Tuesday, March 10, 2020

आत्म्याची चतुष्पाद कल्पना | 4-Parts Consciousness Model
साधकाला साध्य प्राप्त करावयाचे असेल तर योग्य साधनाची आवश्यकता आहे.  साधनं विना साध्यं न सिध्यति |  साधनाशिवाय साध्याची प्राप्ति होत नाही.  असा न्याय आहे.  म्हणून प्रत्येक साधकाला आपल्याला काय मिळवायचे आहे, ते साध्य प्रथम स्पष्टपणे समजले पाहिजे.  तसेच, आपले इच्छित साध्य प्राप्त करण्यासाठी योग्य साधन काय आहे, हेही समजले पाहिजे.  हे साध्य व साधन सांगण्यासाठीच श्रुति येथे आत्म्याचे चार चरण सांगत आहे.  

आत्मस्वरूपाच्या चार पायांपैकी पहिले – विश्व, तैजस, प्राज्ञ हे तीन पाय उपायभूत साधन असून चवथा पाय तुरीय पाद हा उपेयभूत म्हणजेच साध्य आहे.  साधन हे साध्यानुरूपच असले पाहिजे.  म्हणुनच तीन पाद हे साधन व चतुर्थ पाद हा साध्य आत्मा अशी चतुष्पादांची कल्पना श्रुतीने केली.  म्हणून विश्व – तैजस् – प्राज्ञ हे साधन झाले व तुरीय आत्मा हा साध्य झाला.  त्यांच्यामध्ये साधन-साध्य किंवा उपाय-उपेय भाव निर्माण झाला.  

वास्तविक पाहता आत्मा हे कोणत्याही साधनांचे साध्य होऊ शकत नाही, कारण हा स्वतःच स्वयंसिद्ध आहे.  आत्मा हा आपले स्वतःचेच स्वरूप, प्रत्यगात्म स्वरूप असल्यामुळे त्याला प्राप्त करणेही शक्य नाही किंवा त्याचा त्याग करणेही शक्य नाही.  ‘मी’ ‘मी’ ला प्राप्त करू शकत नाही किंवा ‘मी’ ‘मी’ चा त्यागही करू शकत नाही.  म्हणुनच श्रुति अन्य ठिकाणी सांगते – आत्मा न हेयं न उपादेयम् इति |  ‘मी’ व ‘आत्मस्वरूप’ एकच असल्यामुळे आत्म्याचे ग्रहण किंवा आत्म्याचा त्याग होऊ शकत नाही.  

परंतु तरीही श्रुति अज्ञानी जीवांच्या दृष्टीने सांगते की – आत्मा विजिज्ञासितव्यः |  आत्मस्वरूपाचे ज्ञान घ्यावे.  आत्मप्राप्ति होणे किंवा आत्मज्ञान होणे ही सुद्धा कल्पनाच आहे.  तरीही अज्ञानी जीवांना हे सांगणे योग्य व आवश्यकच आहे.  म्हणूनच येथे श्रुतीने सांगितले की, आत्मा हा उपेय-साध्य आहे व तीन पाद हे उपेय-साधनभूत आहेत.  म्हणून श्रुतीने केलेली ही चतुष्पादाची कल्पना विरुद्ध किंवा अयोग्य नाही.  चतुष्पादाच्या कल्पनेमुळे आत्मस्वरूपामध्ये कोणताही विकार, परिणाम होत नाही.  तर आत्मस्वरूप हे नित्य, शुद्ध, अलिप्त-अस्पर्शित-अपरिणामी, साध्य-साधनरहित, उपेय-उपायरहित, निर्विकार स्वरूपाने राहते.- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016- हरी ॐ


No comments:

Post a Comment