Saturday, October 28, 2017

सुंदर दृष्टि | Beautiful Vision




भगवान एक सुंदर दृष्टि सांगतात –
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते | प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ||  (गीता अ. २-६५)
चित्ताच्या प्रसन्नतेमुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा निरास होतो आणि प्रसन्न चित्त पुरुषाची बुद्धि लवकरच उत्तम प्रकारे स्थिर होते.  साधकाने जीवनामध्ये एका बाजूला आपले प्रत्येक कर्म सेवावृत्तीने ईश्वरार्पण करावे व दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या कर्माचे चांगले-वाईट, कमी-जास्त, अपेक्षित-अनपेक्षित फळ प्राप्त होईल तेव्हा ते फळ परमेश्वराचाच प्रसाद आहे, या वृत्तीने समाधानाने ग्रहण करावे.

ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये जाऊन देवाला फळे, फुले, पेढे, पाणी अर्पण करतो.  मनोभावे प्रदक्षिणा घालतो व त्यानंतर पुजारी आपल्या हातामध्ये काहीतरी प्रसाद ठेवतो.  त्यामध्ये मग आपणच आणलेला पेढा असेल, खडीसाखर असेल किंवा पाणी असेल.  वस्तुतः बाजारातील खडीसाखर व आत्ता हातामध्ये आलेली खडीसाखर यात काही फरक झालेला नाही.  किंवा पाण्यामध्येही फरक झालेला नाही.  पाण्यामध्येही H2O आहे व तीर्थाचे पाणी सुद्धा H2O आहे.  मग फरक कुठे आहे ?  फरक बाहेर पदार्थामध्ये नाही.  तर फरक आपल्या मनामध्ये झालेला आहे.  तीच खडीसाखर, पेढा, पाणी किंवा वस्तु जेव्हा देवाला स्पर्श करून आपणास मिळते, तेव्हा आपण ती वस्तु न पाहता त्यामध्ये “प्रसाद” पाहतो.  

इतकेच नव्हे, तर त्यावेळी आपण आपल्याला काय प्रसाद मिळाला ?  किती मिळाला ?  हे न पाहता उलट आपल्याला प्रसाद मिळाला, आपण भाग्यवान आहोत, असे मानून जे काही असेल ते आनंदाने व प्रसन्न मनाने ग्रहण करतो.  स्वीकार करतो.  त्यामुळे तिथे मनामधील रागद्वेषादि प्रतिक्रिया संपतात.  आवडनावड संपते.  हेवेदावे, मत्सर, कपट, असूया, स्वार्थ, लोभ, अभिमान हे सर्वच दोष नाहीसे होतात.  सर्व प्रतिक्रिया संपतात.  मन रागद्वेषरहित, द्वंद्वरहित झाल्यामुळे शुद्ध, सत्वगुणप्रधान व प्रसन्न होते.  हेच प्रसादवृत्तीचे फळ आहे.  


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ

Tuesday, October 24, 2017

सेवा हा भाव आहे | Service is an Attitude


“सेवा” हा मनाचा असा एक भाव आहे की, सेवा करीत असतानाच आपल्याला आनंदाचा अनुभव येतो.  सेवा ही मनापासून म्हणजेच प्रसन्न मनाने केली जाते.  सेवा करावयाची असेल तर प्रथम, ज्याची मी सेवा करतोय त्याविषयी मनामध्ये नितांत श्रद्धा, दृढ विश्वास असला पाहिजे.  त्याशिवाय मी सेवा करूच शकत नाही.  त्या श्रद्धास्थानामध्ये मी नतमस्तक झाले पाहिजे.  तिथेच माझे व्यक्तिगत रागद्वेष, आवड-नावड, हेवे-दावे गळून पडतात.  माझ्यामधील अहंकार, अभिमानाची वृत्ति त्या स्थानामध्ये गळून पडते.  तिथेच मनुष्य नम्र, विनयशील होतो.  तिथेच पूर्णभावाने समर्पित होतो.  मग ते स्थान कोणतेही असो.  मातृसेवा, पितृसेवा, गुरुसेवा, राष्ट्रसेवा, ईश्वराची सेवा यांपैकी कोणतीही सेवा असेल.  

सेवा करताना आपणास व्यावहारिक दृष्टीने कितीही निकृष्ठ कर्म करावे लागले तरी आपल्याला त्याची लाज वाटता कामा नये.  काया-वाचा-मनाने झोकून देऊन सेवा केली पाहिजे.  माझे प्रत्येक कर्म मी सेवेसाठीच केले पाहिजे.  

आई-वडिलांच्या सेवेसाठी भक्त पुंडलिकाचे प्रसिद्ध उदाहरण आहे.  तसेच संपूर्ण जीवन गुरूंच्या चरणी समर्पित करणारे, गुरुमय जीवन जगणारे वैदिक काळापासून आजपर्यंत अनेक शिष्य आहेत.  भरतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करून तिला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्यासाठी ज्यांनी सर्वस्व झोकून दिले, प्राणांची आहुति दिली, देशसेवेसाठी, राष्ट्रासाठी जीवनाचा शवासन् श्वास वेचला, असे कितीतरी भारतमातेचे थोर वीरपुत्र आहेत.  ईश्वराच्या प्राप्तीसाठी, दर्शनासाठी जन्म-जन्म सर्वसंगपरित्याग करून साधना करणारे, ईश्वरसेवा हेच ज्यांचे जीवन आहे, असे ईश्वराचे कितीतरी अनन्य भक्त या भूमातेच्या पोटी जन्माला आलेले आहेत.  

या सर्वांच्या जीवनामध्ये पाहिले तर त्यांचे श्रद्धास्थान जरी माता-पिता-गुरु-देश-राष्ट्र असे भिन्न-भिन्न असेल तरी त्यांच्या श्रद्धास्थानाविषयी असलेली त्यांची नितांत श्रद्धा, भक्ति, निष्ठा, धैर्य, दृढ विश्वास, अतुलनीय त्याग या सर्व गोष्टी समान दिसतात.  या सर्वांचेच चरित्र या त्यागामुळे, समर्पणामुळेच भव्य, दिव्य आणि उदात्त झालेले आहे.  


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ


Tuesday, October 17, 2017

पूजा का करावी ? | How Worship Helps ?


आज आपल्याला सतत विश्वामधील दृश्य विषय व भोग पाहण्याचीच इंद्रियांना सवय लागलेली आहे.  त्यामुळे मन सतत विषयाभिमुख व बहिर्मुख होते.  मनामध्ये रागद्वेषादि विकार निर्माण होतात.  परंतु पूजेसारख्या साधनांनी मन क्रमाक्रमाने ईश्वराभिमुख होऊ लागते.  मनाने निदान काही काळ तरी ईश्वरचिंतन होऊ लागते.  

श्रीमद्भागवतामध्ये भगवान स्वतःच उद्धवाला मनाच्या शुद्धीसाठी पूजा व पूजेला अनुकूल असणारी अनेक कर्म व साधना यांचे वर्णन करतात.  भगवान उद्धवास मोठ्या प्रेमाने सांगतात की, उद्धवा !  भक्ताने सर्वांना माझ्या अवताराच्या – जन्माच्या व लीलांच्या कथा सांगाव्यात.  माझी जयंती वगैरे उत्सवांच्यामध्ये आनंदाने व उत्साहाने भाग घ्यावा.  गायन, नृत्य, वादन, कथा यांच्या साहाय्याने मंदिराच्यामध्ये माझे उत्सव साजरे करावेत.  वार्षिक पर्वकाळांच्यामध्ये सर्व ठिकाणी तीर्थयात्रा करून विधिपूर्वक पूजा कराव्यात.  

वेदविहित व तंत्रोक्त दीक्षा घेऊन त्याप्रमाणे मत्परायण होऊन व्रतांचे अनुष्ठान करावे.  माझ्या मूर्तिस्थापनेमध्ये पूर्ण श्रद्धा ठेवावी.  स्वतः तसेच सर्वांनी मिळून उद्याने व माझ्या सुंदर मंदिरांचे निर्माण करावे, तसेच माझ्या मंदिरातील केर काढावा, सडा घालावा, जमीन गोमयाने सारवून घ्यावी, त्यावर सुंदर रांगोळी घालावी.  अशा प्रकारे एखाद्या दासाप्रमाणे, सेवकाप्रमाणे माझ्या गृहाची – मंदिराची निष्कपट भावाने सेवा करावी.  

ही सर्व कर्मे भक्तिभावाने करणारे भक्त परमेश्वराला अतिशय प्रिय होतात.  अशा पूजेमध्ये मनही तल्लीन होते.  मन रागद्वेषरहित, विकाररहित, अत्यंत शुद्ध व निर्मळ होते.  विश्वाचे भान, विषयांचे भान संपते.  भोगासक्ति कमी होऊन विषयांबद्दल वाटणारे आकर्षण कमी-कमी व्हायला लागते.  मन त्या चैतन्यमय असणाऱ्या सगुण रूपाशी एकरूप होते.  तिथे मी व परमेश्वर इतकेच शिल्लक राहते.  कारण तिथे परमेश्वर म्हणजे केवळ एक विग्रह न राहता तो भक्तासाठी साक्षात चैतन्याचा पुतळा होतो.  ती चैतन्यस्वरूपाचीच पूजा होते.  भक्ताला समोर, बाहेर, आत सर्व ठिकाणी चैतन्यस्वरूपाचे दर्शन होते.  


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015




- हरी ॐ



Tuesday, October 10, 2017

परमेश्वराची पूजा | Worship of God


अनेक वेळेला अनेक आध्यात्मिक साधक नित्य विग्रह पूजा गौण, निकृष्ठ साधना समजून देवाची पूजाच करीत नाहीत.  किंवा आज या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक घरांच्यामध्येही रोजची नित्य देवपूजाही होत नाही.  देव्हारा असतो.  देव असतात.  परंतु त्यांच्यावर धूळ पडलेली असते.  ही अत्यंत अयोग्य गोष्ट आहे.  असो.  साधकाच्या जीवनामध्ये पूजेला अतिशय महत्त्व आहे.  पूजेमध्ये प्रेमाचा उत्स्फूर्त भाव निर्माण होणे म्हणजे भक्ति आहे.  पूजा ही अशी एक साधना आहे की, त्यामध्ये आपली इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि या सर्वांचा समावेश होतो.  

देहाची शुद्धि करणे, षडंगादि न्यास करणे, मंत्राच्या साहाय्याने देवाला उपचार समर्पित करणे म्हणजे पूजा किंवा अर्चना होय.  गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे अर्पण करणे म्हणजे पंचोपचार पूजा होय.  तसेच पाद्य, अर्घ्य, आचमनीय, स्नानीय, वस्त्र, आभूषण, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, पुन्हा आचमनीय, स्तोत्रपाठ, तर्पण, वंदन हे उपचार अर्पण करणे म्हणजे षोडशोपचार पूजा होय.  

याप्रमाणे पूजेचे अनेक प्रकार, उपचार, मंत्र, विधि असतील तरीही या सर्वांच्यामध्ये भक्तीचा भाव असणे आवश्यक आहे.  ज्याच्या अन्तःकरणामध्ये परमेश्वराविषयी भक्तीचा, प्रेमाचा भाव नाही, अशा मनुष्याने बहिरंगाने कितीही उपचारांनी पूजा केली तरी ती व्यर्थ आहे आणि याउलट भक्ताने भावाने केवळ पाणी जरी अर्पण केले तरी परमेश्वर त्याचे ग्रहण करतो.  

परमेश्वर हा आपल्याला सर्वस्व मानणाऱ्या धनहीन, दरिद्री, गरीब भक्तावरच प्रेम करतो, कारण अशा धनहीन, अनन्य भक्ताच्या निष्काम भक्तीमध्ये किती प्रेम व गोडी असते, हे तो रसज्ञ असणारा परमेश्वरच जाणू शकतो.  मात्र शास्त्र, ज्ञान, संपत्ति, कुळ व कर्माच्या मदाने उन्मत्त झालेले जे लोक संतांची निंदा करतात, संतांचा तिरस्कार करतात, अशा दुर्बुद्धि, दुष्ट पुरुषांनी केलेली पूजा परमेश्वर स्वीकारीत नाही.  यामुळे पूजा ही अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने केली पाहिजे.  पूजेमध्ये अन्य विधि किंवा उपचार हे निमित्तमात्र आहेत.  भाव हा सर्वश्रेष्ठ आहे.  परमेश्वर हा भावग्राही आहे.


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ


Tuesday, October 3, 2017

परमेश्वर कशावरून आहे ? | Basis of God’s Exisitence


तार्किक, बुद्धिवादी लोक म्हणतात की, ईश्वर असेल तर दाखवा आणि ईश्वर डोळ्यांना दिसत नसेल तर परमेश्वर नाहीच.  यामुळे प्रथम परमेश्वर म्हणजे काय ?  हे समजले पाहिजे.  परमेश्वर ही कल्पना नाही.  परमेश्वर ही विश्वामधील घटादि विषयांच्याप्रमाणे एखादा विषय नाही.  परमेश्वर ही एखादी मर्त्य व्यक्ति नाही.  परमेश्वर म्हणजे शरीर नाही किंवा परमेश्वर ही अंधश्रद्धाही नाही.  मग परमेश्वर म्हणजे काय ?  वेदांच्यामध्ये विस्तारपूर्वक युक्तिवादाने परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करून परम्श्वराच्या स्वरूपाचे वर्णनही केले आहे.  

कारणं विना कार्यं न सिद्ध्यति | (न्याय) प्रत्येक निर्मित कार्यामागे कारण हे आहेच.  मग ते कारण आमच्या डोळ्यांना दिसो अथवा न दिसो, कार्यावरून आम्ही अनुमानाने कारणाची सत्ता किंवा अस्तित्व मान्य करतो.  मातीमधून घट निर्माण होण्यासाठी घटाला निर्माण करणारा कोणीतरी चेतनशील कर्ता म्हणजेच कुंभार आवश्यक आहे.  म्हणजेच इथे माती हे कारण (Material Cause) व कुंभार हा कर्ता (Creator) आहे.  कारण व कर्ता एकत्र आल्यानंतर जी निर्मिती होते, त्या प्रत्येक निर्मित वस्तूच्या मागे काहीतरी प्रयोजन असतेच.  

Every creation is a purposeful creation.  Without utility there is no creation.  प्रत्येक निर्मितीच्या मागे जसे निश्चित प्रयोजन आहे, तसेच निश्चित नियोजनही आहे.  Every purposeful creation is a planned creation.  मग हे नियोजन कोण करते ?  नियोजन करणे, हे जडाचे लक्षण नाही.  घट किंवा माती नियोजन करू शकत नाही.  तर मातीमधून घट कसा निर्माण करावा, याचे ज्ञान असणारा कोणीतरी चेतनशील, विवेकी कर्ता असला पाहिजे.  म्हणजे आपणास म्हणता येईल की – Planned, purposeful creation is an intelligent creation.  

घटादि कोणत्याही निर्मितीमागे जर कर्ता असेल तर मग या विशाल, सुसूत्रपणे नियमित असणाऱ्या विश्वाच्या मागे कोणीतरी सचेतन, विचारशील, बुद्धिमान, नियोजक कर्ता असला पाहिजे.  तो कर्ता या सर्वांच्या अतीत असला पाहिजे.  त्याच्यामधूनच हे चराचर विश्व निर्माण झाले.  तो कर्ता म्हणजेच परमेश्वर होय.  


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ