलहरींच्यामुळे पाऊस पडतो. बीजांना नवीन अंकुर फुटतात व शरीरामध्ये वायूचा प्रकोप निर्माण होतो. तसेचसूर्यलहरींच्यामुळे जमिनीची उष्णता वाढते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते आणि शरीरामध्ये पित्त प्रकोप निर्माण होतो.

      याप्रमाणे प्रजापतियम व सूर्य या तीन्हीही लहरींचे योग्य आणि उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे. या दिवशी सृष्टीच्या निर्मितीचा आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली जाते व सृष्टीकर्त्या ब्रह्माजीचे पूजन केले जाते.पोकळ वेळूच्या काठीला भरजरी खणनवीन वस्त्र लावून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो. गुढीला कडुनिंबाचेआंब्याचे डहाळे लावले जातात. अशी गुढी घरोघरी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करूनघराच्या उंबऱ्याच्या बाहेरउजवीकडे जमिनीवर स्वस्तिक रेखून सूर्योदयाच्या वेळी उभारली जाते. गुढीला 'ब्रह्मध्वज' असेही म्हणतात.

                सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापति तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठी मध्ये येते. सूर्यास्ताच्या वेळी प्रजापति लहरी संपतात. तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून -'ब्रह्मध्वजाय नम:|' असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरविली जाते. गुढी आत आणल्यानंतर कलशामधील प्रजापति लहरी घरामध्ये प्रवेश करतात. यामुळे घरामध्ये सुखशांतिऐश्वर्यआरोग्य नांदते. त्यादिवशी घराच्या दाराला लावलेले आम्रपानांचे तोरण हे मंगलसूचक आहे. 

      गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंबाची पानेफुलेगुळसाखरओवाचिंचमिरेहिंग हे पदार्थ एकत्र करून भक्षण केले जातात. यामुळे शरीरामधील कफ-वात-पित्त यांचा प्रकोप नाहीसा होऊन ते संतुलित होतात. त्यामुळे रक्तशुद्धी होऊन शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते. कडूनिंब-गुळ-चिंच वगैरे पदार्थांचे आंबट-गोड-कडू असे भिन्न-भिन्न स्वाद आहेत. याप्रमाणेच आपले जीवन म्हणजे सुख-दु:खादि अशा अनेक प्रसंगांचे मिश्रण असून त्यामध्ये मनाची समतोल वृत्ति ठेवावीहाच संदेश मिळतो.

      गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगामधील संवत्सरफल जरूर वाचावे. त्यामध्ये ब्रम्हदेवाची सृष्टिब्रह्मदेवाचे आयुष्य व त्याप्रमाणे कालगणनेचे वर्णन केलेले असून या संवत्सराचे फल लिहीलेले असते. ते वाचल्यामुळे मनुष्याला समष्टीचीसृष्टीची व अव्याहत अखंडप्रचंड मोठया कालचक्राची जाणीव होते. त्यामुळे मनुष्यामधील 'मी कोणीतरी फार मोठा आहे,' हा अंहकार कमी होऊन ईश्वराच्या अद्भुत निर्मितीच्या सत्तेच्या पुढे त्याचे मन नम्रविनयशील होते.

      गुढी ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे. त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे. गुढीमधून व्यष्टि व समष्टि म्हणजेच विश्व व जीव यांचा संबंध तसेचसृष्टीच्या विराट स्वरुपाची व अद्भुत शक्तीचीऊर्जेची संकल्पना केलेली आहे.

      गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. अंकुरांना नवीन पालवी फुटतात. निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते. सृष्टीमधील नवचैतन्य मनुष्याच्या मनामध्ये प्रविष्ट होते. मनुष्याच्या जीवनामध्ये नवीन स्फूर्तिचेतनाप्रेरणाआत्मविश्वासउत्साहधैर्य निर्माण होते. मनुष्य हाच सृष्टीचा प्रमुख घटक असल्यामुळे मनुष्यामध्ये स्फूर्ति निर्माण झाली कीआपोआपच सृष्टि बदलते मनुष्याचे कुटुंब बदलतेसमाज बदलतो. राष्ट्रविश्व सर्वांच्यामध्येच नवचैतन्य निर्माण होते. म्हणूनच गुढीपाडवा हा उत्सव विजय व आनंदाचे प्रतीक असून कोणत्याही नवीन कार्याला या दिवसापासुनच प्रारंभ केला जातो.

      म्हणूनच मानवी जीवन भव्यदिव्यउदात्त व परिपूर्ण करणाऱ्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे गुढीपाडवा !

      यावरून लक्षात येते की,

सृष्टीची निर्मिती म्हणजे केवळ योगायोग नसून त्यामागे निश्चित नियोजन आहे. व आपल्या हिंदू संस्कृतीमधील प्रत्येक सणपरंपरा या महत्वपूर्णअर्थपूर्ण असून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. 




परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वतीगुढीपाडवा २०२० श्रुतिसागर आश्रम





तीन भोगावास्था | Three States of Consumption




आचार्य तीन प्रकारचे भोग व तीन प्रकारचे भोक्ते यांचे वर्णन करीत आहेत.  जागृतावस्थेत ‘स्थूल पदार्थ’, स्वप्नावस्थेत ‘सूक्ष्म पदार्थ’ तर सुषुप्ति अवस्थेत ‘आनंद’ अशा या भोग्य वस्तु असतात.  वस्तुतः हे एकच भोग्य असून ते स्थूल-सूक्ष्म-आनंद या तीन प्रकारामध्ये विभागले जाते.  तसेच, यांचा भोक्ता सुद्धा वस्तुतः एकच असून तो विश्व-तैजस-प्राज्ञ या तीन नामांनी निर्देशित होतो.  म्हणूनच “तो मी आहे” अशा एकत्व प्रत्ययाने जीवाला अनुभव येतो.  

जागृत पुरुषच म्हणतो, “मी स्वप्न पाहिले”, “मी झोपलो होतो”, असे जीवाला नित्य अनुसंधान होते.  विश्व-तैजस-प्राज्ञ यांच्यामधील द्रष्टत्व हे समान आहे.  हे तिघेही त्या त्या जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्थांचे द्रष्टे आहेत.  हे तीन द्रष्टे असतील तरीही तिन्हीही अवस्थांचा द्रष्टा ‘मी’ एकच आहे.  उपाधिभेदांच्यामुळे एकाच आत्म्याला ही तीन नावे मिळतात.  म्हणूनच विश्व-तैजस-प्राज्ञ यांच्यामधील द्रष्टत्व समान आहे.  

याप्रमाणे जागृत-स्वप्न-सुषुप्ति यामधील तीनही भोग व तीनही भोक्ते स्वस्वरूपाच्या, तत्त्वाच्या दृष्टीने एकच आहेत, असे जो जाणतो, म्हणजेच भोक्ता व सर्व भिन्न-भिन्न असणाऱ्या भोग्य पदार्थांना जाणतो.  तो भोग्य वस्तूंचे भोग घेऊनही त्यामुळे लिप्त, स्पर्शित होत नाही.  कारण सर्व भोग्य पदार्थ हे एकाच भोक्त्याचे भोज्य आहे.  म्हणजेच सर्व भोग हे भोक्त्याच्या भोगाचे विषय झाले व भोक्ता हा विषयी झाला.  म्हणूनच विषयांच्यामुळे विषयी हा लिप्त होत नाही, हा सिद्धांत आहे.  

विषयी भोक्ता हा भोग्य विषयांच्यापासून नित्य भिन्न स्वरूपाचा आहे, या ज्ञानाने धीर, विवेकी, तत्त्वज्ञानी पुरुष भोग घेऊनही त्या भोगांच्यामुळे कधीही लिप्त होत नाही.  तत्त्वज्ञानी पुरुष सर्व भोगांच्यापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी, अविकारी स्वरूपाने राहतो.  



- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ

Tuesday, March 17, 2020

सुषुप्तीमधील आनंद | Bliss in Deep Sleep




सुषुप्तीमधील आनंद कसा आहे ?  आचार्य येथे दृष्टांत देतात.  ज्याप्रमाणे आपण व्यवहारात पाहतो की, एखादा मनुष्य आयासरहित, निरायास, काहीही कष्ट, परिश्रम न करता बसत असेल तर आपण त्याच्याविषयी बोलतो की, “व्वा !  काय छान बसला आहे.  याला काही काम नाही.  कष्ट नाहीत.  परिश्रम नाहीत.  सुखी प्राणी आहे !”  याचप्रमाणे सुषुप्ति अवस्था अनुभवणारा जीव हा आयासरहित, दुःखरहित असल्यामुळे त्याला येथे आनंदभुक्, ‘आनंदाचा भोक्ता’ असे म्हटले आहे.  

गाढ सुषुप्ति अवस्थेमध्ये प्रत्येकाला सुखाचा – आनंदाचा अनुभव येतो.  म्हणून तरी प्रत्येक मनुष्य दिवसभर खूप दमला, थकला, वैतागला की, आपण केव्हा झोपायला जाऊ, असे त्याला वाटते.  आपल्या शरीराला, मनाला, बुद्धीला खूप श्रम झाले की, आपण झोपेचा मार्ग स्वीकारतो.  सहज झोप येत नसेल तर झोपेची गोळी खातो किंवा पोट भर जेवतो.  शरीर सुंद झाले की, मन ही क्रमाने सुंद होते व आपल्याला गाढ झोप लागते.  सकाळी झोपेमधून उठलो की आपण म्हणतो – “मला खूप छान झोप लागली होती.  मी सुखाने झोपलो होतो.”  

यावरून सिद्ध होते की, सुषुप्ति अवस्थेमध्ये जीवाला आयास नसतात.  म्हणूनच तेथे जीव सुख भोगतो.  निद्रा संपवून जागृतावस्थेत येताक्षणीच मात्र द्वैतव्यवहार, मनाचे व्यापार प्रारंभ झाल्यामुळे जीवाला पुन्हा संसाराची, दुःखांची प्रचीति येऊ लागते.  जागृति व स्वप्न संपल्यानंतर जीव पुन्हा सुषुप्ति अवस्थेमध्ये जाऊन तेथे आनंदाचा भोक्ता होतो.  तोच या जीवाचा श्रेष्ठ आनंद आहे.  म्हणून प्रत्येक जीव झोपेवर प्रेम करतो.  

सुषुप्ति अनुभवणारा प्रज्ञानघन हा आनंदमय असेल तरी तो आनंदस्वरूप मात्र नाही, कारण हा आनंद स्वस्वरूपाचा, निरतिशय आनंद नाही.  तर ती अज्ञानाची अवस्था असून तेथे दुःखांचा अनुभव नाही.  म्हणून केवळ त्या अवस्थेला ‘आनंदमय’ म्हटले आहे, इतकेच !  गाढ निद्रेमधील आनंद हा आत्यंतिक निरतिशय होऊ शकत नाही.  



- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ


Tuesday, March 10, 2020

आत्म्याची चतुष्पाद कल्पना | 4-Parts Consciousness Model




साधकाला साध्य प्राप्त करावयाचे असेल तर योग्य साधनाची आवश्यकता आहे.  साधनं विना साध्यं न सिध्यति |  साधनाशिवाय साध्याची प्राप्ति होत नाही.  असा न्याय आहे.  म्हणून प्रत्येक साधकाला आपल्याला काय मिळवायचे आहे, ते साध्य प्रथम स्पष्टपणे समजले पाहिजे.  तसेच, आपले इच्छित साध्य प्राप्त करण्यासाठी योग्य साधन काय आहे, हेही समजले पाहिजे.  हे साध्य व साधन सांगण्यासाठीच श्रुति येथे आत्म्याचे चार चरण सांगत आहे.  

आत्मस्वरूपाच्या चार पायांपैकी पहिले – विश्व, तैजस, प्राज्ञ हे तीन पाय उपायभूत साधन असून चवथा पाय तुरीय पाद हा उपेयभूत म्हणजेच साध्य आहे.  साधन हे साध्यानुरूपच असले पाहिजे.  म्हणुनच तीन पाद हे साधन व चतुर्थ पाद हा साध्य आत्मा अशी चतुष्पादांची कल्पना श्रुतीने केली.  म्हणून विश्व – तैजस् – प्राज्ञ हे साधन झाले व तुरीय आत्मा हा साध्य झाला.  त्यांच्यामध्ये साधन-साध्य किंवा उपाय-उपेय भाव निर्माण झाला.  

वास्तविक पाहता आत्मा हे कोणत्याही साधनांचे साध्य होऊ शकत नाही, कारण हा स्वतःच स्वयंसिद्ध आहे.  आत्मा हा आपले स्वतःचेच स्वरूप, प्रत्यगात्म स्वरूप असल्यामुळे त्याला प्राप्त करणेही शक्य नाही किंवा त्याचा त्याग करणेही शक्य नाही.  ‘मी’ ‘मी’ ला प्राप्त करू शकत नाही किंवा ‘मी’ ‘मी’ चा त्यागही करू शकत नाही.  म्हणुनच श्रुति अन्य ठिकाणी सांगते – आत्मा न हेयं न उपादेयम् इति |  ‘मी’ व ‘आत्मस्वरूप’ एकच असल्यामुळे आत्म्याचे ग्रहण किंवा आत्म्याचा त्याग होऊ शकत नाही.  

परंतु तरीही श्रुति अज्ञानी जीवांच्या दृष्टीने सांगते की – आत्मा विजिज्ञासितव्यः |  आत्मस्वरूपाचे ज्ञान घ्यावे.  आत्मप्राप्ति होणे किंवा आत्मज्ञान होणे ही सुद्धा कल्पनाच आहे.  तरीही अज्ञानी जीवांना हे सांगणे योग्य व आवश्यकच आहे.  म्हणूनच येथे श्रुतीने सांगितले की, आत्मा हा उपेय-साध्य आहे व तीन पाद हे उपेय-साधनभूत आहेत.  म्हणून श्रुतीने केलेली ही चतुष्पादाची कल्पना विरुद्ध किंवा अयोग्य नाही.  चतुष्पादाच्या कल्पनेमुळे आत्मस्वरूपामध्ये कोणताही विकार, परिणाम होत नाही.  तर आत्मस्वरूप हे नित्य, शुद्ध, अलिप्त-अस्पर्शित-अपरिणामी, साध्य-साधनरहित, उपेय-उपायरहित, निर्विकार स्वरूपाने राहते.



- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ


Tuesday, March 3, 2020

आत्म्याच्या चतुष्पादाची आवश्यकता | Need of 4-Parts Consciousness Model






श्रुतीने आत्म्यामध्ये चार पायांची कल्पना केलेली आहे.  आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी आत्म्यामध्ये ही अध्यस्त चतुष्पादाची कल्पना करणे आवश्यक आहे, कारण आत्मज्ञान घेणारा जिज्ञासु साधक हा अज्ञानी जीव आहे.  तो संसाराने बद्ध आहे.  यत् दृश्यं तत् सत्यम् |  जे दिसते तेच सत्य, अशी त्याच्या बुद्धीची धारणा आहे.  दृष्यालाच सत्य म्हणण्याची त्याला वर्षानुवर्षे सवय लागली आहे.  असा हा अज्ञानी मनुष्य खरे तर स्वस्वरूपाच्या दृष्टीने, तत्त्वाच्या दृष्टीने स्वतःच सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म स्वरूप आहे.  परंतु त्याच्या बुद्धीवर आत्मअज्ञानाचे आवरण आल्यामुळे त्याला ते स्वरूप आकलन होत नाही.  स्वस्वरूपाची विस्मृति झाल्यामुळे त्याला कधीच आत्मस्वरूपाची अनुभूति सुद्धा येत नाही, कारण ते स्वरूप ग्रहण करण्यासाठी त्याची बुद्धि योग्य, अनुकूल व अधिकारी नाही.  

बहुतांशी जीवांची बुद्धि ही बहिर्मुख असून विषयासक्त, अत्यंत स्थूल–प्राकृत–व्यावहारिक बुद्धि आहे.  विषयांचे, उपभोगांचे चिंतन करण्यातच रममाण झाली आहे.  त्यामुळे त्या बुद्धीला जे दृश्य, सगुण-साकार-सविशेष, नामरूपगुणधर्मांनी युक्त आहे, तेच सहजपणे आकलन होते.  मग अशा अज्ञानी जीवांना एकदम निर्गुण-निर्विशेष स्वरूपाचे ज्ञान ग्रहण करणे शक्य नाही.  त्यांच्यासाठी श्रुति येथे चतुष्पाद आत्म्याची कल्पना करीत आहे.  

श्रुति ही सर्व जीवांची साक्षात् माता आहे.  मातेप्रमाणेच तिला आपल्या मुलांचे हित-अहित समजते.  ही तर श्रुतिमाता आहे.  त्यामुळे ती जीवांच्या परमकल्याणाचा विचार करते.  अज्ञानी, संसारग्रस्त जीव जन्मानुजन्मे असह्य यातना भोगत असतो.  दुःखाने व्याकूळ, अस्वस्थ होतो.  त्रिविध तापांच्यामध्ये होरपळून निघतो.  अशा या भरकटलेल्या, दुःखी जीवांना परमशांतीचा, निरतिशय आनंदाचा मार्ग दाखवून त्यांचे जीवन तृप्त, परिपूर्ण व कृतकृत्य करावे, अशी श्रुतिमातेची इच्छा आहे.  त्यासाठीच ही दयाळू, कृपावंत श्रुति सर्वसामान्य अज्ञानी मनुष्याला, स्थूल-प्राकृत बुद्धीच्या मनुष्याला समजेल, अशा पद्धतीने आत्मतत्त्वाचे वर्णन करीत आहे.  



- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ