Tuesday, November 26, 2013

प्रारब्ध आणि समतोल जीवन | Fate and Balanced Life



प्रारब्धकर्मामुळे मनुष्य भूतकाळही जगत नाही, भविष्यकाळही जगत नाही तर वर्तमानकाळातील ‘आताचा क्षणच’ केवळ जगतो.   पुढच्या क्षणी काय होणार ?  हे त्याला माहीत नसते.  तो पुढचा क्षण सुखाचा असेल किंवा कदाचित दुःखाचा असेल.  संपूर्ण जीवन विशिष्ट घटनांनी साचेबंद झालेले असते.  हे जीवनाचे स्वरूप साधकाने विचारात घ्यावे.

 तसेच कोणतीही घटना मनुष्य टाळू शकत नाही, बदलू शकत नाही.  प्रारब्धाने पूर्णपणे पूर्वनियोजित जीवन असेल तर मनुष्याच्या पुरुषार्थाला वावच कोठे राहतो ?  ही शंका मनात उद्भवेल.  एकमेकांच्या प्रारब्धामुळे विविध घटना अत्यंत घनिष्टपणे एकमेकात गुंतल्याने त्या घटना किंवा ते कर्म झालेच पाहिजे.  त्याला पर्याय नाही.  चांगले अथवा वाईट सर्वच कर्मवशात् म्हणजेच प्रारब्धवशात् घडत असते.

परंतु सर्व माणसे स्वार्थाने चांगल्या कर्माचे कर्तृत्व स्वतःकडे घेतात तर वाईट अथवा दुःखद कर्माचा दोष पळपुटेपणाने माणसे दुर्दैवावर, फुटक्या नशिबावर ढकलतात.  पेरावे तसे उगवते या न्यायाने, आपल्याच कर्माचे फळ सुखद अथवा दुःखद घटनेच्या रूपाने आपल्यापुढे उभे रहात असेल, तर आनंदाने हुरळून जाण्याचे कारण नाही, तसेच दुःखाने अश्रुपात करण्याचेही कारण नाही.  दोन्ही परिस्थितीत कोणत्याही प्रकारे भावनेचा उद्रेक होण्याचे कारण नाही.  पूर्ण समतोल वृत्तीनेच दोन्ही प्रसंग स्वीकारले पाहिजेत, प्रतिक्रियारहित स्वीकार केला पाहिजे.

जेथे मनाची शांति व सुख आहे, तेथे सर्वच प्रसंगात भावनेचा उत्कर्ष किंवा अपकर्ष आढळत नाही.  जीवनाची पूर्ण समज तेथे असल्याने सर्वच प्रसंगाचे स्वागत केले जाते.  तरंगरहित नीरव शांति त्या मनात, अंतःकरणात नांदत असते.  तेथे मनाची, विचारांची पूर्ण परिपक्वता आहे.  असे हर्षविषादरहित, संतुलित मन घडविले पाहिजे, हीच तितिक्षा अथवा सहनशीलता आहे.  असे मन सदैव समाधानी व आनंदी असते.  अशी व्यक्ति सदैव प्रसन्नचित्त असते.       

 
"साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005


- हरी ॐ


Wednesday, November 20, 2013

मनुष्य कर्तुम्-अकर्तुम् आहे का? | Limitations of Human Being






मनुष्य खरोखरीच कर्तुम्-अकर्तुम् आहे का ?  यावर नीट सारासार विचार केला तर असे आढळते की मनुष्य स्वतःच कर्तुम्-अकर्तुम् असता तर पदोपदी दिसणारे दुःखाचे प्रसंग त्याने आपणहून घडवूनच आणले नसते.  दुःखाच्या खाईत आपणहून कोण जाईल ?  त्याला सतत सुख व समाधान हवे आहे.  परंतु आपली इच्छा नसतानाही दुःखद प्रसंग घडतच राहतात.  असे असताना मनुष्य किती प्रमाणात कर्तुम्-अकर्तुम् आहे ?

पूर्ण विवेकाने कळते की मनुष्य कर्तुम्-अकर्तुम् अजिबात नाही, कारण मनुष्य सर्वशक्तिमान नाही, अल्पशक्तिमान आहे.  त्यामुळे कितीही विचार केला तरी अल्पबुद्धीची झेप पुढे जाऊ शकत नाही.  अपघात, मृत्यु, रोग अथवा दुःखदायक घटना का घडतात ?  याचे आकलन त्याला होत नाही.  बुद्धि थकते, कुंठीत होते. पुढे सर्व अंधार पसरतो.  पुढे काय ?  हा प्रश्न त्याला सतत भेडसावत राहतो व मनुष्य अगतिक होतो.

या प्रसंगातूनच विचाराला चालना मिळते.  विचाराने हळुहळू त्याला स्वतःची बुद्धि, शक्ति अत्यंत कमी आहे, तसेच सगळीकडून त्याला अतिशय मर्यादा आहेत, याची स्पष्ट जाणीव होते.  त्यामुळे हे दुःखाचे प्रसंग त्याचा अहंकार खाली आणतात.

यापुढे खोल विचार केल्यावर कळते की विश्वात मनुष्यापेक्षा निश्चितपणे श्रेष्ठतर शक्ति आहे.  या सर्वश्रेष्ठ शक्तीची संपूर्ण विश्वावर, साऱ्या चराचर श्रुष्टीवर, नव्हे प्रत्येकाच्या जीवनावर पूर्ण नियंत्रण आहे.  ही सर्वश्रेष्ठ सत्ताच कर्तुम्-अकर्तुम् आहे.  या शक्तीलाच ‘ईश्वर’ म्हणतात.  

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005





- हरी ॐ

Tuesday, November 12, 2013

स्वकर्तृत्वाचा अहंकार | Ego about one’s capability




थोडा विचार केला तर प्रश्न येतो की, कर्तृत्व करायला अंतरिक शक्ति, प्रेरणा, सामर्थ्य कोण देतो ?  मनुष्य स्वकर्तृत्वाने परमेश्वराच्या सत्तेशिवाय मातीचा कण तरी निर्माण करू शकतो का ?  नव्हे डोळ्यांची उघडझाप तरी करू शकतो का ?  ही त्या जगन्नियामक, सर्वशक्तिमान परमेश्वराची कृपा नाही का ?  म्हणून कार्य करायला शक्ति देणारा व कार्यसिद्धि करणारा तोच परमेश्वर आहे.  हे जाणून पुरुषप्रयत्नाने प्राप्त झालेली संपत्ति आपली स्वतःची नसून परमेश्वराचीच आहे, हे जाणावे व अहंकार सोडवा.  

अवतारकार्यात प्रभू रामचंद्रालाही अहंकार झाला होता, मग सामान्य अज्ञ मानवाची काय कथा ?  श्रीरामाची छोटीशी सुंदर कथा !  वानरसेना दगडावर रामाचे नाव लिहून सेतु तयार करण्यासाठी समुद्रात दगड टाकत होती व तो प्रत्येक दगड तरंगत होता.  रामाला ते पाहून गर्व झाला.  केवढा आपल्या नामाचा महिमा !  आपणही असाच दगड टाकावा.  पण रामाने टाकलेला दगड सरळ तळाला गेला.

हे सर्व त्याचा भक्त हनुमान पाहात होता.  त्यालाही मनातल्या मनात हसू आले.  काय आश्चर्य !  स्वतः अवतारी रामाने टाकलेला दगड तरंगला नाही, पण त्याच्या नावाने वानरांनी टाकलेले दगड मात्र तरंगत होते.  प्रत्यक्ष रामात कुठे सामर्थ्य होते ?  पण वानरांच्या रामावरील शुद्ध, निरतिशय श्रद्धेने व भक्तीने दगडही तरून गेले.

श्रद्धा व निष्ठा हीच ताकद व हेच सामर्थ्य !  या प्रचंड सामर्थ्याने अशक्यप्राय घटनाही सहज शक्य होतात.  मानवाला प्रदान केलेली मनाची शक्ति, श्रद्धा व निष्ठा ही सुद्धा परमेश्वराची संपत्ति आहे.  मानवाचे त्यात काही सुद्धा कर्तृत्व नाही.  तसेच विश्वही मानवाचे नाही.  मानवाला दिलेले सुंदर शरीर, इंद्रिय, मन, बुद्धि, विवेक व वैराग्य यांच्याबद्दल त्याने ईश्वराची कृतज्ञता मानावी व धन्य व्हावे   
 

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005
 

- हरी ॐ 

Tuesday, November 5, 2013

सत्संगती का करावी ? | Benefits of “Good” company



मन सत्संगात गेले नाही, तर दुसरीकडे म्हणजे पर्यायाने कुसंगतीत जाईल.  कारण मन रिकामे राहू शकत नाही.  त्याला कुठलातरी संग जोडलाच पाहिजे.  त्यामुळे कुसंगतीत मन विषयाभिमुख होऊन त्या जीवाचा अधःपात होईल.  कुसंग जीवनाचा महानाश करणारा आहे.  ‘ सङ्गात् संजायते कामः | ’ व नंतर ‘ बुद्धिनाशात् प्रणश्यति | ’ असा शेवट ठरलेलाच आहे.

हे स्पष्टपणे लक्षात घेऊन विवेकी साधकाने विषयात मन न नेता सत्संगात न्यावे.  स्वभावतःच शरीर, इंद्रिये व मन विषयाभिमुख असल्याने, मुद्दाम विषयांच्या संगात मन न्यावेच लागत नाही.  संस्कार व विषयप्राबल्यामुळे मन स्वभावतःच विषयांकडे जाते.  मग डोळे उघडे असोत वा बंद असोत !

परंतु साधुसंगति मात्र प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते.  ती कष्टसाध्य आहे.  आपणहून मन त्या संगतीत जात नाही व रमतही नाही.  उलट साधुसंगति अज्ञानी, अविवेकी, मूढ मनुष्याला त्रासदायक वाटते, नको वाटते.  त्यांना विषयांची सवय झाल्याने, त्यांची इतकी जबरदस्त चटक मनाला लागते, की सत्संगाचा त्यांना तिटकारा वाटतो.  त्यांचे मन विषयातच रुळते व रमते.

म्हणून विषयातून बाहेर येण्याची कल्पनाच त्यांना असह्य होते.  या महाभयंकर कल्पनेतून बाहेर यायलाच ते घाबरतात.  जीवनात या विषयांमुळे सतत दुःख व यातनांचे मरणप्राय फटके बसूनही सत्संगाची किंमत त्यांना कळत नाही.  म्हणून साधुसंत कळवळून विनंती करतात –

कर जोडोनि विनवितो तुम्हा | नका करु संसारश्रमा |
नका गुंतु विषयकामा | तुम्ही आठवा मधुसूदना |

विषयांच्या कर्दमात लोळू नका.  पण व्यर्थ !  हे कोणालाही पटत नाही.  त्यामुळे अनेक शतके जन्म गेल्यावरच सत्संगाची किंमत, त्याचा महिमा कळतो.  म्हणून सङ्गः सत्सु विधीयताम् | हे विधिवाक्य आहे.  शरीराने नव्हे, तर पूर्ण जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक मनानेच मनाला निवृत्त केले पाहिजे व मन सत्संगात नेले पाहिजे.

 
- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ