Tuesday, October 15, 2019

“ॐ नमः शिवाय” – ७ | Meaning of Namah Shivay - 7




येथे नमः यात न आणि मः अशी दोन अक्षरे आहेत.  त्यातील नकारामधून निषेध दर्शविला आणि मः म्हणजेच – मासि - मस्यति म्हणजे मापन करणे.  ज्याप्रमाणे एखादा तराजू धान्याचे मापन करतो म्हणजेच धान्य स्वतःमध्ये ठेऊन तोलतो, मोजतो आणि मोजल्यानंतर बाहेर काढून टाकतो.  त्यानंतरच ते धान्य ग्राहकांना व्यवहारयोग्य होते.  मात्र तराजू स्वतःमध्ये धान्य ठेऊनही, धान्य मोजूनही स्वतः मात्र धान्यापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी, अविकारीस्वरूप राहतो.

मापनासाठी तराजू पाहिजे.  तसेच, मापनासाठी काहीतरी वस्तु पाहिजे.  मापनक्रियेमध्ये १) मापनासाठी मापनाच्या उपकरणात आपण मापनाची वस्तु घालतो.  २) तराजूचा एक भाग धान्याला आपल्यामध्ये सामावून घेतो.  ३) मापन केल्यानंतर मोजलेले धान्य बाहेर ओततो व परत मापनासाठी दुसरे नवीन धान्य घेतो.  या सगळ्या प्रक्रियेला मापन, मोजणे असे म्हणतात.  या सर्व प्रक्रियेमध्ये तराजू हा नित्य अलिप्त राहतो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

त्याप्रमाणेच ईश्वरही या संपूर्ण विश्वाचे मापन करतो.  तो संपूर्ण विश्वाला प्रथम आपल्यामध्ये सामावून घेतो.  विश्वाला आधारभूत, अधिष्ठानभूत होतो.  जे बाहेरचे विश्व आहे, तेच तो आत घेतो.  म्हणजेच जे बाहेर व्यक्त, स्थूल आहे, तेच त्याच्यामध्ये आल्यानंतर सूक्ष्म, अव्यक्त होते.  म्हणजेच प्रलयावस्थेत तो सर्व विश्वाला सूक्ष्म रूपात धारण करतो व पुन्हा योग्य वेळी विश्वाला आतून बाहेर काढतो म्हणजेच सृष्टिरचनेच्या वेळी अव्यक्ताला व्यक्त करतो, सूक्ष्माला स्थूल करतो आणि विश्वनिर्मिती होते.  यालाच ‘मापन’ असे म्हणतात.  याप्रकारे हे भगवंता !  नमः यामधून तू संपूर्ण विश्वाचे मापन करतोस.



- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ




Tuesday, October 8, 2019

“ॐ नमः शिवाय” – ६ | Meaning of Namah Shivay - 6



‘शिव’ शब्दाचा आणखी एक अर्थ सांगतात.  हे विद्वान पुरुषांनो !  कारणब्रह्माला ‘शिव’ असे म्हणतात.  शिव शब्दाची व्याख्या याठिकाणी करतात – अस्मिन् सर्वं जगत् शेते इति शिवः |  ज्यामध्ये सर्व जग शयन करतात त्याला ‘शिव’ असे म्हटले आहे.  हे संपूर्ण विश्व प्रलयावस्थेमध्ये शिवामध्येच शयन करते. ‘शिव’ या पदामध्ये ‘शि’ आणि ‘व’ ही दोन अक्षरे आहेत.  ‘शि’ याचा अर्थच संपूर्ण जग प्रलयावस्थेत जेथे शयन करते, त्याला ‘शि’ असे म्हणतात. म्हणून ‘शि’ या अक्षरामधून अव्यक्त प्रकृति निर्देशित केलेली आहे.  ‘शि’ हे अक्षर मूळ प्रकृतिवाचक आहे आणि – वानात् वः शिवः इति उक्तम् |   त्या विश्वाला जो प्रेरणा देतो, त्याला ‘शिव’ असे म्हणतात.   

जे जग प्रलयावस्थेमध्ये, बीजावस्थेमध्ये, अव्यक्तावस्थेमध्ये राहते की, जे विश्व वाणीचा विषय आहे.  वाणी म्हणजे शब्द होय.  प्रत्येक शब्दामधून विश्वामधील एकेक एकेक विषय निर्देशित केला जातो.  म्हणून विश्व म्हणजेच नाम आणि रूप होय.  हे संपूर्ण विश्व स्थितिकालामध्ये इंद्रियांच्या माध्यमामधून अनुभवायला येते.

असे हे विश्व भू भुवः स्वः महः जनः तपः सत्यम् याप्रकारे सर्व त्रिभुवन म्हणजेच ऊर्ध्वलोक, अधोलोक आणि मर्त्यलोक असा हा संपूर्ण नामरूपात्मक दृश्य प्रपंच अनुभवाला येतो.  तन्मयं म्हणजे – प्रकृतिमयं इति |  हे संपूर्ण विश्व बीजावस्थेमध्ये तन्मय म्हणजेच प्रकृतिमय असते.  आणि नंतर तेच विश्व व्यक्त होते म्हणून प्रकृतीचा परिणाम, प्रकृतीचा विकार म्हणजेच हे दृश्य विश्व होय.  



- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ

Tuesday, October 1, 2019

“ॐ नमः शिवाय” – ५ | Meaning of Namah Shivay - 5



या श्लोकामध्ये ‘नमः’ या पदाचा आणखी एक अर्थ सांगतात.  नम् धातूला अच् प्रत्यय लावून ‘नमः’ हे पद तयार होते.  ‘नमः’ म्हणजेच प्रणामकर्ता उपासक होय.  नमति इति नमः |  जो नमस्कार करतो, प्रणाम करतो, तो ‘नमः’ होय.  म्हणून ‘नमः’ म्हणजेच प्रणाम करणारा, नमस्कार करणारा उपासक होय.  

यानंतर – जन्ता स्यात् जगदीश्वरे |  जन्ता यामध्ये ‘जम्’ हा धातु आहे.  जमु अदने |  ‘जम्’ म्हणजे भक्षण करणे, खाणे होय.  या धातुपासून ‘जन्ता’ हे पद तयार होते.  म्हणून जन्ता म्हणजे खाणारा, भक्षण करणारा होय.  जो संपूर्ण जगाला खातो, भक्षण करतो म्हणजेच जगाचा संहार करतो, त्यालाच ‘जन्ता’ असे म्हणतात.  म्हणून जन्ता म्हणजेच जगदीश्वर होय.  

“ हे देवदेवेशा !  तू या संपूर्ण सृष्टीचा संहारकर्ता असल्यामुळेच मी तुझा दास आहे आणि तू माझा स्वामी आहे.  म्हणून मी – ‘नमः’ मी तुझा उपासक आहे.  मी तुझ्या चरणांचा निश्चितपणे आश्रय घेतला आहे, तुला समर्पित झालो आहे, असे जाणून तू निश्चितपणे माझा उद्धार कर.  मला अभयदान देऊन या संपूर्ण भवसागरामधून पार करवून ने.” 

“ कारण जे जे तुला शरण येतात, त्या सर्व आश्रितांना अभयदान देऊन त्यांचा उद्धार करणे, हे तुझे कर्तव्य आहे.  म्हणून शरण आलेल्या मला तुझा दास समजून तू मला तुझ्या स्वरूपाजवळ घेऊन चल.  म्हणूनच मी तुला – जगदीश्वराला अनन्य भावाने शरण आलो आहे.  तूच या विश्वाचा नियामक, ईशनशील, अधिपति आहेस.  आणि मी मात्र नियम्य, तुझा एक यःकश्चित असणारा दास आहे.”  


- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ




Tuesday, September 24, 2019

मंत्रोपासनेचे प्रयोजन | Necessity of Mantra Upasana




ज्ञान हेच मोक्षाचे पुष्कल साधन आहे.  मात्र हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य व अधिकारी अंतःकरणाची आवश्यकता आहे.  अंतःकरणामधील रागद्वेष, कामक्रोधादि विकार, चंचलता वगैरेदि हे सर्व ज्ञानाला प्रतिबंधक आहे.  म्हणून जोपर्यंत अंतःकरणामध्ये मल आणि विक्षेप हे दोष आहेत, तोपर्यंत हे ज्ञान सप्रतिबंधक, संशयविपर्ययुक्त, केवळ शाब्दिक ज्ञान आहे.  याला ज्ञान असे म्हणताच येणार नाही.  

म्हणून निष्प्रतिबंधक ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच आचार्य सगुणोपासना हे साधना देतात.  सगुणोपासना म्हणजेच ईश्वराची उपासना आणि त्यास साहाय्यकारी असणाऱ्या वेदविहित कर्मांचे अनुष्ठान होय.  ही सगुणब्रह्मउपासना क्रमाने मोक्षप्राप्तीचे साधन होते.

यानंतरच निर्गुणउपासना सांगितली जाते.  निर्गुणब्रह्मउपासना म्हणजेच ब्रह्माभ्यास होय.  ही उपासना मोक्षाचे साक्षात कारण आहे.  हाच संपूर्ण शास्त्राचा तात्पर्यनिर्णय असून तोच ‘नमः शिवाय’ या मंत्राचाही गर्भितार्थ आहे.  तोच अर्थ तत्त्वदर्शी लोकांनी निष्ठापूर्वक कथन केलेला आहे.  त्यामध्ये कोणतीही उणीव, शंका, गोंधळ किंवा विकल्प नसल्यामुळे निश्चितपणे मोक्षप्राप्तीसाठी साधकांनी हाच अर्थ जाणावा.  कारण ‘नमः शिवाय’ या मंत्राची उपासना करीत असताना त्याचा शब्दार्थ, गुढार्थ आणि तत्त्वार्थ समजणे आवश्यक आहे.

मंत्रार्थाच्या बोधामुळे आपली उपासनेमध्ये दृढ श्रद्धा निर्माण होते.  मनामधील अनेक शंका निरास होतात.  जप का करावा ?  त्याचे फळ काय ?  हे समजते.  शंका निरसन झाल्यामुळे तसेच उहापोह विचार झाल्यामुळे सर्व विकल्प संपून त्या मंत्रामध्ये निष्ठा प्राप्त होते.  मंत्रोपासनेमध्ये सातत्य निर्माण होऊन मन दीर्घकाळ, तासन् तास जपामध्ये एकाग्र, तल्लीन, तन्मय होते.  यामुळे आपोआपच तत्त्वचिंतन होते.   


- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ

Tuesday, September 17, 2019

दास्यत्वाची शक्ति | Strength Of Surrender






अहंकार निरास करण्यासाठी शास्त्रामध्ये दास्यत्वभाव हेच अत्यंत प्रभावी साधन आहे.  दास्यत्वाच्या भावामध्ये नम्रता, विनयशीलता आहे.  दास्यत्व याचा अर्थ दुबळेपणा नव्हे.  किंवा मराठी भाषेमधील दीनभाव हा प्रचलित अर्थ म्हणजे सुद्धा दास्यत्व नव्हे.  दास्यत्व म्हणजेच शरणागति, समर्पण, नितांत श्रद्धा, अनन्य भाव, त्याग, सेवावृत्ति होय.  ज्याचा मी दास होतो, तो स्वामी माझ्यासाठी सर्वस्व होतो.  तेथेच प्रेम, भक्तीचा भाव निर्माण होतो.  त्या स्थानामध्ये दृढ श्रद्धा निर्माण होते.  

ते श्रद्धास्थान माझ्या जीवनातील परमोच्च आश्रयस्थान असते.  त्यांचा शब्द माझ्यासाठी वेदतुल्य असतो.  त्या शब्दाला मी कधीही पर्याय देत नाही.  तेथे मी ‘कां ?’  हा प्रश्न विचारत नाही.  मनामध्ये त्या स्थानाविषयी एकही संशय, विकल्प, शंका निर्माण होत नाही.  त्यांच्या मुखामधून जो शब्द येईल तो माझ्यासाठी प्रमाणभूत असतो.  तो शब्द म्हणजे माझे जीवन जगण्याचे शास्त्र असते.  त्या शब्दाच्या बाहेर जाण्याची कल्पना मी स्वप्नामध्येही करू शकत नाही.  त्यांनी सांगावे आणि मी ऐकावे.  बस्स !  यामध्ये कोणताही प्रतिबंध येत नाही.

त्यामध्ये माझा अहंकार, व्यक्तिगत रागद्वेष, कल्पना, माझी मते, माझी आवड-नावड यांना यत्किंचितसुद्धा स्थान नसते.  त्याचवेळी खऱ्या अर्थाने सेवा होऊ शकते.  सेवेच्या शुद्ध भावामध्ये माझे मनच संपते.  जे सेवामय जीवन जगलेले आहेत, असे थोर साधक काही वेळेस सांगतात की, ‘गुरूंची सेवा करीत असताना स्वतःचे मन सातासमुद्रापलीकडे फेकून द्यावे किंवा खुंटीला बांधून ठेवावे.’  याचा अर्थच सेवेमध्ये मला काय आवडते ?  यापेक्षा माझ्या गुरूंना काय आवडते ?  याला महत्त्व आहे.  त्यामुळे सेवाभावामध्ये, दास्यत्वाच्या भावामध्ये रागद्वेषादि, कामक्रोधादि विकारांचा, तसेच अहंकार-ममकाराचा अत्यंत निरास होतो.  मन अत्यंत अंतर्मुख, शुद्ध, सत्त्वगुणप्रधान होते.  मनामध्ये भक्तीचा उत्कट भाव निर्माण होतो.  

असे मनच पुढील ज्ञानसाधनेसाठी योग्य अधिकारी होते.  त्यामुळेच साधक अत्यंत कठीण असणाऱ्या भवसागरालासुद्धा सहजपणे पार करून जातो.  म्हणून येथे ‘दास’ हाच ‘नमः’ या शब्दाचा अर्थ आहे.  हाच अर्थ वेदांनी, शास्त्रांनी व भगवंतांनी गीतेमधून सांगितलेला आहे.


- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ


Tuesday, September 10, 2019

संकल्प आणि कामना | Decision And Desire





संकल्प म्हणजे काय ?  विषयांच्यामध्ये प्रिय वृत्ति निर्माण होते यालाच संकल्प असे म्हणतात.  याचा अर्थ विषयाच्या सन्निकर्षाने विषयानुरूप अंतःकरणामध्ये निर्माण होणारी वृत्ति म्हणजे संकल्प नाही.  उदा. घटाचा डोळ्यांशी संयोग झाल्यानंतर मनामध्ये घटाकार वृत्ति निर्माण होऊन ती वृत्ति घटाला प्रकाशमान करून घटाचे ज्ञान करून देते की, ‘हा घट आहे’.  परंतु ही ज्ञानवृत्ति निर्माण होणे म्हणेज संकल्प नाही.  तर ती फक्त विषयाकार वृत्ति आहे. मग संकल्प कसा निर्माण होतो ?  ज्यावेळी विषयाच्या सान्निध्याने त्या विषयांमध्ये प्रिय वृत्ति निर्माण होते.  त्यामुळे तो विषय आपल्या सानिध्यामध्ये असावा, तसेच तो विषय उपभोगावा अशी जी विषयाची वृत्ति निर्माण होते, त्या वृत्तीला संकल्प असे म्हणतात.

संकल्प मनामध्ये विकार निर्माण करतो.  विषय समोर असला की, तो हवाहवासा वाटतो.  कालांतराने तो दृष्टिक्षेपाच्या दूर असला तरी मन त्या विषयाची कल्पना करून काल्पनिक विषयामध्ये रमते.  मनामध्ये त्याच विषयाचे विचार सतत येत राहातात.  यालाच प्रियत्व म्हणतात.  त्यानंतर वृत्ति विषयाकडे आकर्षित होऊन सतत विषयाचे चिंतन होते आणि नंतर विषयकामना निर्माण होते.  संकल्प आणि कामना यामध्ये थोडा फरक आहे.  दृढ संकल्पाला ‘कामना’ म्हणतात.  संकल्पामुळे विषय हवाहवासा वाटतो.  परंतु तो दृढ नसल्यामुळे सर्व संकल्प आपण पूर्ण करतोच असे नाही.  अनेक संकल्प येतात आणि काळाच्या ओघात विरूनही जातात.  परंतु फारच थोडे संकल्प दृढ होऊन कामनेमध्ये रूपांतर होतात.  

एकदा कामना निर्माण झाली की, मग बुद्धीने कितीही समजावून दिले तरी कामना मनामधून काढून टाकण्यास खूप त्रास होतो.  याचे कारण तिचे बीज अंतःकरणामध्ये खोलवर रुजलेले असते.  त्यावेळी मनुष्य कामनेने झपाटला जाऊन कामना पूर्तीसाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो.  ती कामना मनुष्याला बहिर्मुख बनवून अनेक प्रकारच्या कर्मामध्ये प्रवृत्त करते.  म्हणून याठिकाणी संकल्पांचा त्याग करण्याऐवजी संकल्पामधून निर्माण झालेल्या कामनांचा त्याग करण्यास सांगितलेले आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ – 

Tuesday, September 3, 2019

योग आणि सुख-दुःख | Yoga and Joy & Grief



दुःखसंयोगरहित असणारी अवस्था म्हणजे योग, हे सांगताना दुःख या शब्दाच्या अनुषंगाने असलेले विषयसुख हे सुद्धा गृहीत आहे.  याचे कारण ज्यावेळी इंद्रियांचा विषयांशी सन्निकर्ष होतो त्यावेळी त्या सन्निकर्षामधून अनुकूल आणि प्रतिकूल अंतःकरणवृत्ति निर्माण होते.  अनुकूल वृत्ति सुखवर्धन करणारी, सुखाची अनुभूति देणारी असते आणि प्रतिकूल वृत्ति दुःखवर्धन करणारी, दुःखाची अनुभूति देणारी असते.  त्यामुळे दुःख हा शब्द आपोआपच सुखाचा निर्देश करतो.  

सुखाशी होणारा संयोग तात्कालिक असल्यामुळे कोणतेही सुख शेवटी दुःखालाच कारण होते म्हणून इंद्रियसन्निकर्षाने प्राप्त होणारे सर्व सुख-दुःख हे दुःखस्वरूपच आहे असे समजावे.  या सुखदुःखाशी होणारा संयोग म्हणजेच संसार होय आणि सुखदुःखाशी होणाऱ्या संयोगाचा वियोग म्हणजे योग होय.

बाह्य सुखदुःखादि प्रसंगांना प्रकाशित न करण्याची अंतःकरणाची जी विशेष अवस्था आहे, त्या अवस्थेला योग असे म्हणावे.  इंद्रियांचा बाह्य विषयांशी संयोग झाला की, अंतःकरणामध्ये अनुकूल-प्रतिकूल वृत्ति निर्माण होऊन सुखदुःखांचा अनुभव येतो.  ज्या अवस्थेमध्ये या सुखदु:खांचा अनुभव येत नाही, म्हणजेच जी सुखदुःखरहित, संकल्पविकल्परहित अवस्था प्राप्त होते, ती अंतरिक अवस्था ही आत्मस्वरूपाची सुस्थिति होय.  याच अवस्थेला ‘योग’ असे म्हणतात.

यामध्ये योगाभ्यासाच्या साधनेने प्रथम सुखदु:खांचा आवेग आणि त्यामागे असणाऱ्या रागद्वेषांचा प्रभाव हळुहळू कमी होतो आणि बाह्य परिस्थिति अनुकूल किंवा प्रतिकूल असो, त्यामध्ये मन चलबिचल न होता मनाचे संतुलन कायम राहाते.  यामुळे वृत्ति अंतर्मुख होऊन श्रवणादि साधनेमध्ये एकाग्र होते.  त्यानंतर योगाभ्यासाने वृत्ति ब्रह्माकार होते.  कालांतराने दीर्घ अभ्यासाने वृत्ति परिपक्व होऊन ब्रह्मस्वरूप होते.  त्या अवस्थेमध्ये सुखदुःखांशी झालेला संयोग पूर्णपणे नाहीसा होतो.  ही स्वस्वरूपामध्ये राहण्याची जी विशेष अवस्था, त्यालाच योग असे म्हणावे.  त्यालाच योगारूढ असे म्हणतात.  ही मनाची अवस्था नसून स्वस्वरूपाची स्थिति आहे.  अशी ही योगाची परमोच्च अवस्था प्राप्त झाली म्हणजे साधकाला अखंड नित्य आत्मतृप्ति मिळते.

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ