Tuesday, January 27, 2015

अनात्मज्ञ | Knower of Unreal




ज्यांना ईशबुद्धि, सर्व ठिकाणी ईश्वर पाहणे शक्य नाही, ज्यांच्यामध्ये ज्ञाननिष्ठा नाही, यत् दृष्टं तत् सत्यम् |  अशीच ज्यांची बुद्धि आहे त्यांना direct अज्ञानी म्हणत नाहीत तर ‘अनात्मज्ञ’ असा शब्द वापरतात.  श्रीसमर्थ सुद्धा अशा माणसांना ‘पढतमूर्ख’ असा शब्द वापरतात.  तसेच याठिकाणी भाष्यकार ‘आत्मअज्ञानी’ असे म्हणत नाहीत तर ‘अनात्मज्ञ’ असे म्हणतात.

हे लोक अनात्म्याला जाणतात, म्हणजेच जे दृश्य, स्थूल आहे, तेच जाणणारे, विषयांनाच सत्यत्व देऊन विषयासक्त होणारे कामुक, विषयाभिमुख, प्राकृत, वैषयिक लोक होत.  असे लोक आत्म्याचे ग्रहण करण्यासाठी अशक्त आहेत, म्हणजेच ते आत्मज्ञानप्राप्तीसाठी असमर्थ आहेत.  बाकी सगळ्या ठिकाणी मात्र ते सशक्त असतात.  ‘इकडे काय चालले आहे, तिकडे काय चालले आहे? हा कोण, तो कोण?’ अशा प्रकारे ते व्यवहारकुशलज्ञ असतात.  गल्लीपासून दिल्लीपर्यंत साऱ्या जगाचे ज्ञान त्यांना असते.  स्वतःच्या १० x १० च्या खोलीत बसून विश्व कसे चालावे ?  याची मनमुराद चर्चा ते करतात.

परंतु असे लोक स्वतःचे स्वरूप, मीचे पारमार्थिक स्वरूप समजावून घेण्यात अत्यंत असमर्थ असतात. मी कोण?  या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळत नाही.  अशा लोकांसाठीच श्रुतिमाता अत्यंत कृपाळूपणे यापुढील मंत्रामधून ‘कुर्वन् एव’ असे आश्वासन देते.  कर्ममार्ग सांगते.  कर्म हा शब्द ऐकल्याबरोबरच सामान्य माणसाला बरे वाटते, कारण आपल्याला सतत काही ना काहीतरी करायला आवडते.  म्हणूनतरी आपण दिवसभर ‘काय करू, काय करू ?’  असा प्रश्न विचारतो. म्हणून श्रुति पुढील मंत्रामध्ये कर्मनिष्ठा प्रतिपादित करते.

                    कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतसमाः |
एवं त्वयि नान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे ||

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ

Tuesday, January 20, 2015

एका रात्रीत प्रचीति | Overnight Realization


अध्यात्ममार्गामध्ये वरवरची इच्छा, त्याग किंवा वैराग्य उपयोगी पडत नाही.  आम्ही संसारही करू, विषयही उपभोगू आणि हे सर्व करता करता जमेल तशी, वेळ मिळेल तशी साधनाही करू, असा सर्वसामान्यतेने सर्वांचा विचार दिसतो.  म्हणूनच या मार्गामध्ये अनेक साधक अनेक वर्षे काहीतरी करीत राहतात.  वर्षानुवर्षे करूनही हाताशी काहीही येत नाही.  मग गुरूंना, शास्त्राला, परंपरेला, अन्य व्यक्तींना, समाजाला, परिस्थितीला किंवा भगवंतालाही ते दोष देतात.  परंतु दोष हा बाहेर नसून आपल्या अंतरंगामध्येच आहे.  अजूनही आपल्या मनामध्ये त्या प्रतीची तळमळ नाही.

एक शिष्य रोज गुरुंच्याकडे येतो.  ज्ञान मागतो, मुक्ति मागतो.  गुरु रोज उपदेश देत राहतात, परंतु शिष्याला अपेक्षा असते की, गुरूंनी काहीतरी करावे आणि मला एका क्षणात आत्मसाक्षात्कार किंवा मुक्ति द्यावी.  एक दिवस गुरु त्याला नदीकाठी घेऊन जातात.  त्याला पाण्यामध्ये नेतात. आत जेथे गळयापर्यंत पाणी आलेले असते, तेथे नेऊन त्याचे डोके आत दाबतात.  तो डोके पाण्याच्या बाहेर काढतो.  एक सेकंदानंतर गुरु पुन्हा जोराने खाली दाबतात.  तो पुन्हा डोके बाहेर काढतो.  पुन्हा तिसऱ्यांदा डोके दाबतात, तो पुन्हा डोके बाहेर काढतो.

नंतर त्याला ते काठावर घेऊन येतात व विचारतात ‘तुला काय वाटले ?’ त्यावेळी तो शिष्य उत्तर देतो ‘गुरुजी !  हे तुम्ही काय केलेत ?  जगतो की मरतो असे झाले.  माझा जीव वाचविण्यासाठी मी अत्यंत कासावीस झालो, गुदमरलो आणि म्हणून वेगाने डोके बाहेर काढले.  बस्स !  त्याक्षणी दुसरे काहीही आठवले नाही.’  यांवर गुरु उत्तर देतात ‘बाळा !  ज्यावेळी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी इतकीच तीव्र तळमळ, व्याकुळता निर्माण होईल, मुक्तीसाठी तुझा जीव तळमळेल, त्याचवेळी तुला आत्मसाक्षात्कार होईल.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ

Tuesday, January 13, 2015

अपरिग्रह | Non-Possession



ज्या साधकाला खरोखरच अभ्यास करायचा असेल, शास्त्राध्ययन करायचे असेल, श्रवण, मनन, निदिध्यासना करायची असेल तर संग्रहाचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे.  यालाच ‘अपरिग्रह’ असे म्हणतात. किंवा भगवान म्हणतात –

विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि | (गीता अ. १३ – १०)

साधना करीत असताना निदान सुरुवातीला काही काळ जनसंपर्काचा त्याग करून एकांतवास आवश्यक आहे.  खरोखरच अत्यंत कमीत कमी गरजांच्यामध्ये विषयांच्याशिवाय, भोगांच्याशिवाय इतकेच नव्हे, तर माणसांच्याशिवाय मी जगू शकतो, हे स्वतःच अनुभवले पाहिजे.  परमेश्वरावर खऱ्या अर्थाने निर्भर होऊन जीवन जगण्याची मनाची धारणा झाली पाहिजे.

कारण जितके आपल्या सभोवती विषय, भोग, माणसे आहेत, तितके विक्षेप वर्धन पावतात.  एकेक क्षुल्लक विषय किंवा कामना सुद्धा अनेक विकल्पांना कारण होते.  श्रवणादि साधनेमध्ये अनेक द्वंद्व, विक्षेप, प्रतिबंध निर्माण होतात.  आपण विषयांच्यावर, माणसांच्यावर अवलंबून राहतो.  शरीराने अवलंबून असणे हा दोष नाही, परंतु मनाने दुसऱ्यावर अवलंबून असणे हा प्रचंड मोठा दोष आहे.


कदाचित शरीराने आपण एकटे राहू शकू परंतु विषय, माणसे नसतील की, मी अस्वस्थ होतो, व्याकूळ होतो.  काय करावे ?  काहीच सुचत नाही.  एकांतवास असह्य होतो.  मन सतत कोणालातरी पकडण्याचा प्रयत्न करते.  असे मन साधना करण्यास अत्यंत प्रतिकूल आहे.  म्हणूनच येथे – मा गृधः |  यामधून श्रुति संग्रहवृत्तीचा त्याग करण्यास सांगते.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

Wednesday, January 7, 2015

संग्रह्वृत्ती | The Attitude of Accumulation



मा गृधः | गृधिं मा कार्षिः इत्यर्थः |

धनाबद्दल असणारी जी आसक्ति किंवा इच्छा तिचा त्याग करावा.  आज सर्व जीवांची धनसंग्रह करण्याचीच प्रवृत्ति आहे.  मनुष्य जन्मल्यापासून मृत्युपर्यंत अनेक विषय, उपभोग, संपत्ति, स्थावरजंगम मालमत्ता, सत्ता, कीर्ति, यश, मान-सन्मान या सर्वांचा संग्रह करीत असतो.  ‘जितका आपण संग्रह करू, तितके आपण जास्तीत जास्त सुखी होऊ’ अशी त्याची कल्पना असते.

संग्रह केल्यामुळे कदाचित काही प्रमाणामध्ये आपल्या दैनंदिन समस्या, problems कमी झालेले दिसतात.  परंतु हीच संग्रहाची वृत्ति अत्यंत घातक ठरते.  संग्रह करणे वाईट नाही. परंतु संग्रहवृत्ति मात्र अत्यंत वाईट आहे.  त्या संग्रहाच्या वृत्तीमुळेच मनामध्ये अनेक प्रकारचे विक्षेप येतात, मन त्याच संग्रहीत विषय, भोग आणि व्यक्तींच्यामध्येच गुंतून राहते.

Planning करण्यामध्येच आयुष्य निघून जाते.  पैसे किती मिळवावेत, कसे मिळवावेत, १ लाखाचे २ लाख कसे करावेत, पैशाचा विनियोग कसा करावा, पैसे कोठे व कसे गुंतवावेत ?  या सगळ्या नियोजनामध्ये मन अत्यंत बहिर्मुख होते.

मनुष्य तेथेच थांबत नाही तर त्याची संग्रहवृत्ति दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाते.  या वृत्तीमुळे तो स्वतःचे जीवन शांत जगू शकत नाही.  तो विषयांच्याशिवाय, भोगांच्याशिवाय राहू शकत नाही.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ



Saturday, December 27, 2014

परमेश्वर नियमन कसे करतो ? | How God Controls ?

 
परमेश्वराच्या भीतीने, आज्ञेनेच वारा वाहातो, सूर्य उगवतो, अग्नि, इंद्र, यम वगैरेदि स्वव्यापारामध्ये प्रवृत्त होतात.  परमेश्वराच्या सत्तेशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही.
 
अशा या जगड्व्याळ विश्वावर नियमन करूनही परमात्म्यामध्ये लेशमात्रही विकार होत नाही.  याउलट आपल्याला साधे आपल्या मुलावरही नियमन करता येत नाही.  त्यांच्यावर नियमन करीत असताना आपल्या क्रोधाचा पारा चढतो.  याउलट परमात्मा सर्व सृष्टीवर, सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, चौदा भुवने, उच्च-अधमादि सर्व योनि या सर्वांवर नियमन करतो, परंतु त्याच्या निर्गुण स्वरूपामध्ये कोणताही बदल होत नाही.  मग तो कसे नियमन करतो?
 
टीकाकार दृष्टांत देतात – जसे, आरशासमोर देवदत्त नावाचा माणूस उभा राहिला तर आरशामध्ये त्याचे प्रतिबिंब पडते.  त्यावेळी तो देवदत्त आरशामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाचा ‘ईशिता’ नियामक होतो.  या दृष्टांतामध्ये देवदत्त हा बिंबस्थानीय आहे.  देवदत्ताचे प्रतिबिंब पडण्यासाठी आरसा या उपाधीची आवश्यकता आहे.  तसेच देवदत्त एक असेल तरी जितके आरसे तितकी प्रतिबिंबे निर्माण होतात.  एकच देवदत्त दोन, तीन झाल्यासारखा भासतो.  प्रतिबिंब निर्माण झाल्यावर किंवा प्रतिबिंब निर्माण होत असताना सुद्धा देवदत्तामध्ये कोणताही विकार, बदल, परिणाम होत नाही.  कर्तृकारकादि प्रत्ययही निर्माण होत नाही.
 
याचे कारण तो – प्रतिबिंबानाम् आत्मा सन् | प्रतिबिंबे ही मिथ्या, भासात्मक आहेत.  आरशामधून पाहिले म्हणजेच उपाधीच्या दृष्टीने पाहिले तर प्रतिबिंबच सत्य वाटते, परंतु देवदत्ताच्या दृष्टीने पाहिले तर प्रतिबिंब मिथ्या, भासात्मक दिसते.  म्हणूनच आरसा फुटला तरी देवदत्ताला काहीही इजा होत नाही.  आचार्य याही पुढे जाऊन म्हणतात की, तोच देवदत्त प्रतिबिंबावर नियमन करतो.  प्रतिबिंबाच्या अनुषंगाने देवदत्त नियामक होतो.  परंतु प्रतिबिंबच मिथ्या असल्यामुळे देवदत्ताचे नियामकत्वही वस्तुतः मिथ्या, भासमान, कल्पित आहे.  देवदत्तावर हा आरोप केलेला आहे.
 
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
 
- हरी ॐ

Saturday, December 20, 2014

भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्य


गवत्पूज्यपाद आदि शंकराचार्य

                                
वंदन

                   सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् |
                   अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् ||

जी गुरुशिष्यपरंपरा भगवान सदाशिवापासून प्रारंभ झाली आहे, भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्य ज्या परंपरेच्या मध्यभागी प्रतिष्ठित आहेत आणि आमच्या गुरूंच्यापर्यंत अखंडपणे चालत आलेल्या या दिव्य गुरुपरंपरेला वंदन असो.

                          पूर्वपीठिका
विश्वामध्ये ज्या ज्या वेळी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व आध्यात्मिक घडी विस्कळीत होते त्या त्या वेळी, त्या त्या समयानुसार विश्वकल्याणासाठी परमेश्वर स्वतःच अवतार घेतो. आपल्या अलौकिक सामर्थ्याने अधर्माचा नाश करून विश्वामध्ये धर्माची संस्थापना करतो. आपली भारतभूमि ही तर सर्व अवतारांची जन्मभूमि व लीलाभूमि आहे. भगत्पूज्यपाद आदि शंकराचार्य हे साक्षात भगवान शिवांचा अवतार होत. आचार्यांच्या अवतारापूर्वी समाजाची वैचारिक दुरवस्था झालेली होती. निरीश्वरवाद व नास्तिकवाद यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार झाला होता. त्यामुळे संपूर्ण समाज हा अत्यंत बहिर्मुख व अनेक प्रकारच्या भोगांच्यामध्ये आसक्त झाला होता. मनुष्यामधील भोगवादी प्रवृत्ति वाढीस लागली होती. समाजामध्ये वेदविरोधी प्रचार झाल्यामुळे बहुतांशी लोक वैदिक कर्मांच्यापासून परावृत्त झाले होते. त्यामुळे धर्मभ्रष्टही झाले होते. इतकेच नव्हे, तर जे लोक वैदिक धर्माचे अनुसरण करीत होते, त्यांच्यामध्येही एकवाक्यता राहिली नव्हती. प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार वेदवाक्यांचा अर्थ लावीत असे. त्यामुळे अनेक मते, अनेक पंथ, अनेक संप्रदाय व अनेक परंपरा निर्माण झाल्या होत्या. नक्की कोणाचे ऐकावे ? कोठे विश्वास ठेवावा ? हेच सामान्य मनुष्याला समजत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये मनुष्याला धर्माचे व तत्त्वाचे यथार्थ ज्ञान सोप्या भाषेत समजावून देणे व त्याला धर्माचरणामध्ये प्रवृत्त करणे आवश्यक होते. नेमके हेच कार्य आचार्यांनी केले. आचार्य ह्या शब्दाचा अर्थ होतो – यः शास्त्रार्थं स्वयं आचरन् इतरान् अपि आचरयति सः आचार्यः| जो शास्त्रार्थाचे प्रथम स्वतः आचरण करून अन्य लोकांनाही सन्मार्गस्थ करतो, त्यास ‘आचार्य’ असे म्हणतात. मानवी जीवनामधील उत्तम जीवनमूल्यांचे व सर्वश्रेष्ठ असणाऱ्या तत्त्वाचे ज्ञान देण्यासाठीच आदि शंकराचार्यांचा या पृथ्वीतलावर अवतार झाला होता.

                आदि शंकराचार्यांचा जन्म-वेळ व स्थान

आचार्यांच्या काळाविषयी विद्वान लोकांच्यामध्ये मतभेद आहेत. आचार्यांनी लिहिलेल्या विशाल वाङ्मयामध्ये कोठेही त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत उल्लेख आढळत नाही. अतिशय नम्र व निगर्वी असणाऱ्या आचार्यांनी स्वतःविषयी एक वाक्यही लिहून ठेवले नाही. त्यामुळे त्यांच्या ग्रंथाच्या आधारे सुद्धा आचार्यांचा काळ निश्चित करणे कठीण आहे. अर्थात या विषयात सखोलात जाण्याची आवश्यकता नाही. काही ठिकाणी इसवी सन ७८८ हा आचार्यांचा काळ मानला जातो.

भारताच्या दक्षिण दिशेला केरळ प्रातांत पूर्णा नदीच्या काठावरील ‘कालटी’ या गावी आचार्यांचा जन्म झाला. पूर्णा नदीचा पवित्र प्रवाह, उंचच–उंच वृक्ष, प्रकृतीचे अनुपम सोंदर्य लाभलेला हा उत्तम प्रदेश होता. कालटी ह्या छोट्याश्या गावात ‘विद्याधिराज’ नावाचे एक सदाचारी, विद्वान ब्राह्मण गृहस्थ राहत होते. तेच आचार्यांचे आजोबा होत. येथील ब्राह्मणांना ‘नम्बुद्री ब्राह्मण’ असे म्हटले जाई. विद्याधिराजांच्या घरी अनेक वर्षांच्यापासून अध्ययन-अध्यापन परंपरा अखंडपणे चालू होती. त्यांना ईश्वराच्या अनुग्रहाने ‘शिवगुरु’ नावाचा उत्तम पुत्र प्राप्त झाला. शिवगुरूंचा उपनयन संस्कार करून वडिलांनी त्यांना गुरुगृही पाठविले. अत्यंत अल्प काळातच शिवगुरूंनी आपले अध्ययन उत्तम रीतीने पूर्ण करून विपुल कीर्ति संपादन केली. गुरुगृहातून घरी आल्यावर त्याचा विवाह अत्यंत सुरूप व सुस्वभावी असणाऱ्या ब्राह्मणकन्येबरोबर झाला. तीचे नाव ‘आर्याम्बा’ असे होते. शिवगुरूंनी तिच्याबरोबर गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण केले. ‘आर्याम्बा’ व ‘शिवगुरु’ हेच आचार्यांचे श्रेष्ठ माता-पिता होत.

शिवगुरूंचा गृहस्थाश्रम स्नान-संध्या, पूजा-अर्चा, अध्ययन-अध्यापन, अतिथिपूजन अशा सत्कर्मांच्यामध्ये आर्याम्बेच्या साहाय्याने अगदी सुव्यवस्थितपणे चालला होता. परंतु अनेक वर्षे लोटली तरी त्यांच्या पोटी संतान नव्हते. त्यामुळे ते दोघेही दुःखी असत. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने त्यांनी काही काळ भगवान शिवाची एकनिष्ठ आराधना व कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे भगवान शिवांनी प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगितले. भगवान शिव त्यांना म्हणाले की, ‘आपणास एक पुत्र हवा की अनेक? तुम्हाला सर्वज्ञ व गुणवान पुत्र हवा असेल तर एकच पुत्र मिळेल.’ यावर शिवगुरूंनी सांगितले की, ‘आम्हास एकच पुत्र असेल तरी चालेल, परंतु तो गुणसंपन्न हवा.’ भगवान शिव, ‘तथास्तु|’ म्हणाले. यानंतर योग्य काळी ‘वैशाख शुद्ध पंचमीस’ अत्यंत शुभ मुहूर्तावर आर्याम्बा प्रसूत झाली. तिला दिव्य पुत्ररत्न प्राप्त झाले. भगवान शंकरांच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या या तेजस्वी, सर्वज्ञ व गुणसंपन्न पुत्राचे नाव ‘शंकर’ असे ठेवण्यात आले.

                      आदि शंकराचार्यांचे बालपण

आचार्यांचा जन्म जसा अद्भुत पद्धतीने झाला, तसेच त्यांचे बालपणही वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण होते. बाल शंकरांचे दिव्य तेज सर्वानांच जाणवू लागले. लहान वयामधील त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता व ज्ञानग्रहणक्षमता केवळ अवर्णनीय होती. त्यांच्या बाललीला व बुद्धिवैभव पाहून शिवगुरु व आर्याम्बेला खूप आनंद होत असे. परंतु हा आनंद अधिक काळ टिकला नाही. शिवगुरूंनी अचानकपणे आपली इहलोकीची यात्रा संपविली. आचार्यांवर लहान वयातच हा दुःखाचा प्रसंग ओढवला. आर्याम्बेने हा आघात अत्यंत शांततेने सहन केला व ती बाल शंकरांचे संगोपन करू लागली. आचार्य पाच वर्षांचे असतानाच त्यांचा उपनयन संस्कार झाला. गुरुगृही जाऊन शास्त्र, पुराणे, संस्कृत भाषा हे सर्व ज्ञान ग्रहण करून आचार्यांनी वेदाध्ययनास प्रारंभ केला. तीव्र मेधाशक्ति व तीक्ष्ण प्रज्ञेच्या साहाय्याने त्यांनी वेद, शास्त्रांचे ज्ञान अवघ्या तीन वर्षात पूर्ण केले. आचार्य हे जन्मतःच अलौकिक प्रतिभाशक्ति लाभलेले महान कवि होते. कविहृदय लाभल्यामुळे त्यांचे मन अतिशय प्रेमळ, तरल व संवेदनशील होते. लहान वयातच त्यांना भगवती त्रिपुरसुंदरीचे दर्शन झाले. तिच्या आशीर्वादाने आचार्यांनी सर्वप्रथम ‘सोंदर्यलहरी’ हे स्तोत्र लिहिले. शाक्त संप्रदायामध्ये या ग्रंथाला अतिशय महत्वाचे स्थान आहे.

गुरुगृही असताना एकदा आचार्य भिक्षेस गेले होते. तेव्हा ते एका गरीब ब्राह्मणाच्या घरी आले. तेथे त्यांनी भिक्षा मागितली. मात्र तेथील अठरा विश्व दारिद्र्य पाहून आचार्यांचे बालहृदय अत्यंत कष्टी झाले. त्यावेळी त्यांनी अनन्यभावाने महालक्ष्मीचे स्तवन आणि आवाहन केले. त्या ब्राह्मणाच्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी श्रीलक्ष्मीच्या चरणी प्रार्थना केली. ती प्रार्थनाच ‘कनकधरा स्तोत्र’ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे बालवयापासूनच आचार्यांची प्रतिभाशक्ति शब्दाकार घेऊ लागली. आचार्य आठव्या वर्षीच वेदशास्त्रसंपन्न होऊन, गुरूंचा आशीर्वाद घेऊन स्वगृही परतले. आईची सेवा व अध्ययन-अध्यापन हा त्यांचा प्रमुख दिनक्रम असे.

आचार्यांची अलौकिक बुध्दिमत्ता, ज्ञानाची प्रगल्भता व त्यांचे तेजस्वी जीवन यामुळे त्यांची कीर्ति दूरवर पसरू लागली. अनेक लोक त्यांच्याकडे येऊन शास्त्र समजावून घेत व आपल्या शंका निरसन करून घेत. विशाल सागराप्रमाणे आचार्यांचे गंभीर ज्ञान, दैवी तेज, मुखावरील प्रसन्नता, पाणीदार डोळे, भव्य भालप्रदेश, मोठे कान, सरळ नाक, आरक्त ओठ, शंखासमान कंठ, रुंद छाती, कपाळी भस्म, त्यावर कुंकुमतिलक, कंठामध्ये रुद्राक्षांची माळ अशा कुमार शंकरांच्या कर्पूरगौर मूर्तीकडे पाहून क्षणभर भगवान शिवांचाच भास होत असे. त्यांच्याकडे पाहून आर्याम्बेला खूप धन्यता वाटे. त्यांची सुकुमार मूर्ति पाहून तिच्या मनामध्ये आपल्या मुलाच्या विवाहाविषयी विचार येऊ लागले.

परंतु शंकरांच्या मनात मात्र खूप वेगळेच चालले होते. अखिल विश्वाच्या कल्याणासाठी, वैदिक धर्माच्या संस्थापनेसाठी, मायाजाळामध्ये जखडलेल्या मनुष्याला संसारमुक्त करण्यासाठी, आपण सर्व भोगांचा त्याग करून सर्वश्रेष्ठ असणाऱ्या त्यागमार्गाचे म्हणजेच संन्यासमार्गाचे आचरण करून परोपकारामध्येच मानवसेवेसाठी जीवन व्यतीत करावे, असे आचार्यांनी मनोमन ठरविले. गृहत्याग करण्यासाठी आईची परवानगी मिळणे आवश्यक होते. त्यासाठी कुमार शंकर आपल्या आईला अधून-मधून शास्त्रामधील चार गोष्टी, संसाराची व्यर्थता, ईश्वरप्राप्तीमध्येच जन्माची सार्थकता, लोककल्याणासाठी जीवनाचे समर्पण अशा अनेक गोष्टी समजावून देई. आचार्यांचे हे विचार आर्याम्बेला ऐकायला बरे वाटायचे. परंतु आचार्यांनी स्वतः संन्यास घ्यावा, हे तिला मुळीच पटत नव्हते. आपल्याला संन्यास घेण्यासाठी आईची सहजासहजी परवानगी मिळणार नाही, हे आचार्यांना जाणवले. परंतु त्यांचे मन तर संन्यासदीक्षेसाठी रात्रंदिवस तळमळत होते. शेवटी एका बिकट प्रसंगी त्यांनी आईची परवानगी मिळवलीच! त्यावेळी त्यांनी आईला, तिच्या अंतकाळी तिच्याजवळ येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे आचार्यांनी आईच्या मृत्युसमयी तिच्याजवळ जावून तिला तिच्या इच्छेप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे दर्शन देखिल करवून दिले. त्यांनी स्वतःच आईचे अंत्यकर्म सुद्धा पार पाडले. आचार्य हे थोर मातृभक्त होते.

                            गुरूंची प्राप्ति  

आईची शाब्दिक परवानगी घेऊन, मनोमन संन्यास घेऊन आचार्य आता गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडले. आचार्यांच्या जीवनामधील नवीन पर्व सुरु झाले. इतक्या लहान वयात आचार्य एकटेच पायी-पायी केरळपासून नर्मदेच्या पवित्र तटावर येऊन पोहचले. तेथेच नर्मदाकाठी असणाऱ्या एका गुहेमध्ये आचार्यांना परमहंस परिव्राजकाचार्य श्रीगोविंदयतींचे दर्शन झाले. हेच आचार्यांचे गुरु होत. आचार्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला. श्रीगोविंदयतींनी आचार्यांना संन्यासदीक्षा देऊन उपदेश केला व गुरुशिष्यपरंपरेने आलेले गुह्य ज्ञान आचार्यांना दिले. ही गुरुपरंपरा अशी आहे –

नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च |
व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यम् ||
श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् |
तं तोटकं वार्तिककार मन्यान् अस्मद् गुरून् संततमानतोस्मि ||   

हे अद्वैत ज्ञान सर्वप्रथम श्रीनारायणाने ब्रम्हदेवाला, ब्रम्हदेवाने श्रीवसिष्ठांना, श्रीवसिष्ठांनी शक्तीला (शक्ति नावाच्या ऋषींना), शक्तीने पराशराला, पराशराने बादरायण व्यासांना, श्रीव्यासांनी श्रीशुकाला, श्रीशुकाचार्यांनी गौडपादाचार्यांना, श्रीगौडपादाचार्यांनी श्रीगोविन्द यतींना, व श्रीगोविन्द यतींनी आदि शंकराचार्यांना दिले. आदि शंकराचार्यांनी ते ज्ञान पद्मपादाचार्य, हस्तामलकाचार्य, तोटकाचार्य व सुरेश्वराचार्य या आपल्या शिष्यांना दिले. तेच ज्ञान गुरुशिष्यपरंपरेने आपल्यापर्यंत आलेले आहे. अत्यंत पवित्र असणाऱ्या नर्मदेच्या तीरी आचार्यांना आपल्या गुरूंचे दर्शन व गुरूंची प्राप्ति झाली. तेथेच आचार्यांनी प्रसिद्ध असणारे ‘नर्मदाष्टकम्’ रचले.
   
                          काशीनगरीस प्रस्थान  

     यानंतर गुरूंचा आशीर्वाद घेऊन आचार्य पवित्र काशीनगरीत पोहोचले. रोज पहाटे गंगेचे स्नान, नित्य कर्म, श्रीकाशीविश्वेश्वराचे दर्शन, ढुंढीविनायकाचे दर्शन, मणिकर्णिकाच्या घाटावर प्रवचन, भिक्षाचरण असे आचार्यांचे काशीमधील जीवन होते. येथेच आचार्यांनी अतिशय सुंदर असणारे ‘अन्नपूर्णा स्तोत्र’ रचले. या काळातच आचार्यांनी कालभैरवाष्टक, गंगास्तोत्र, मणिकर्णिका स्तोत्र, अशा विविध मधुर स्तोत्रांची रचना केली. स्तोत्ररचना करीत असतानाच आचार्यांनी दुसऱ्या बाजूला अत्यंत प्रगल्भ व गंभीर भाष्ये लिहायला प्रारंभ केला. आचार्यांनी सर्वप्रथम श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रावर भाष्य रचले. आचार्यांचे लहान वय, दिव्य तेज, तपश्चर्या, ज्ञाननिष्ठा या सर्वांचा विद्वज्जनांवर परिणाम होत असे. त्यामुळे मोठमोठे पंडितही आचार्यांचे शिष्य होऊ लागले. पद्मपादाचार्य, हस्तामलकाचार्य, तोटकाचार्य व सुरेश्वराचार्य हे आचार्यांचे प्रमुख शिष्य मानले जातात. एकदा पाठ चालू असताना प्रत्यक्ष भगवान व्यासांनी एका ब्राह्मणाच्या रूपात येऊन आचार्यांना शास्त्रामधील अनेक कठीण प्रश्न विचारले. आचार्यांनी त्या सर्व प्रश्नांची अत्यंत नम्रतेने अचुक व यथायोग्य उत्तरे दिली. त्यावेळी भगवान व्यासांनी त्यांच्यावर संतुष्ट होऊन त्यांना ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्यास सांगितले. त्यानंतर आचार्यांनी ब्रह्मसूत्रावर अत्यंत प्रदीर्घ व प्रमाणभूत असे भाष्य केले.

                       आचार्यांना भगवान श्रीकाशीविश्वेश्वराचे दर्शन

      एकदा काशीमध्ये असताना आचार्यांना चांडालवेषधारी भगवान श्रीकाशीविश्वेश्वराने दर्शन दिले. त्यावेळी आचार्य आणि भगवान शिव यांच्यामध्ये झालेला ज्ञानप्रचुर संवाद ‘मनीषा पञ्चकम्’ या स्तोत्ररूपाने प्रसिद्ध आहे. त्याचवेळी काशीविश्वेश्वराने पार्वतीपरमेश्वरच्या रूपामध्ये आचार्यांना दर्शन दिले व दिग्विजयासाठी प्रस्थान करण्याची आज्ञा केली. भगवान शिवाच्या आज्ञेने आचार्यांनी दिग्विजयासाठी प्रयाण केले.

                            आचार्यांची दिग्विजययात्रा

      आचार्य काशी सोडून प्रयाग तीर्थक्षेत्री आले. आचार्यांच्या दिग्विजय यात्रेस प्रारंभ झाला. हे आचार्यांच्या जीवनाचे आणखी एक महत्वाचे पर्व आहे. प्रयागक्षेत्री आल्यावर आचार्य आणि कुमारिल भट्ट यांची भेट झाली. कुमारिल भट्टांनी मोठ्या प्रयत्नाने नास्तिक मताचे खंडन करून वैदिक धर्माची स्थापना केली होती. त्यांनी वेदांचे प्रामाण्यत्व सिद्ध केले. त्यानंतर आचार्यांनी कुमारिल भट्टांचे शिष्य मंडनपंडित याची भेट घेतली. त्यांना वादविवाद करण्याची याचना केली. आचार्य आणि मंडनपंडित यांच्या वादसभेमध्ये मध्यस्थीचे काम प्रत्यक्ष देवी सरस्वतीचा अंश असणाऱ्या मंडनपंडितांच्या पत्नीने-भारतीने केले. यामध्ये आचार्यांनी मंडनपंडितांसह त्यांच्या पत्नीलाही पराभूत केले. मंडनपंडितांनी आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. तेच आचार्यांचे सुरेश्वराचार्य हे पट्टशिष्य होत.

      दिवसेंदिवस आचार्यांचा शिष्यपरिवार वाढत होता. आचार्यांनी आपला शिष्यपरिवार बरोबर घेऊन भारतभर आसेतुहिमाचल भ्रमण केले. त्यावेळी शाक्त, शैव, कापालिक, पांचरात्र, सौर, गाणपत, चार्वाक व इतर अनेक दार्शनिक यांना वादविवादामध्ये जिंकले. त्यांची चुकीची मते युक्तिवादाच्या साहाय्याने खंडन केली. त्यांना समन्वयप्रधान अद्वैत ज्ञान प्रदान केले. सर्वांना अद्वैत ज्ञानाच्या विचारधारेमध्ये समाविष्ट केले. व्यक्तिगत बुरसटलेली व अहंकाराने उन्मत्त झालेली महा-महापंडितांची मतप्रणाली बदलवणे, हे अत्यंत कठीण काम होते. आचार्यांनी आपल्या स्पष्ट ज्ञानाने व अपूर्व चातुर्याने ते पूर्ण केले. त्यामुळे आचार्यांची दिग्विजययात्रा पूर्णतः यशस्वी झाली.

                                 शारदा पीठारोहण

      आचार्य हे एक महान योगी होते. आचार्यांनी आपल्या अफाट योगसामर्थ्याने परकायाप्रवेशासारखे कठीण प्रयोगही सिद्ध केले. आचार्यांची स्मरणशक्ति सुद्धा अतिशय विलक्षण होती. एकदा ऐकले की, त्यांच्या कायम स्मरणात राहत असे. एका राजाची तीन नाटके व पद्मपादाचार्यांनी लिहिलेला ‘पंचपादिका’ नावाचा ग्रंथ एकदाच ऐकून आचार्यांनी पुन्हा जसाच्या तसा म्हणून दाखविला होता. एकदा आचार्यांनी काश्मीरमधील शारदापीठाबद्दल ऐकले की, ‘शारदापीठाच्या भव्य मंदिरास चारही दिशांना चार दरवाजे आहेत. तेथे मोठमोठे विद्वान पंडित बसलेले आहेत. त्यांच्याशी वादविवाद करून तीन दिशांचे तीन दरवाजे उघडले गेलेले आहेत. परंतु दक्षिणेकडून एकही विद्वान न आल्यामुळे दक्षिण दरवाजा बंद आहे.’ हे ऐकून आचार्यांनी काश्मीरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तेथे जाऊन पंडितांशी वाद करून आचार्यांनी सर्वांना वादात जिंकले. शारदापीठाचा दक्षिण दरवाजा उघडला गेला. तेथे प्रत्यक्ष शारदामाता त्यांच्यावर संतुष्ट झाली. सर्व विद्वानांच्या साक्षीने व सर्वानुमते आचार्य शारदापीठावर- सर्वज्ञपीठावर आरूढ झाले.

                             मठस्थापना

अवतारकार्य संपविण्यापूर्वी आचार्यांनी भारताच्या आध्यात्मिक, धार्मिक व सांस्कृतिक वैभवाच्या रक्षणासाठी भारताच्या चार दिशांना चार मठ स्थापन करून देशसेवेचे व धर्मसेवेचे अद्वितीय कार्य केले. आचार्य केवळ मठ स्थापून थांबले नाहीत, तर ते मठ कसे चालावेत, मठांचे प्रयोजन व कार्य काय, हे सर्व नियम स्वतःच घालून दिले. संन्यासी परंपरेची दशनामांमध्ये (तीर्थ, आश्रम, वन, अरण्य, गिरि, पर्वत, सागर, सरस्वती, भारती, पुरी) विभागणी करून अतिशय सुव्यवस्थित अशी संन्यासी परंपरा निर्माण केली. आपले कार्य आता पूर्ण झाले आहे, असे जाणून आचार्यांनी निर्याणाचा संकल्प केला.

                       मानवतेचे सेवक – आचार्य

आचार्यांच्या अलौकिक ज्ञानाने जागतिक विचारवंतांना तर आकर्षित केलेच, परंतु आधुनिक विज्ञानाने सुद्धा आचार्यांचे युक्तियुक्त असणारे विचार आपल्या प्रयोगशाळेत तंतोतंत सिद्ध केले. आचार्य हे अतिशय कुशल संघटक, थोर देशभक्त व मानवसेवक होते. दळणवळणाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना आचार्यांनी आपल्या वेदांच्यामधील ज्ञान समाजामध्ये, विचारवंत, विद्वान, पंथाभिमानी, सत्ताधारी तसेच साधक, भक्त, जिज्ञासु व सामान्य मनुष्य अशा सर्व स्तरांच्यामध्ये पोहोचविले. देशातील कानाकोपऱ्यात पायी परिभ्रमण करून खऱ्या अर्थाने ज्ञानजागृति केली. आचार्यांच्या ज्ञानाला समुद्राची खोलो आणि आकाशाची विशालता लाभली आहे. आचार्यांचे व्यक्तिमत्व हिमालयासारखे उत्तुंग आहे. कठोर तार्किक असूनही आचार्य अतिशय कोमलहृदयी होते. त्यांच्या ज्ञानाच्या स्पर्शाने कित्येक दुःखी व निराश मनांना शांति मिळत होती.

                        आचार्यांचे अलौकिक कार्य

आचार्यांनी हे सर्व कार्य करीत असतानाच विपुल ग्रंथरचना केली. भाष्य, प्रकरण ग्रंथ व स्तोत्र असे आचार्यांच्या लिखाणाचे तीन प्रमुख विभाग पडतात. श्रीमद्भगवद्गीता, दहा उपनिषदे आणि ब्रह्मसूत्र या तीन ग्रंथांना ‘प्रस्थानत्रयी’ असे म्हटले जाते. आचार्यांनी यावर विस्तृत भाष्य केले. याशिवाय विष्णुसहस्त्रनामभाष्य, सनत्सुजातीय भाष्य, मांडूक्यकारिका भाष्य, श्वेताश्वेतरोपनिषद्भाष्य इत्यादि अनेक भाष्ये रचली. साधन पञ्चकम्, आत्मबोश, तत्त्वबोध, भज गोविन्दम् यासारखे अनेक प्रकरणग्रंथ लिहिले. तसेच शिव, विष्णु, गणेश, श्रीकृष्ण, देवि अशा अनेक देवतांची वर्णन करणारी सुंदर स्तोत्रे लिहीली. प्रत्येकाला आपापल्या मनाच्या स्वभावाप्रमाणे साधना करता यावी, म्हणून आचार्यांनी पंचायतन पूजा सांगितली. जनसामान्यांना खऱ्या धर्माचा मार्ग दाखविला. दिग्विजय यात्रेमध्ये देशभर भ्रमण करून पाखंडी, कर्मठ, भोंदु लोकांचे खंडन केले. अवैदिक मतांचा पराभव केला. वैदिक संप्रदायाची स्थापना केली. सर्व संप्रदायांच्यामधील मतभेद नष्ट करून सर्वांचा समन्वय केला. परस्परांच्यामधील पंथभेद, वर्णाश्रम भेद, जातिभेद, आश्रमभेद तसेच द्वेषमत्सरादि वैरभाव कमी करून समाजामध्ये धार्मिक व सांस्कृतिक ऐक्यभाव निर्माण केला. लोकांना ऐहिक व पारलौकिक कल्याणाचा, भक्तीचा, मुक्तीचा मार्ग दाखविला. समाजामधील व राष्ट्रामधील हे ऐक्य दीर्घकाल टिकून राहावे यासाठी आचार्यांनी चार मठ स्थापन करून त्यांची कार्यप्रणाली ठरवून दिली. राष्ट्राच्या एकात्मतेसाठी राजकीय दंडाबरोबरच धर्मदंडाची स्थापना केली. असे हे मानवी जीवनाच्या उत्थानाचे प्रचंड मोठे सर्वांगीण कार्य आपल्या अवघ्या ३२ वर्षांच्या अल्प आयुष्यात पार पाडणारे आचार्य हे एकमेव व अद्वितीय होत.

                     शिवावतार – आदि शंकराचार्य

आदि शंकराचार्यांच्या जीवनाचे व कार्याचे वर्णन शब्दांच्यामध्ये करणे फार कठीण आहे. आचार्य हे साक्षात शिवाचा अवतार आहेत. जगातील संपूर्ण ज्ञानाचे सार आचार्यांनी अवघ्या अर्ध्या श्लोकात सांगितले – ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः| दृश्य जगत् हे अनित्य, क्षणभंगुर व मिथ्या असून सर्व दृश्याचे तत्त्वस्वरूप असणारे ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे आणि प्रत्येक जीव हा स्वतःच ब्रह्मस्वरूप आहे’. अद्वैत वेदांताचे हे सार आहे. आचार्यांनी याच ऐक्यज्ञानाचा विश्वामध्ये प्रचार केला. आचार्यांचा जन्म हा एका युगपुरुषाचा जन्म आहे. भगवान शिवांनी स्वतःच सांगितले होते –

दंशजातं देवेशि कलावपि तपोधनम्|
केरलेषु तदा विप्रं जनयामि महेश्वरि|| (स्कंदपुराण)

हे देवि! कलियुगामध्ये केरळ प्रांतामध्ये माझ्या अंशाने मी अत्यंत तपस्वी असणारा अवतार धारण करेन. किंवा –

      करिष्यत्यवतारं स्वं शङ्करं नीललोहितः|
श्रौतस्मार्तप्रतिष्ठार्थं भूतानां हितकाम्यया|| (कूर्मपुराण)

श्रौत आणि स्मार्त म्हणजेच वेद व पुराणे यांच्या प्रतिष्ठेसाठी व भूतमात्रांच्या कल्याणासाठी भगवान शिव स्वतःच भविष्यकाळात अवतार घेतील. किंवा –

      कल्यब्दे द्विसहस्त्रांते लोकानुग्रहकाम्यया|
      चतुर्भिः सह शिष्यैस्तु शंकरः आविर्भविष्यति|| (वायुपुराण)

कलियुगात दोन हजार वर्षांनंतर लोककल्याणासाठी भगवान शिव स्वतःच चार शिष्यांसह अवतार घेतील. किंवा भगवान शिव पार्वतीला सांगतात –

      कल्यादिमे महादेवि सहस्त्रद्वितयात् परम्| (शिवरहस्य)

हे पार्वति! कलियुगाची दोन हजार वर्षं उलटल्यावर मी शंकर या नावाने जन्म घेईन. किंवा –

      व्याकुर्वन् व्याससूत्रार्थं श्रुतेरर्थं यथोचितम्|
श्रुतेर्न्यायः एवार्थः शंकरः सविता नः सः|| (सौरपुराण)

वेदांचा योग्य अर्थ सांगून भगवान व्यासांच्या सूत्रांवर भाष्य करणारा शंकर हाच आमचा सूर्य आहे. त्यानेच श्रुतींचा योग्य अर्थ दाखविला आहे. मंडनपंडितांच्या वादामध्ये विजयी झाल्यावर त्यांच्या पत्नीने – भारतीने म्हणजेच साक्षात सरस्वतीने आचार्यांची स्तुति केली होती – ईशानः सर्वशास्त्राणां ईश्वरः सर्वदेहिनाम्| ब्रह्मन् अधिपतिः भवान् साक्षात् सदाशिवः|| हे भगवन्! आपण सर्व शास्त्रांचे अधिपति नियामक व सर्व प्राणिमात्रांचे ईश्वर असून आपणच साक्षात सदाशिवस्वरूप आहात.

      अशा भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्यांचे कोणत्या शब्दात वर्णन करावे! आदि शंकराचार्यांचा जन्म हा एक नवीन युगाचा उदय आहे. आदि शंकराचार्यांची जयंती हे आपल्या सर्वांसाठी एक मोठे राष्ट्रीय पर्व आहे. शेकडो वर्षे लोटली तरी आचार्यांचे शब्द मानवी जीवनाला दीपस्तंभाप्रमाणे एक नवीन दिशा देण्याचे कार्य करतात. भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!

ॐ तत् सत्|


- परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित