प्रारब्धकर्मामुळे
मनुष्य भूतकाळही जगत नाही, भविष्यकाळही जगत नाही तर वर्तमानकाळातील ‘आताचा क्षणच’
केवळ जगतो. पुढच्या क्षणी काय होणार ? हे त्याला माहीत
नसते. तो पुढचा क्षण सुखाचा असेल किंवा कदाचित दुःखाचा
असेल. संपूर्ण जीवन विशिष्ट घटनांनी साचेबंद झालेले
असते. हे जीवनाचे स्वरूप
साधकाने विचारात घ्यावे.
परंतु
सर्व माणसे स्वार्थाने चांगल्या कर्माचे कर्तृत्व स्वतःकडे घेतात तर वाईट अथवा
दुःखद कर्माचा दोष पळपुटेपणाने माणसे दुर्दैवावर, फुटक्या नशिबावर ढकलतात. पेरावे
तसे उगवते या न्यायाने, आपल्याच कर्माचे फळ सुखद अथवा दुःखद घटनेच्या रूपाने
आपल्यापुढे उभे रहात असेल, तर आनंदाने हुरळून जाण्याचे कारण नाही, तसेच दुःखाने
अश्रुपात करण्याचेही कारण नाही. दोन्ही
परिस्थितीत कोणत्याही प्रकारे भावनेचा उद्रेक होण्याचे कारण नाही. पूर्ण
समतोल वृत्तीनेच दोन्ही प्रसंग स्वीकारले पाहिजेत, प्रतिक्रियारहित स्वीकार केला
पाहिजे.
जेथे
मनाची शांति व सुख आहे, तेथे सर्वच प्रसंगात भावनेचा उत्कर्ष किंवा अपकर्ष आढळत
नाही. जीवनाची पूर्ण समज तेथे असल्याने सर्वच
प्रसंगाचे स्वागत केले जाते. तरंगरहित नीरव शांति त्या मनात, अंतःकरणात
नांदत असते. तेथे मनाची, विचारांची पूर्ण परिपक्वता आहे. असे
हर्षविषादरहित, संतुलित मन घडविले पाहिजे, हीच तितिक्षा अथवा सहनशीलता आहे. असे
मन सदैव समाधानी व आनंदी असते. अशी व्यक्ति सदैव प्रसन्नचित्त असते.
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, September 2005
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment