येथे
नमः यात न आणि मः अशी दोन अक्षरे आहेत. त्यातील
नकारामधून निषेध दर्शविला आणि मः म्हणजेच – मासि - मस्यति म्हणजे मापन करणे. ज्याप्रमाणे एखादा तराजू धान्याचे मापन करतो
म्हणजेच धान्य स्वतःमध्ये ठेऊन तोलतो, मोजतो आणि मोजल्यानंतर बाहेर काढून टाकतो. त्यानंतरच ते धान्य ग्राहकांना व्यवहारयोग्य
होते. मात्र तराजू स्वतःमध्ये धान्य
ठेऊनही, धान्य मोजूनही स्वतः मात्र धान्यापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी,
अविकारीस्वरूप राहतो.
मापनासाठी
तराजू पाहिजे. तसेच, मापनासाठी काहीतरी
वस्तु पाहिजे. मापनक्रियेमध्ये १)
मापनासाठी मापनाच्या उपकरणात आपण मापनाची वस्तु घालतो. २) तराजूचा एक भाग धान्याला आपल्यामध्ये सामावून
घेतो. ३) मापन केल्यानंतर मोजलेले धान्य
बाहेर ओततो व परत मापनासाठी दुसरे नवीन धान्य घेतो. या सगळ्या प्रक्रियेला मापन, मोजणे असे म्हणतात.
या सर्व प्रक्रियेमध्ये तराजू हा नित्य
अलिप्त राहतो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
त्याप्रमाणेच
ईश्वरही या संपूर्ण विश्वाचे मापन करतो. तो
संपूर्ण विश्वाला प्रथम आपल्यामध्ये सामावून घेतो. विश्वाला आधारभूत, अधिष्ठानभूत होतो. जे बाहेरचे विश्व आहे, तेच तो आत घेतो. म्हणजेच जे बाहेर व्यक्त, स्थूल आहे, तेच
त्याच्यामध्ये आल्यानंतर सूक्ष्म, अव्यक्त होते. म्हणजेच प्रलयावस्थेत तो सर्व विश्वाला
सूक्ष्म रूपात धारण करतो व पुन्हा योग्य वेळी विश्वाला आतून बाहेर काढतो म्हणजेच
सृष्टिरचनेच्या वेळी अव्यक्ताला व्यक्त करतो, सूक्ष्माला स्थूल करतो आणि
विश्वनिर्मिती होते. यालाच ‘मापन’ असे
म्हणतात. याप्रकारे हे भगवंता ! नमः यामधून तू संपूर्ण विश्वाचे मापन करतोस.
- "ॐ नमः
शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च
२०१५
- Reference: "Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015
- Reference: "Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment