अध्यात्ममार्गामध्ये
वरवरची इच्छा, त्याग किंवा वैराग्य उपयोगी पडत नाही. आम्ही संसारही करू, विषयही उपभोगू आणि हे
सर्व करता करता जमेल तशी, वेळ मिळेल तशी साधनाही करू, असा सर्वसामान्यतेने
सर्वांचा विचार दिसतो. म्हणूनच या
मार्गामध्ये अनेक साधक अनेक वर्षे काहीतरी करीत राहतात. वर्षानुवर्षे करूनही हाताशी काहीही येत नाही. मग गुरूंना, शास्त्राला, परंपरेला, अन्य
व्यक्तींना, समाजाला, परिस्थितीला किंवा भगवंतालाही ते दोष देतात. परंतु दोष हा बाहेर नसून आपल्या अंतरंगामध्येच
आहे. अजूनही आपल्या मनामध्ये त्या प्रतीची
तळमळ नाही.
एक
शिष्य रोज गुरुंच्याकडे येतो. ज्ञान
मागतो, मुक्ति मागतो. गुरु रोज उपदेश देत
राहतात, परंतु शिष्याला अपेक्षा असते की, गुरूंनी काहीतरी करावे आणि मला एका
क्षणात आत्मसाक्षात्कार किंवा मुक्ति द्यावी. एक दिवस गुरु त्याला नदीकाठी घेऊन जातात. त्याला पाण्यामध्ये नेतात. आत जेथे गळयापर्यंत
पाणी आलेले असते, तेथे नेऊन त्याचे डोके आत दाबतात. तो डोके पाण्याच्या बाहेर काढतो. एक सेकंदानंतर गुरु पुन्हा जोराने खाली दाबतात. तो पुन्हा डोके बाहेर काढतो. पुन्हा तिसऱ्यांदा डोके दाबतात, तो पुन्हा डोके
बाहेर काढतो.
नंतर
त्याला ते काठावर घेऊन येतात व विचारतात ‘तुला काय वाटले ?’ त्यावेळी तो शिष्य
उत्तर देतो ‘गुरुजी ! हे तुम्ही काय केलेत
? जगतो की मरतो असे झाले. माझा जीव वाचविण्यासाठी मी अत्यंत कासावीस
झालो, गुदमरलो आणि म्हणून वेगाने डोके बाहेर काढले. बस्स ! त्याक्षणी
दुसरे काहीही आठवले नाही.’ यांवर गुरु
उत्तर देतात ‘बाळा ! ज्यावेळी
परमेश्वराच्या प्राप्तीसाठी इतकीच तीव्र तळमळ, व्याकुळता निर्माण होईल, मुक्तीसाठी
तुझा जीव तळमळेल, त्याचवेळी तुला आत्मसाक्षात्कार होईल.’
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति,
एप्रिल २००९
- Reference: "Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
- Reference: "Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment