परमेश्वराच्या
भीतीने, आज्ञेनेच वारा वाहातो, सूर्य उगवतो, अग्नि, इंद्र, यम वगैरेदि
स्वव्यापारामध्ये प्रवृत्त होतात. परमेश्वराच्या
सत्तेशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही.
अशा
या जगड्व्याळ विश्वावर नियमन करूनही परमात्म्यामध्ये लेशमात्रही विकार होत नाही. याउलट आपल्याला साधे आपल्या मुलावरही नियमन करता
येत नाही. त्यांच्यावर नियमन करीत असताना
आपल्या क्रोधाचा पारा चढतो. याउलट
परमात्मा सर्व सृष्टीवर, सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, चौदा भुवने, उच्च-अधमादि सर्व
योनि या सर्वांवर नियमन करतो, परंतु त्याच्या निर्गुण स्वरूपामध्ये कोणताही बदल
होत नाही. मग तो कसे नियमन करतो?
टीकाकार
दृष्टांत देतात – जसे, आरशासमोर देवदत्त नावाचा माणूस उभा राहिला तर आरशामध्ये
त्याचे प्रतिबिंब पडते. त्यावेळी तो
देवदत्त आरशामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाचा ‘ईशिता’ नियामक होतो. या दृष्टांतामध्ये देवदत्त हा बिंबस्थानीय आहे. देवदत्ताचे प्रतिबिंब पडण्यासाठी आरसा या
उपाधीची आवश्यकता आहे. तसेच देवदत्त एक
असेल तरी जितके आरसे तितकी प्रतिबिंबे निर्माण होतात. एकच देवदत्त दोन, तीन झाल्यासारखा भासतो. प्रतिबिंब निर्माण झाल्यावर किंवा प्रतिबिंब
निर्माण होत असताना सुद्धा देवदत्तामध्ये कोणताही विकार, बदल, परिणाम होत नाही. कर्तृकारकादि प्रत्ययही निर्माण होत नाही.
याचे
कारण तो – प्रतिबिंबानाम् आत्मा सन् | प्रतिबिंबे ही मिथ्या, भासात्मक आहेत. आरशामधून पाहिले म्हणजेच उपाधीच्या दृष्टीने
पाहिले तर प्रतिबिंबच सत्य वाटते, परंतु देवदत्ताच्या दृष्टीने पाहिले तर
प्रतिबिंब मिथ्या, भासात्मक दिसते. म्हणूनच आरसा फुटला तरी देवदत्ताला काहीही इजा
होत नाही. आचार्य याही पुढे जाऊन म्हणतात
की, तोच देवदत्त प्रतिबिंबावर नियमन करतो. प्रतिबिंबाच्या अनुषंगाने देवदत्त नियामक होतो. परंतु प्रतिबिंबच मिथ्या असल्यामुळे देवदत्ताचे
नियामकत्वही वस्तुतः मिथ्या, भासमान, कल्पित आहे. देवदत्तावर हा आरोप केलेला आहे.
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति,
एप्रिल २००९
- Reference: "Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
- Reference: "Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment