Tuesday, March 3, 2020

आत्म्याच्या चतुष्पादाची आवश्यकता | Need of 4-Parts Consciousness Model


श्रुतीने आत्म्यामध्ये चार पायांची कल्पना केलेली आहे.  आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी आत्म्यामध्ये ही अध्यस्त चतुष्पादाची कल्पना करणे आवश्यक आहे, कारण आत्मज्ञान घेणारा जिज्ञासु साधक हा अज्ञानी जीव आहे.  तो संसाराने बद्ध आहे.  यत् दृश्यं तत् सत्यम् |  जे दिसते तेच सत्य, अशी त्याच्या बुद्धीची धारणा आहे.  दृष्यालाच सत्य म्हणण्याची त्याला वर्षानुवर्षे सवय लागली आहे.  असा हा अज्ञानी मनुष्य खरे तर स्वस्वरूपाच्या दृष्टीने, तत्त्वाच्या दृष्टीने स्वतःच सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म स्वरूप आहे.  परंतु त्याच्या बुद्धीवर आत्मअज्ञानाचे आवरण आल्यामुळे त्याला ते स्वरूप आकलन होत नाही.  स्वस्वरूपाची विस्मृति झाल्यामुळे त्याला कधीच आत्मस्वरूपाची अनुभूति सुद्धा येत नाही, कारण ते स्वरूप ग्रहण करण्यासाठी त्याची बुद्धि योग्य, अनुकूल व अधिकारी नाही.  

बहुतांशी जीवांची बुद्धि ही बहिर्मुख असून विषयासक्त, अत्यंत स्थूल–प्राकृत–व्यावहारिक बुद्धि आहे.  विषयांचे, उपभोगांचे चिंतन करण्यातच रममाण झाली आहे.  त्यामुळे त्या बुद्धीला जे दृश्य, सगुण-साकार-सविशेष, नामरूपगुणधर्मांनी युक्त आहे, तेच सहजपणे आकलन होते.  मग अशा अज्ञानी जीवांना एकदम निर्गुण-निर्विशेष स्वरूपाचे ज्ञान ग्रहण करणे शक्य नाही.  त्यांच्यासाठी श्रुति येथे चतुष्पाद आत्म्याची कल्पना करीत आहे.  

श्रुति ही सर्व जीवांची साक्षात् माता आहे.  मातेप्रमाणेच तिला आपल्या मुलांचे हित-अहित समजते.  ही तर श्रुतिमाता आहे.  त्यामुळे ती जीवांच्या परमकल्याणाचा विचार करते.  अज्ञानी, संसारग्रस्त जीव जन्मानुजन्मे असह्य यातना भोगत असतो.  दुःखाने व्याकूळ, अस्वस्थ होतो.  त्रिविध तापांच्यामध्ये होरपळून निघतो.  अशा या भरकटलेल्या, दुःखी जीवांना परमशांतीचा, निरतिशय आनंदाचा मार्ग दाखवून त्यांचे जीवन तृप्त, परिपूर्ण व कृतकृत्य करावे, अशी श्रुतिमातेची इच्छा आहे.  त्यासाठीच ही दयाळू, कृपावंत श्रुति सर्वसामान्य अज्ञानी मनुष्याला, स्थूल-प्राकृत बुद्धीच्या मनुष्याला समजेल, अशा पद्धतीने आत्मतत्त्वाचे वर्णन करीत आहे.  - "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ


No comments:

Post a Comment