आपले मन साधुसंगतीमध्ये, ईश्वरामध्ये रमत नसेल,
चिंतन करीत नसेल तर ते साहजिकच जड विषयांच्यामध्ये, अनात्म्यामध्ये रमेल. विषयांचेच चिंतन करील. (ध्यायतो विषयान्स्पुंसः)
त्या चिंतनामुळे हळूहळू विषयांचे आकर्षण निर्माण
होऊन विषयांचे प्रेम निर्माण होते. आसक्ति
निर्माण होते. मग विषय समोर असो किंवा नसो विषयांचेच विचार मनामध्ये रात्रंदिवस घोळत
राहातात. त्यातच मनाला सुख वाटते. बरे वाटते.
(संगस्तेपूषजायते) यामधून प्रिय विषय हवाहवासा वाटतो आणि आपोआपच तो
आपल्याजवळ असावा असे वाटते. तो प्राप्त करण्याची
कामेच्छा निर्माण होते. याचाच परिणाम म्हणजे
विषयध्यास लागतो. तो मिळविण्यासाठी सर्व प्रकारचे
प्रयत्न करावयास लागतो.
(संगात्संजायते कामः) परंतु अनेक वेळेला प्रयत्न करूनही कामेच्छा पूर्ण
होईलच असे नाही. उलट प्रयत्नामध्ये अनेक प्रकारचे
अडथळे येतात. प्रतिबंध येतात. यामुळे तोच काम, क्रोधाची भावना निर्माण करतो. (कामात्क्रोधोSभिजायते) क्रोधाची भावना अनावर झाली की, विवेक नाहीसा होतो.
बुद्धीला संमोह-संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे योग्य काय, अयोग्य काय याचा सारासार विवेक
संपतो. मनावरचे संयमन, मनाचे संयमन सुटते.
मन आणि बुद्धि भ्रमिष्ट होते. (क्रोधात्भवति संमोहः) क्रोधाविष्ट झालेल्या मनामध्ये मूढत्वामुळे स्मृतीचा
ऱ्हास होतो. म्हणजेच कोणत्याही प्रसंगामध्ये
योग्य-अयोग्य, चांगले-वाईट परिणाम मनुष्य विसरतो. (संमोहास्मृतिविभ्रमः)
खरे पाहाता आपल्याकडून अपेक्षित कर्म कोणते,
कसे वागावे, बोलावे, कसे योग्य आचरण ठेवावे यासाठी आपल्यावर आई-वडील आणि आचार्य सतत
संस्कार करीत असतात. अनेक शास्त्रांचे अध्ययन,
धर्मशास्त्र, वेदान्तशास्त्राचे अध्ययन आणि त्यामधून मिळालेल्या ज्ञानाचे प्रयोजन सुसंस्कृत,
सद्विचारी, सदाचारी मनुष्य व्हावा हेच आहे. हेच संस्कारयुक्त ज्ञान स्मृतिरूपाने प्रत्येक
प्रसंगामध्ये योग्य ते कर्म करावयास प्रवृत्त करीत असते. परंतु ही स्मृतिच जर अनावर क्रोधाने गिळंकृत केली
तर ज्ञानसंपन्न असूनही मनुष्याचा तोल जाईल आणि जे करू नये ते तो करेल, जे बोलू नये
ते तो बोलेल, जे खाऊ नये ते तो खाईल. तो पशुतुल्य
होईल. हाच मनुष्याचा नाश आहे. (स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति)
कारण तो मनुष्यत्व टाकून अत्यंत हिंस्र पशूप्रमाणे
झालेला आहे.
-
"नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "Narad
Bhaktisutra" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006
- हरी ॐ –













